काँग्रेस शिवसेनेसोबत बसलीच कशी? ः शेलार

संतोष कुळकर्णी
Tuesday, 12 January 2021

औरंगाबादच्या नामांतरावर बोलताना शेलार म्हणाले, ""राज्यात भाजपचे सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबादचे संभाजीनगर नामांतरण करण्याबरोबरच विमानतळ नामांतरणाचा प्रस्ताव केंद्रात पाठविला होता; मात्र त्याचा पाठपुरावा आताच्या मुख्यमंत्र्यांनी का केला नाही?

देवगड (सिंधुदुर्ग) - संभाजीनगर नामकरण करण्याची भाजपची सुरूवातीपासून मागणी होती असे सांगुन शहराला औरंगाबादच म्हणू असे सांगणारी कॉंग्रेस शिवसेनेच्या हिंदुत्वात त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलीच कशी? असा सवाल औरंगाबाद शहराचे संभाजीनगर नामकरणावरील शिवसेनेच्या भूमिकेवर भाजप नेते आशीष शेलार यांनी आज येथे उपस्थित केला. याबाबतीत शिवसेनेची दुटप्पी भुमिका असल्याची टीका त्यांनी केली.

दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला शतप्रतिशत यश मिळेल असा विश्‍वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. जामसंडे येथे भाजप कार्यकर्ता बैठकीच्या निमित्ताने श्री. शेलार आले होते. बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी आमदार नितेश राणे, माजी आमदार ऍड. अजित गोगटे, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हा उपाध्यक्ष बाळ खडपे, राजू राऊळ, तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, सभापती सुनील पारकर, उपसभापती अमोल तेली, सदाशिव ओगले, प्रकाश राणे आदी उपस्थित होते. 

औरंगाबादच्या नामांतरावर बोलताना शेलार म्हणाले, ""राज्यात भाजपचे सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबादचे संभाजीनगर नामांतरण करण्याबरोबरच विमानतळ नामांतरणाचा प्रस्ताव केंद्रात पाठविला होता; मात्र त्याचा पाठपुरावा आताच्या मुख्यमंत्र्यांनी का केला नाही? पाठपुरावा न करण्याच्या भूमिकेबद्दल शिवसेनेच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या मनात दडलंय काय?

संभाजीनगर नामांतर करण्याची भाजपची सुरूवातीपासूनच मागणी आहे. ट्युटरवर संभाजीनगर चुकून झाले म्हणून माघार घेणाऱ्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. औरंगाबादच्या नामांतरावरून शिवसेनेची दुटप्पी भुमिका समोर आली आहे.'' दरम्यान, फळपीक विम्याबाबतचा निकषं बदलण्याचा विषय लावून धरत संसदेत मांडू असेही त्यांनी सांगितले. 

आता शिवसेना "ट्युटर मिस्टेक' 
एक काळ असा होता, बाळासाहेब ठाकरे यांनी डरकाळी फोडली की विरोधक आपली भुमिका बदलायचे किंवा बदलण्याचा विचार करायचे; मात्र आता परिस्थिती बदलली असून कॉंग्रेसच्या राज्यातील नेत्यांनी काव-काव केल्यानंतर डराव -डराव करणारी शिवसेना चुकून आमची भूमिका झाली असे म्हणून माघार घेते. पुर्वी कॉंग्रेसची मंडळी "प्रिटींग मिस्टेक' म्हणायचे आता शिवसेना "ट्युटर मिस्टेक' म्हणतात, अशी टीका आशीष शेलार यांनी केली. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: press conference mla ashish shelar