आता माघार नाही : शिवसेना तालुकाप्रमुखाची भुमिका...

 press conference in savantwadi kokan marathi news
press conference in savantwadi kokan marathi news

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : शहराची शांतता बिघडू नये यासाठी नगराध्यक्ष या नात्याने संजू परब यांनी आठ दिवसात व्यापार्‍यांशी, नागरिकांशी चर्चा करून आठवडा बाजाराबाबत योग्य तोडगा काढावा. आज जरी पालिकेने बाजार जिमखाना येथे भरविला असला तरी जनतेचा व सामाजिक बांधीलकीचा विचार करता पुढच्या मंगळवारी हा बाजार तेथे भरवू देणार नाही, असा इशारा शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांच्यासह शिवसेनेच्या नगरसेवकांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिला.

सावंतवाडी आठवडा बाजाराची जागा जिमखाना मैदानावर हलविण्यावरून येथे वाद निर्माण झाला आहे. या वादात शिवसेनेने व्यापार्‍यांच्या बाजून उभे राहताना पालिका सत्ताधार्‍यांना टिकेचे लक्ष्य केले होते. जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी तर प्रसंगी व्यापार्‍यासाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला होता. याच पार्श्‍वभुमिवर पालिका प्रशासनाकडे शिवसेनेने निवेदनाद्वारे लक्ष वेधताना हा बाजार पुर्वीप्रमाणे उभाबाजार येथे भरविण्यात यावा, अशी मागणी केली होती; मात्र याचा कोणताही विचार न होता आजचा आठवडा बाजार हा पुन्हा जिमखाना येथे भरविला.

उपस्थिती

यानंतर शिवसेनेच्या वतीने तालुकाप्रमुख राऊळ, प्रवक्ते डॉ. जयेंद्र परूळेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भुमिका स्पष्ट केली. यावेळी नगरसेविका अनारोजीन लोबो, शहरप्रमुख तथा नगरसेवक बाबु कुडतरकर, तालुका महीला संघटक अपर्णा कोठावळे, रश्मी माळवदे, नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, नगसेविका भारती मोरे, दिपाली सावंत, माधुरी वाडकर, प्रशांत कोठावळे, अशोक दळवी, बबन राणे, अमेय प्रभुतेंडोलकर, शैलेश गवंडळकर, गजानन नाटेकर आदी उपस्थित होते.

शहरात शांतता बिघडविण्याचे काम

श्री. राऊळ म्हणाले, “सत्तेच्या माध्यमातून व्यापार्‍यांना धमक्या देऊन आठवडा बाजाराबाबत सगळ्या गोष्टी रंगविण्यात आल्या आहेत; मात्र कुठल्याही प्रकारचा ठराव न घेता हा आठवडा बाजार दुसरीकडे हलविण्यात आला आहे. मागच्या आठवडा बाजारात झालेल्या गोष्टी विचारात घेता नगराध्यक्ष श्री. परब यावर तोडगा काढतील अशी अपेक्षा होती; मात्र त्यांना ते जमले नाही. त्यामुळे शहरात शांतता बिघडविण्याचे काम ते करत आहेत. जनतेचा व सामाजिक बांधीलकीचा विचार करता आता शिवसेना गप्प बसणार नसुन हा बाजार आज जरी जिमखाना येथे भरला तरी तो पुढच्या मंगळवारी तेथे भरवू देणार नाही. यासाठी रस्तावर उतरू. यावेळी डोकी फुटली तरी चालेल; मात्र मागे हटणार नाही.”

पालिका नियमावर चालते
श्री. परब यांना काहीतरी करून दाखवायचे होते तर त्यांनी येत्या एप्रिल, मे मध्ये ग्रामीण भागातून येणार्‍या आंबा विक्रेत्यांना चांगली जागा उपलब्ध करून देऊन जनतेच्या हिताचे काम दाखवावे; मात्र असे वादाचे विषय करून शहराची शांतता बिघडविण्याचे काम करू नये, असेही श्री. राऊळ म्हणाले.
नगरसेविका लोबो म्हणाल्या, “पालिका ही नियमावर चालते. हे घर नव्हे आपली मालकी सिध्द करायला. त्यामुळे कोणाला धमक्या देऊ नका. याठिकाणी हमरीतुमरीची भाषा चालत नाही; मात्र काही झाले तरी पुन्हा बाजार जिमखाना मैदानावर भरायला देणार नाही. आज शहरातील बाजारपेठेतील व्यापार्‍यांचा विचार करता प्ररप्रांतिय लोक आठही दिवस शहरातील मुख्य बाजारपेठेत आपला धंदा करतात. या लोकांना जर जिमखाना येथे जागा उपलब्ध करून दिली तर त्यांना बाकीचे सहा दिवस मुख्य बाजारपेठेत बसायला देऊ नका.”

नियमानुसार चालल्यास विरोध नाही
त्या पुढे म्हणाल्या, “आम्हाला कोणतीही कल्पना न देता नागरिकांच्या तक्रारी आल्या आहेत असे सांगुन पत्रकार परिषद घेतली. जिमखान्यावरील जागा क्रीडांगण म्हणुन सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आरक्षित आहे. तेथे धुळीचे साम्राज्य आहे. उन्हाचा त्रास आहे. अशा परिस्थित तेथे बाजार हलविणे योग्य नाही. बाजारपेठेतील स्थानिक व्यापार्‍यांचा विचार करता उभाबाजार, भाजी मंडई, गांधीचौक आदी परिसरात बाजार भरविणे गरजेचे होते. नियमाला धरून कोणत्याच गोष्टी सत्ताधार्‍याकडून केल्या जात नाहीत. नियमानुसार चालल्यास आमचा कोणताही विरोध नाही.”

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com