कोरोना नियंत्रणात सत्ताधारी अपयशी - चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मे 2020

श्री. चव्हाण म्हणाले, ""कोकणामध्ये मुंबई, पुणे, ठाणे आदी विविध भागांतून चाकरमानी दाखल झाले आहेत.

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - सिंधुदुर्गात कोरोना स्वॅब टेस्टची सोय नाही. एकूणच कोरोना नियंत्रणात आणण्यामध्ये राज्यशासन सर्वस्तरावर अपयशी ठरले आहे. केंद्राने राज्य शासनाला अनेक सूचना केल्या. मात्र, याकडे दुर्लक्ष झाल्याने आज परिस्थिती हाताबाहेर गेली असून राज्य शासनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी उद्यापासून (ता. 22) आंगण ते रणांगण आंदोलन करण्यात येणार असून सिंधुदुर्गातील जनतेनेही या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन भाजप नेते तथा माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज येथे केले. 

येथील पालिका लोकमान्य टिळक सभागृहात रवींद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा बॅंक संचालक अतुल काळसेकर, नगराध्यक्ष संजू परब, नगरसेवक नासिर शेख, ऍड. परिमल नाईक, मनोज नाईक, आनंद नेवगी, समृद्धी विर्नोडकर, दीपाली भालेकर, अजय गोंदावळे, परिश्रित मांजरेकर आदी उपस्थित होते. 

श्री. चव्हाण म्हणाले, ""कोकणामध्ये मुंबई, पुणे, ठाणे आदी विविध भागांतून चाकरमानी दाखल झाले आहेत. त्यांना त्या त्या गावातील शाळेमध्ये तसेच घरामध्ये विलगीकरण करून ठेवण्यात आले आहे. मात्र, त्यांची स्वॅब टेस्ट करण्याची यंत्रणा या ठिकाणी उपलब्ध नसल्याने आपल्याला दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागत आहे. रायगड, रत्नागिरीमध्ये आम्ही केलेल्या मागणीनुसार त्या ठिकाणी तत्काळ यंत्रणा उभारण्यात आली. मात्र, सिंधुदुर्गमध्ये कोरोनाबरोबरच माकड तापासारखे संकट असतानाही या ठिकाणी ही व्यवस्था होत नाही, हे दुर्दैवी आहे. विरोधी पक्ष म्हणून लोकशाहीने आम्हाला दिलेल्या अधिकाराचा वापर करीत आम्ही कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कुठल्याही प्रकारचे राजकारण न करता आवश्‍यक सूचना राज्य शासनाला करत आलो. मात्र, शासनाने आमच्या सूचनांकडे वेळोवेळी दुर्लक्ष केले. जनतेच्या आरोग्याबाबत दुर्लक्ष करणाऱ्या राज्य शासनाच्या विरोधात आम्ही आंदोलनाची भूमिका घेतली आहे. राज्यातील जनतेने आपल्या कुटुंबासह अंगणात उभे राहून काळ्या फिती बांधून तसेच हातात कागद घेऊन त्यावर आपली मागणी लिहून शासनाचा निषेध व्यक्त करायचा आहे.'' 

कोकणात आज काजूला दर नाही, तर आंब्याला मार्केट नाही. आंबा कॅनिंग दर 35 ते 40 रुपये मिळत होता. मात्र, आज 15 रुपये एवढा दर मिळाला आहे. कोकणी माणूस शेतीवर जगत आहे. मात्र, त्यांच्याबाबतीत उपाययोजना करण्याची गरज असताना शासनाकडून कुठल्याच हालचाली होत नाहीत. पावसाळा तोंडावर आला आहे. 31 मे अगोदर शेतकऱ्यांपर्यंत खते, बियाणे पोचणे गरजेचे आहे. मात्र, हे भात बियाणे जिल्ह्यात उपलब्ध झाले आहे का, ते पुरेसे उपलब्ध झाले आहे का, हे महत्त्वाचे आहे.'' 
- रवींद्र चव्हाण, भाजप नेते 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: press conference ravindra chavan konkan sindhudurg