खासगी ट्रॅव्हल्सचा चाकरमान्यांना झटका

राजेश शेळके
Friday, 23 August 2019

येताना गाडी फुल्ल असली तरी...
रत्नागिरी-मुंबई अशा एका फेरीला स्लीपर एसीला २१ हजारांचा डिझेल खर्च आहे. तर नॉन एसीला १७ ते १८ हजारांपर्यंत खर्च आहे. येताना गाडी फुल्ल असली तरी जाताना कमी प्रवासी असतात. त्यामुळे तो भुर्दंड आमच्यावर पडतो. अनेक ट्रॅव्हल्स मुंबईत कॉन्ट्रॅक्‍टबेसवर चालवायला दिल्या आहेत. गणेशोत्सवाच्या काळात त्यांनी ही दरवाढ केली आहे. तीन ते चार दिवस ही दरवाढ राहणार आहे, अशी माहिती येथील एका ट्रॅव्हल्सचालकाने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

रत्नागिरी - ऐन गणेशोत्सवाच्या काळात खासगी ट्रॅव्हल्सधारकांनी चाकरमान्यांना झटका दिला आहे. राज्यात पूरपरिस्थितीने सर्वत्र सहानुभूतीचे वातावरण असताना ट्रॅव्हल्स चालकांनी भाडेवाढीचा निर्णय घेतला आहे. मुंबई ते रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूरपर्यंत जाणाऱ्या बिगर वातानुकूलित आणि स्लीपर बसचे भाडे दुप्पट ते अडीचपट करण्यात आले आहे. २५ ऑगस्टपासून त्याची अंमलबजावणी होणार असून ती तीन ते चार दिवस असणार आहे.

मुंबई ते रत्नागिरी बिगर वातानुकूलित गाडीचे भाडे  ३५० ते  ७०० वरून ९०० ते ११०० तर वातानुकूलित स्लीपर गाड्यांचे पूर्वीचे  ५५० ते ६०० रुपयांवरून आता १३०० ते १७०० रुपयांवर गेले आहे. कोकण व कोल्हापुरातील भक्तांना मोठा भुर्दंड सोसावा लागणार आहे. दरवर्षी गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी नियमित गाड्यांबरोबर मध्य व पश्‍चिम रेल्वेकडून जादा रेल्वे गाड्या सोडल्या जातात. मात्र, यंदा गाड्यांचेही आरक्षण फूल झाले आहे. तिकिट काढताना प्रतीक्षा यादी पाहावी लागते. याशिवाय एसटी महामंडळाने २२०० जादा गाड्या सोडण्याची घोषित केले. मात्र, त्यापैकी २ हजार २८ गाड्यांचे आरक्षण झाल्याचे समजते. 

कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसमोर हे संकट उभे आहे. भाड्याने खासगी वाहन घेऊन जाणे किंवा खासगी बस ट्रॅव्हल्सने जाण्याशिवाय पर्याय नाही. हीच संधी साधून खासगी प्रवासी बस वाहतूकदारांनी २५ ऑगस्टपासून भाडेवाढीचा निर्णय घेतला आहे. प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन आरक्षण करताना ही भाडेवाढ झाल्याची दिसते. मुंबई ते रत्नागिरी मालवणपर्यंत जाण्यासाठी दुप्पट ते अडीचपट भाडे प्रवाशांना मोजावे लागते. हीच परिस्थिती कोल्हापूर, सांगलीला खासगी बसने जाणाऱ्यांची होणार आहे.

गणेशोत्सव काळात कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना भूर्दंड पडू नये, यादृष्टीने आमचा प्रयत्न आहे. खासगी ट्रॅव्हल्सधारकांना दीडपट तिकीट आकारू शकतात. मात्र, त्यापेक्षा जास्त आकारल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल. आम्ही त्याविरुद्ध मोहीम आखली आहे. प्रवाशांनी आमच्याकडे तक्रार केल्यास खातरजमा करून योग्य ती कारवाई होईल.
- विनोद चव्हाण, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, रत्नागिरी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Private Travels Rate Increase Ganeshotsav