आमच्या नादी लागू नका ः नारायण राणे

अजय सावंत
Saturday, 28 November 2020

ते म्हणाले, ""ठाकरे सरकारला वर्ष पूर्ण झाले आहे. "सामना' या स्वतःच्या वृत्तपत्रात उद्धव ठाकरे यांनी मुलाखत दिली. मात्र, त्यात कोणत्याही प्रकारे राज्याच्या प्रश्‍नांकडे लक्ष वेधले नाही.

कुडाळ (सिंधुदुर्ग) - आमच्या नादी लागू नका, आम्हाला धमक्‍या दिल्यास तुम्हाला पळता भुई थोडी करू, असा इशारा माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांनी आज मुख्यमंत्र्यांना पत्रकार परिषदेत दिला. राज्यातील तीन पक्षांचे उद्धव ठाकरे सरकार आपल्या वर्षपूर्तीमध्ये सर्वच बाबतीत निष्क्रिय ठरले. राज्यातील कोणतेही जटिल प्रश्‍न सोडविण्यात आणि विकासकामे करण्यात सरकार कुचकामी ठरले आहे, अशी टीकाही त्यांनी केली. 

ते म्हणाले, ""ठाकरे सरकारला वर्ष पूर्ण झाले आहे. "सामना' या स्वतःच्या वृत्तपत्रात उद्धव ठाकरे यांनी मुलाखत दिली. मात्र, त्यात कोणत्याही प्रकारे राज्याच्या प्रश्‍नांकडे लक्ष वेधले नाही. विकासकामे पूर्णपणे ठप्प आणि अनेक प्रश्‍न ऐरणीवर असताना ठाकरे सरकार कोणतेच ठोस निर्णय घेऊ शकले नाही आणि घेऊही शकत नाही. शासन चालविण्यास मुख्यमंत्री सक्षम लागतो. तो सक्षमपणा उद्धव ठाकरे यांच्यात नाही.

राज्य दिवाळखोरीत असताना तिन्ही पक्षांमध्ये ठोस निर्णयाची क्षमता नाही. विरोधकांना धमक्‍या देणे, चौकशी लावणे असे प्रकार निष्क्रिय मुख्यमंत्री करीत आहेत. हे त्यांना शोभत नाही. शिवसेनेचे फक्त 56 आमदार आहेत. सरकार किती दिवस चालेल, हे प्रश्‍नचिन्ह आहे. मुख्यमंत्र्यांना शासन कसे चालवावे, याबाबत वाचन, नियम, घटना याची माहिती नसल्याने ठाकरे सरकार वर्षात पूर्णपणे अपयशी ठरले. बेरोजगारी, विकास, उद्योगधंदे व शेतीबाबत ठोस कृती नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यापलीकडे ते काहीही करीत नाहीत. मोदी, अमित शहा यांच्यावर टीका करण्याची त्यांची पात्रता नाही.'' 

ते म्हणाले, ""अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची केस आम्ही विसरलो नाही. आम्हाला धमक्‍या दिल्या तर आम्ही स्वस्थ बसणार नाही. उद्या केसवरून वेगळे परिणाम झाल्यास त्याला उद्धव ठाकरे जबाबदार असतील. त्यांची अनेक प्रकरणे आम्ही बाहेर काढू. धमक्‍या देण्याचे थांबवा. धमक्‍यांना आम्ही भीक घालत नाही.'' 

श्री. राणे म्हणाले, ""आठ महिने जगावर कोरोनाचे संकट आहे. सर्वाधिक बळी महाराष्ट्रात गेले आहेत. वाढणाऱ्या रुग्णांची संख्या सध्या महाराष्ट्रातच अधिक आहे. त्यामुळे ठाकरे यांच्या कार्यपद्धतीत कोरोनामध्ये बळी गेलेले आपले राज्य अव्वल आहे. आजअखेरच्या मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या विकासासाठी चांगले काम केले आहे. देशात राज्याचे नाव केले; मात्र ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून कोणतीही विकासात्मक वाटचाल झालेली नाही आणि भविष्यात होणारही नाही.'' 

या वेळी भाजप नेते व माजी आमदार प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित देसाई, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे, भाई सावंत, विनायक राणे, आबा धडाम, राकेश कांदे, दादा साईल, राजू राऊळ, भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. 

"ती' शिवसेना आता संपली 
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असताना जी शिवसेना होती, ती आता राहिली नाही. बाळासाहेब ठाकरे हयात असते तर त्यांनी भाजपला कधीच सोडले नसते. बाळासाहेबांनी हिंदुत्व जोपासले, तर उद्धव ठाकरेंना हिंदुत्व जोपासता आले नाही. ते केवळ सत्ता मिळविण्यासाठी एकत्र आले, अशी टीकाही राणे यांनी केली. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Press conference of Narayan Rane at Kudal sindhudurg district