लॅबबाबत खुशाल राजकारण करा - उदय सामंत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 मे 2020

ते मुंबईत असल्याने त्यांनी सिंधुदुर्गात लॅब व्हावी यासाठी प्रयत्न केले. त्यांना आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक यांनीही चांगले सहकार्य केले असे सांगितले. 

ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यासाठी मंजूर झालेली कोरोना तपासणी लॅब सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा रुग्णालयात येत्या पंधरा ते वीस दिवसांत सुरू होईल. यामध्ये कोणतेही राजकारण नसून लॅब व्हावी एवढेच आपले प्रामाणिक प्रयत्न आहेत. ज्यांना राजकारण करायचं त्यांनी ते खुशाल करावे असा सल्ला पालकमंत्री उदय सामंत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत विरोधकांना दिला. 

पालकमंत्री सामंत यांनी रत्नागिरी येथून झूम ऍपच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना पालकमंत्री सामंत यांनी, रत्नागिरीमध्ये कोरोना तपासणी लॅब मंजूर झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिंधुदुर्गमधीलही कोरोना तपासणी लॅबला मंजुरी दिली आहे. आपल्या जिल्ह्यातुन पूर्ण कागदपत्रांसह पाठविलेला प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी केवळ चार दिवसात मंजूर केला आहे. या मंजुरीसाठी खासदार विनायक राऊत यांनी चांगला पाठपुरावा केला. ते मुंबईत असल्याने त्यांनी सिंधुदुर्गात लॅब व्हावी यासाठी प्रयत्न केले. त्यांना आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक यांनीही चांगले सहकार्य केले असे सांगितले. 

या लॅब संदर्भातील नियमावली उद्यापर्यंत जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त होईल. यासाठी 61 ते 65 लाख रुपयांपर्यंतचे कोटेशन प्राप्त झाले असून, हा सर्व निधी जिल्हा नियोजन समितीमधून देण्यात येणार आहे. तशी मान्यता ही घेतली आहे. या लॅबसाठी अजून निधी लागल्यास तोही जिल्हा नियोजन मधून देण्यात येईल. ही लॅब पंधरा ते वीस दिवसांमध्ये सुरू होईल असा विश्वासही सामंत यांनी व्यक्त केला. 

खासगी ठिकाणी लॅब झाल्यास त्या लॅबमधून तपासणीसाठी पैसे मोजावे लागणार होते. त्यापेक्षा शासकीय लॅब होणे अधिक चांगले. असे सांगतानाच काहीजण माहितीच्या अधिकाराखालील कागदपत्रे नाचवत आहेत. त्यांना ती नाचवूं दे. आपण जिल्हावासियांशी प्रामाणिक आहोत. हे सर्व करत असताना यामागे कोणताही राजकारणाचा उद्देश नाही. ज्यांना राजकारण करायचं त्यांनी ते कराव. गेल्या दोन महिन्यात जिल्हावासीयांना कोण मदत करत आहे? कोण उपयोगी पडत आहे? हे जिल्हावासीयांनी स्वतः अनुभवलेले आहे. त्यामुळे जिल्हावासीय याचे उत्तर निवडणुकांमधून देतील, असे ते म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: press conference uday samant oros sindhudurg district