मंडणगडातील शेतीला खारभूमीचे ग्रहण; उंबरशेतमधील 25 हेक्‍टर धोक्‍यात

सचिन माळी
Friday, 20 November 2020

मंडणगड तालुक्‍यातील उंबरशेत गावाच्या कार्यक्षेत्रात सावित्री खाडी किनाऱ्यावरील खारे पाणी अडविणारा धूपप्रतिबंधक बंधारा अनेक ठिकाणी निकामी झाला आहे. त्यामुळे खलाटी भातशेतीत खाडीच्या पाण्याचा शिरकाव झाल्याने शेकडो एकर जमीन नापीक बनली आहे.

मंडणगड ( रत्नागिरी)  - तालुक्‍यातील खारभूमीचा प्रश्‍न मोठा आहे. सावित्री खाडीकाठच्या 14 गावांना ही समस्या भेडसावत आहे. उंबरशेत गाव हे त्या मालिकेतील आणखी एक. खाडीच्या पाण्याने गावातील 25 हेक्‍टर शेती धोक्‍यात आली आहे. या पद्धतीने खारे पाणी शेतात घुसू लागले तर शेतकरी भूमिहीन होण्याचा धोका आहे. बंधारा फुटल्याने सावित्रीचे खारे पाणी घुसून जमीन नापीक होत चालली आहे. शिवाय खारभूमीत वाढणाऱ्या वनस्पतींचे जंगल तेथे उभे राहिले आहे. या जागेत शेती करणे आता अशक्‍यप्राय ठरते आहे. वारंवार शासनाकडे मागणी करूनही येथील खारभूमी बंधाऱ्याची दुरुस्ती झालेली नाही. या वेगाने जमिनीत खारे पाणी घुसले तर आधीच भूमिहीन असलेला शेतकरी शेतीहीन होण्याचा धोका आहे. येथील शेतकऱ्याला रोजगारासाठी गाव सोडावे लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकार बदलले, पुढारी बदलले तरी आश्‍वासने कायम आणि खारभूमी बंधाऱ्याची भगदाडेही कायम आहेत. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहू म्हणणाऱ्या सरकारकडे येथील बळिराजा तरीही आशेने पाहात आहे. 

मंडणगड तालुक्‍यातील उंबरशेत गावाच्या कार्यक्षेत्रात सावित्री खाडी किनाऱ्यावरील खारे पाणी अडविणारा धूपप्रतिबंधक बंधारा अनेक ठिकाणी निकामी झाला आहे. त्यामुळे खलाटी भातशेतीत खाडीच्या पाण्याचा शिरकाव झाल्याने शेकडो एकर जमीन नापीक बनली आहे. गावाच्या खलाटीतील 25 हेक्‍टर म्हणजे 62.5 एकर भातशेतीला धोका निर्माण झाला असून शेतकऱ्यांचे उपजीविकेचे साधनच नष्ट होत चालले आहे. येथील शेतकरी भूमिहीन बनत आहे. 

मंडणगड तालुक्‍यातील उंबरशेत गावाची लोकसंख्या सुमारे 425 इतकी आहे. प्रमुख व्यवसाय शेती असणाऱ्या या गावाचे एकूण क्षेत्रफळ 153 हेक्‍टर असून 32 हेक्‍टर क्षेत्र भातशेती लागवडीखाली आहे. पाणथळ खलाटी परिसर असल्याने वर्षानुवर्षे येथील शेतकरी दुबार पिकं घेत आला. पावसाळी भात, नाचणी तर त्यानंतर विविध प्रकारची कडधान्य पिके उत्पादित केली जात होती. त्यातून गावातील अनेक शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळत असल्याने उपजीविकेचे प्रमुख साधन होते; मात्र या शेतीला संरक्षण म्हणून खाडीचे पाणी अडविणारे जुने मातीचे बंधारे तीन ते चार ठिकाणी पाण्याच्या पुराने फुटले. परिणामी सावित्री खाडीचे खारे पाणी खलाटी परिसरात घुसून पसरू लागले. या पाण्यातून वाहून आलेला गाळ, घाण, कचरा शेतातून पसरला. यात पीक घेणे मुश्‍किल झाल्याने शेतकऱ्यांनी जमिनी ओसाड ठेवण्यास सुरवात केली.

त्यामुळे खाडीकिनारी व खारभूमीत जगणाऱ्या वनस्पती यामध्ये (बेशरम, मंग्रोज ) वाढू लागल्या. त्याची हळूहळू जंगले उभी राहू लागली. परिणामी शेतीक्षेत्र घटू लागले. शेतकऱ्यांनी अनेक वर्षांपासून नादुरुस्त बंधारे नव्याने बांधण्यात यावेत, अशी मागणी केली आहे. मात्र याकडे शासन, प्रशासन यांनी दुर्लक्ष केल्याने येथील शेतकऱ्यांवर शेतीहीन आणि पर्यायाने भूमिहीन होण्याची वेळ आली आहे.

दुबार शेती नष्ट झाली आहे. ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधींची दारे ठोठावली आहेत. शेती वाचवण्याची विनंती केली आहे. त्यांच्या या मागणीकडे डोळस नजरेने पाहून त्यांना दिलासा देण्याचे विधायक काम होणार का, याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागून राहिले आहे. 

खारफुटी, कांदळवनाचे बनतेय जंगल 
खाडीचे खारे पाणी शेतात घुसून जमीन नापीक आणि पडीक बनत चालली असून या जागेवर खारफुटी, कांदळवन, मंग्रोज वनस्पतींचे जंगल तयार झाले आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या जमिनी हिरावून घेतल्या जात आहेत. बारमाही पाणी साचून राहिल्याने दलदल निर्माण होऊन खाजण बनले आहे. 

उद्‌ध्वस्त खलाटीत मत्स्यशेतीचा पर्याय 
खाडीच्या अतिक्रमणामुळे नष्ट झालेल्या शेतातून मत्स्यशेतीचा पर्याय उपलब्ध झाल्यास येथील शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. पडीक जागेवर कोळंबी, खेकडा, मासे निर्माणीचे प्रोजेक्‍ट उभे राहिल्यास हे गाव मत्स्य उत्पादनाचे केंद्र बनू शकेल. यासाठी दीर्घकालीन धोरण अन्‌ सरकारी मदतीची गरज आहे. 

खाडी किनाऱ्यावरील अनेक गावांची समस्या 
सावित्री खाडीकिनाऱ्यावरील लोकरवण, पडवे, पेवेकोंड, पणदेरी, कोंडगाव, गोठे खलाटी, भामघर चौकी, घुमरी, उमरोली, वेसवी, वेळास, साखरी, आंबवली, खारी या गावांची अशीच अवस्था असून शेतीला फटका बसला आहे. शासनाने विशेष मोहीम राबवून ही समस्या सोडवावी, अशी मागणी करण्यात येत आहे. खाडीपट्ट्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा "सकाळ'ने सातत्याने मांडल्या आहेत. त्यामुळे आमचे म्हणणे शासन, प्रशासनदरबारी पोहचत असून प्रश्न मार्गी लागण्याची आशा निर्माण झाल्याचे उंबरशेत ग्रामस्थ नरेश बोर्ले यांनी सांगितले. 

माजी खासदार अनंत गीते यांच्या पुढाकाराने उंबरशेत, कोंडगाव येथील धूपप्रतिबंधक बंधारे विशेष बाब म्हणून घेणार असल्याचे 2018 साली तत्कालीन मंत्री दिवाकर रावते यांनी सांगितले होते. विद्यमान मंत्री अब्दुल सत्तार यांनीही आता तेच सांगितले आहे. इथला शेतकरी आशेवर जगत आहे. 
- अजित मोरे, अध्यक्ष 

आमदार योगेश कदम यांच्या पुढाकाराने यावर्षी हा प्रश्न मार्गी लागेल अशी आशा आहे. तसे न झाल्यास शेती नष्ट होऊन रोजगारासाठी गाव सोडावे लागेल. खारे पाणी घुसल्याने प्रचंड दलदल होत आहे. 
- वसंत पोळेकर, शेतकरी 

कोकणात विशेषतः मंडणगड तालुक्‍यात खारभूमी प्रश्न मोठा आहे. त्यासाठी विशेष प्रयत्न केले असून कोंडगाव येथील खार प्रतिबंधक बंधारा मंजूर झाला असून लवकरच त्याचे काम सुरू होईल तर उंबरशेत येथील शेती सुरक्षित करण्याच्यादृष्टीने विशेष बाब म्हणून त्यालाही लवकरच मंजुरी मिळेल. त्यासाठी संबंधित विभागाकडे पाठपुरावा सुरू आहे. 
- योगेश कदम, आमदार   
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Problems Of Saline Land In Mandangad 25 Hectors Land Affected In Umberkhet