esakal | महाविदयालय व्यवस्थापनाला परीक्षा केंद्राची माहितीच नाही ; परिक्षार्थीं गोंधळात, दापोलीतील घटना

बोलून बातमी शोधा

problem face by students in dapoli center not declared by a exam center}

महाविदयालयाच्या व्यवस्थापनाला परीक्षेचे हे केंद्र असल्याची माहिती आज सकाळीच देण्यात आल्याने परीक्षार्थींना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.

महाविदयालय व्यवस्थापनाला परीक्षा केंद्राची माहितीच नाही ; परिक्षार्थीं गोंधळात, दापोलीतील घटना
sakal_logo
By
चंद्रशेखर जोशी

दाभोळ (रत्नागिरी) : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विविध पदांच्या भरतीसाठी आज राज्यभरात विविध केंद्रावर परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेसाठी दापोली येथील वराडकर बेलोसे महाविदयालय केंद्रावर सकाळी चांगलाच गोंधळ उडाला. महाविदयालयाच्या व्यवस्थापनाला परीक्षेचे हे केंद्र असल्याची माहिती आज सकाळीच देण्यात आल्याने परिक्षार्थींना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.

परिक्षार्थींना केंद्रावरील परीक्षा रद्द करा अशी मागणी केली. मात्र परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार परीक्षा केंद्रावरील अधिकार्‍यांना नाही असे सांगण्यात आले. यावेळी परिक्षार्थींना परीक्षेला बसणार नसल्याचे सांगितल्यावर या केंद्रावर आलेले भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष केदार साठे यांनी त्यांची समजुत काढली. या वातावरणानंतर सर्व परिक्षार्थींना परीक्षा देण्यासाठी तयार झाले.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 'मल्टी पर्पज हेल्थ वर्कर 40 टक्के' या पदासाठी आज सकाळी 10 ते 12 या वेळेत परीक्षा होती. दापोली शहरातील नॅशनल हायस्कूल व आर.आर. वैद्य इंग्लिश मिडीयम स्कूल तसेच वराडकर बेलोसे महाविदयालय ही तीन परीक्षा केंद्र होती. राज्यभरातून अनेक परीक्षार्थी काल (27) रोजीच दापोलीत दाखल झाले होते.

परिक्षार्थींना आज सकाळी 8.30 वाजता वराडकर बेलोसे महाविदयालय केंद्रावर आले. मात्र महाविदयालयाच्या व्यवस्थापनाला परीक्षेचे हे केंद्र असल्याचे  माहितच नसल्याने गोंधळ उडाला. महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश निंबाळकर हे आर. आर. वैद्य इंग्लिश मीडीयम स्कूल येथील परीक्षा केंद्राचे प्रमुख होते. अनेक विद्यार्थी महाविदयालयात परीक्षेला आल्याची माहिती मिळताच त्यांनी महाविदयालय गाठले आणि शासकीय अधिकार्‍यांशी संपर्क सुरु केला. 

सकाळी 9.30 वाजेपर्यंत परीक्षा केंद्रावर किती परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत याची माहिती देण्यात आली नव्हती. तसेच परिक्षार्थीचे क्रमांकही देण्यात आले नव्हते. 9.45 वाजता या संदर्भातील सर्व मुद्दे निकाली निघाल्यावर एका वर्गात 24 परीक्षार्थी असे 24 वर्गात 576 क्रमांक लिहिण्यात आले. त्यानंतर सर्व परीक्षार्थींना वर्गात बसण्याची सूचना दिल्यावर परीक्षार्थींनी परीक्षा रद्द करा अशी मागणी केली.

मात्र या परिक्षाकेंद्रात आलेले दापोलीचे निवासी नायब तहसीलदार सुरेश खोपकर व सहाय्यक पोलिस निरीक्षक पूजा हिरेमठ, गटशिक्षणाधिकारी भोसले यांनी या केंद्रावरील अधिकार्‍यांना परीक्षा रद्द करण्याचा अधिकार नसल्याचे सांगितले. संतप्त परीक्षार्थींनी आम्ही परीक्षाच देणार नाही असे सांगितल्यावर तेथे उपस्थित असलेले भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष केदार साठे यांनी परीक्षार्थींची समजुत काढली.

हेही वाचा - पूजा चव्हाण प्रकरणावरून दीवार आठवला; नितेश राणेंचा शिवसेनेवर घणाघात -

या परीक्षेसाठी शेगाव, बुलडाणा, सांगली अशा राज्यातील विविध ठिकाणाहून परिक्षार्थी आले होते. त्यांनी या परीक्षेचा अर्ज दाखल करताना त्यांना जवळचे असे परीक्षा केंद्र दिले होते. मात्र प्रत्यक्षात त्यांना दापोली हे केंद्र देण्यात आल्याने विदयार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात तेढ निर्माण झाला होता.

या परीक्षेसाठी निरीक्षक (ऑब्झर्वर) म्हणून दापोलीतील एका स्थानिक युवकाची नियुक्ती करण्यात आली होती. पण त्याला ही परीक्षा कोण घेत आहे, आपले वरिष्ठ कोण आहेत याचीच माहिती नव्हती.

दापोली पोलिस ठाण्याला दापोली शहरात तीन परीक्षा केंद्र असल्याची माहिती होती. त्यामुळे या तीनही परीक्षा केंद्रावर प्रत्येकी एक अशा तीन कर्मचार्‍यांची बंदोबस्तासाठी नियुक्ती करण्यात आली होती.

परिक्षार्थीच्या हॉल तिकिटावरही दापोलीच्या वराडकर बेलोसे महाविदयालय या परीक्षा केंद्राचे नाव होते.