रुग्णांना धीर देण्याऐवजी लूटच ; आठ लाख बील होतच कसं ?

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 14 October 2020

पत्रकारांनी लुटीच्या मुद्याला हात घातला. तेव्हा खासगी कोविड सेंटरमधील अनेक प्रकार पुढे आले.

रत्नागिरी : खासगी कोविड सेंटरकडून होणारी आर्थिक लूट थांबविण्यासाठी चौकशी समिती नेमूनही रुग्णांची बिले आठ लाखावर गेल्याचे साक्षात मंत्र्यांनी उघड केले. यामुळे आरोग्य यंत्रणेसह प्रशासनाचे डोळे विस्फारले आहेत. दस्तुरखुद्द उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडेच याबाबत तक्रार आल्याने त्यांनी संपूर्ण यंत्रणेला कामाला लावले आहे.

पत्रकार परिषदेमध्ये सामंत म्हणाले, हा लोकांना लुटण्याचा प्रकार आहे. याची गांभीर्याने दखल घेऊन कोविड सेंटरच्या बिलांबरोबर सर्व कारभाराची चौकशी करण्याचे आदेश यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले आणि आरोग्य अधिकारी बबिता कमलापुरे यांना दिले आहेत. पत्रकारांनी लुटीच्या मुद्याला हात घातला. तेव्हा खासगी कोविड सेंटरमधील अनेक प्रकार पुढे आले.

हेही वाचा - मत्स्योत्पादनावर चक्रीवादळाचा परिणाम ; साडेसात हजार टन घटले -

एखादा पॉझिटिव्ह रुग्ण खासगी रुग्णालयात गेला तर संपूर्ण कुटुंबाला दाखल करून घेतले जाते. एका दिवसाचे बिल ३१ हजार रुपये आकारले जाते. सर्व औषध देखील रुग्णांच्या बिलातच लावली जातात. ॲन्टीजेन टेस्टबाबत अनेक तक्रारी आहेत. असा पाढाच त्यांच्यासमोर वाचला. त्यावर सामंत यांना आलेला अनुभवच त्यांनी सांगितला. रत्नागिरीत एका रुग्णाचे बिल ८ लाख रुपये केल्याची तक्रार माझ्यापर्यंत आली. मी जेव्हा संबंधित हॉस्पिटलला फोन केला तेव्हा ते दीड आणि दोन लाखावर आले.

मग हे ८ लाख बिल कसे झाले? असे सांगुन कोविड रुग्णांची लूट थांबविण्यासाठी तालुकास्तरावर नेमलेल्या चौकशी समित्या करतात काय? समित्या असताना रुग्णालये ८ लाखापर्यंत बिल करण्याचे धाडस करतात कशा? अशा प्रश्‍नावर चर्चा झाली. तेव्हा ही बाब अतिशय गंभीर आहे. जिल्ह्यातील २८ खासगी कोविड सेंटरच्या बिलांचीच नव्हे तर सर्व कारभाराची चौकशी करून त्यांच्यावर योग्य कारवाई करा, असे आदेश उदय सामंत यांनी आरोग्य यंत्रणेला दिले. 

हेही वाचा -  चिऱ्यापासून टाईल्स! देवगडात तंत्र विकसित -

रुग्णांना धीर देण्याऐवजी लूट

ज्या कोविड रुग्णांना डॉक्‍टरांनी आधार आणि धीर देण्याची गरज आहे, तिथेच त्यांची आर्थिक लूट होत असेल तर त्यांची मानसिकता बरे होण्याची राहील का? असा सवाल करून बिलावर अंकुश लावण्यासाठी तुम्ही सर्व कोविड सेंटरची चौकशी करा, असे डॉ. फुले आणि डॉ. कमलापुरे यांना सामंत यांनी सांगितले.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: private covid centers charges rupees 8 lakh from covid patients uday samant asked a question to administration in ratnagiri