शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यातून 'या' जिल्ह्यांना वगळले 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 जून 2019

राज्यभरात 800 पेक्षा अधिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या झाल्या; मात्र खुला प्रवर्ग वगळून इतर सर्व प्रवर्गाच्या रिक्त पदावर आंतरजिल्हा बदल्या करण्यात आल्या. शिवाय त्यातून सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे व पालघर जिल्ह्यांना वगळले आहे. 

दोडामार्ग - ग्रामविकास विभागाने 13 जूनला जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचा तिसरा टप्पा घोषित केला. या टप्प्यात राज्यभरात 800 पेक्षा अधिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या झाल्या; मात्र खुला प्रवर्ग वगळून इतर सर्व प्रवर्गाच्या रिक्त पदावर आंतरजिल्हा बदल्या करण्यात आल्या. शिवाय त्यातून सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे व पालघर जिल्ह्यांना वगळले आहे. 

2017 पासून शासनाच्या ग्रामविकास विभागाने पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त पद्धतीने शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या व्हाव्यात, यासाठी ऑनलाईन पद्धतीचा अवलंब केला. आजपर्यंत झालेल्या आंतरजिल्हा बदल्यात 10 हजारपेक्षा अधिक आंतरजिल्हा बदल्या झाल्या आहेत; मात्र खुल्या प्रवर्गाच्या वाट्याला अत्यंत नगण्य आंतरजिल्हा बदल्या आल्या आहेत.

तिसऱ्या टप्प्यात तर एकही आंतरजिल्हा बदली राज्यभरात झालेली नाही. 12 डिसेंबर 2018 ला ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हा परिषदांना खुल्या प्रवर्गाचा रिक्त जागा ट्रान्सफर पोर्टलवर नोंदवू नयेत अशा प्रकारचे आदेश दिले होते. त्यानंतर 6 फेब्रुवारीला परत एकदा सर्व जिल्हा परिषदांना बदलीच्या पोर्टलवर रिक्त पदे भरण्यासंदर्भात आदेशित केले होते.

आंतरजिल्हा बदलीच्या तिसऱ्या टप्प्यात केवळ रिक्त पदांवर आंतरजिल्हा बदल्या केल्या आहेत. आंतरजिल्हा बदलीच्या तिसऱ्या टप्प्यात साखळी पद्धतीचा अवलंब केला नसल्याने यावेळी आंतरजिल्हा बदल्या खूप कमी झाल्या आहेत. प्रत्येक जिल्हा परिषदेच्या सीईओ लॉगिनला इन्कमिंग व आऊटगोइंग अशा दोन प्रकारच्या याद्या ग्रामविकास विभागाने पाठवल्या आहेत. 

30 नोव्हेंबर 2018 ला मराठा आरक्षणाची (16) घोषणा झाली आणि त्यानंतर संवर्णांसाठीचे आरक्षण (10) जाहीर झाले. या दोन आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हा परिषदांना नव्याने बिंदुनामावली अद्ययावत करण्यासाठी निर्देश केले आहेत. त्यामुळे नव्याने बिंदुनामावली अद्ययावत करण्याचे काम सर्व जिल्हा परिषद सुरू आहे. 

खुल्या प्रवर्गाच्या वाट्याला अगोदर 48 टक्के जागा येत होत्या; मात्र नवीन आरक्षण धोरणानुसार आता केवळ 22 टक्के जागा या खुल्या प्रवर्गाचा वाट्याला येतात. त्यामुळे खुल्या प्रवर्गाच्या वाट्याला रिक्त पदे न आल्यामुळे आंतरजिल्हा बदल्या झाल्या नाहीत अशा चर्चा आहेत; मात्र बुलढाणा, रायगड या ठिकाणी नवीन आरक्षण धोरणानुसार खुल्या प्रवर्गास रिक्त जागा मिळूनही त्या ठिकाणी आंतरजिल्हा बदल्या झाल्या नाहीत. राज्यभरात झालेल्या जिल्हा परिषदांतील बिंदुनामावली घोटाळ्यामुळेही ओपन प्रवर्गाच्या आंतरजिल्हा बदल्या झाल्या नाहीत, अशी टीका खुला प्रवर्ग कर्मचारी महासंघाचे राज्यनेते सनिदेवल जाधव यांनी केली आहे. 

राज्यभरात अकरा हजारपेक्षाही अधिक खुल्या प्रवर्गात रुजू झालेले गुणवंत शिक्षक स्वजिल्ह्यात जाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. तिसऱ्या टप्प्यात एकही आंतरजिल्हा बदली न झाल्यामुळे खुल्या प्रवर्गात रुजू शिक्षकांमध्ये मानसिक तणाव निर्माण होऊ शकतो. त्यामुळे शासनाने धोरणात्मक निर्णय घेऊन खुल्या प्रवर्गात रुजू झालेल्या हजारो शिक्षकांना स्वजिल्ह्यात जाण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची मागणी केली जात आहे. 

तिसऱ्या टप्प्यात अन्याय 
10 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक शिक्षकांची पदे रिक्त असलेल्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे व पालकर या कोकणातील जिल्ह्यांचा आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत समावेश केलेला नाही. त्यामुळे या भागात परजिल्ह्यातील कार्यरत शिक्षक व्यथित आहेत. दुसऱ्या टप्प्यातही या जिल्ह्यांचा समावेश नव्हता. त्यामुळे सेवाकनिष्ठ शिक्षकांची इतर जिल्ह्यातून स्वजिल्ह्यात आंतरजिल्हा बदली होत आहे; मात्र या जिल्ह्यात कार्यरत असलेल्या सेवाज्येष्ठ शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या रोखण्याची वेळ आली आहे. एकंदरीत कोकण आणि खुल्या प्रवर्गावर तिसऱ्या टप्प्यात अन्याय झाल्याचे चित्र आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: primary Teacher inter district transfer report