
'सकाळ' मीडिया, सावंतवाडी पोलिस आणि आरपीडी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या वतीने "वेगाची नशा थांबवायला हवी' या कार्यक्रमात
व्हिडिओ : सकाळ, सावंतवाडी पोलिस आणि आरपीडीतर्फे तरुणाईचे प्रबोधन......
सावंतवाडी - बेशिस्तपणे धूम स्टाईलने दुचाकी हाकताना तरुण पिढीने सर्वात प्रथम आपल्याला आपल्या कुटुंबीयांच्या मानसिक भावना समजून घ्यायला हव्यात. त्या भावनांची कदर करायला हवी. दुचाकी हाकताना आपली एक चूक आपल्या जीवावर बेतणार नाही, याची दक्षता आजच्या तरुण पिढीने घ्यायला हवी. यासाठी वेगावर आणि मनावर या वयातच नियंत्रण ठेवायला शिका, असे आवाहन आज येथील पोलिस निरीक्षक सुनील धनावडे यांनी केले.
वेगाची नशा थांबवायला हवी
'सकाळ' मीडिया, सावंतवाडी पोलिस आणि आरपीडी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या वतीने "वेगाची नशा थांबवायला हवी' या कार्यक्रमात ते बोलत होते. येथील आरपीडी हायस्कूलच्या नवरंग सभागृहात हा कार्यक्रम झाला. या वेळी व्यासपीठावर सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रवीणकुमार ठाकरे, उपाध्यक्ष सीए लक्ष्मण नाईक, आरपीडी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे मुख्याध्यापक बी. एस. पाटील, पर्यवेक्षक आर. के. संकपाळ, प्रा. सतीश बागवे, "सकाळ'चे वरिष्ठ उपसंपादक शिवप्रसाद देसाई आदी उपस्थित होते.
वाचा - या बेरोजगार पदवीधराने फुलवला प्रगतीचा मळा...
धनावडे पुढे म्हणाले, "शाळा महाविद्यालय तरुणातील अपघातांची वाढती संख्या चिंताजनक आहे. यात तरुणाई अपघातग्रस्त होण्याचे प्रमाण जास्त आहे. हे रोखण्यासाठी पालकांची भूमिका महत्त्वाची आहे. वाढत्या वयात विद्यार्थ्यांनीही आपल्या कुटुंबाचा भावनिक विचार करून धूम स्टाईलने, बेशिस्तपणे दुचाकी चालविणे टाळायला हवे. मी आज या ठिकाणी पोलिस म्हणून नाही तर एक तुमचा पालक म्हणूनच मार्गदर्शन करत आहे. तुमच्या एका चुकीचा त्रास नाहक पालकांना होतो. दुचाकीने वाढलेल्या अपघाताचे प्रमाण लक्षात घेता बेशिस्त व धूम स्टाईलने दुचाकी हाकण्यामुळे होणारे तोटे समजून घ्या. धूम स्टाईलने किंवा व दुचाकी हाकल्याने जर तुमचा अपघात झाला तर तुमच्या पालकांना याचा किती मानसिक त्रास होईल हे सांगणे अवघड असते. एखाद्या आईचा मुलगा अपघातात गेला तर तेव्हा दुःख काय असते हे त्या आई-वडिलांना माहीत असते. आई-वडील तुमच्यासाठी मोठी स्वप्ने बघतात प्रत्येकक्षणी तुमची काळजी करत असतात, तुमची घरी येण्याची वाट बघत असतात. या भावनांची कदर करायला शिका. ''
सकाळ ने जिल्ह्यात जपलेली सामाजिक बांधिलकी
डॉ. ठाकरे म्हणाले, "पुण्यासारख्या मोठ्या शहरात अनेक नागरिक तरुण युवक प्रदूषण टाळण्यासाठी आणि शारीरिक व्यायामासाठी सायकलचा वापर करतात. आपली सावंतवाडी तर एक छोटसं शहर आहे; मात्र तरीही या ठिकाणी हाकेच्या अंतरावर जाण्यासाठी दुचाकी लागते. युवक, युवती अनेक जण बेशिस्त पद्धतीने ती हाकताना दिसतात. आरोग्याचा विचार करता अनेक डॉक्टर लोक व्यायाम म्हणून सायकलकडे वळले आहेत; मात्र या तरुण पिढीला दुचाकी शिवाय आणि त्या स्मार्टफोन शिवाय जीवनात करमत नसल्याचे दिसून येते. आपल्या वयाचा विचार न करतात दुर्दैवाने व्हॉट्स ऍप, फेसबुक व इतर साधने तरुण पिढी चुकीच्या पद्धतीने हाताळत आहेत. हे वय संयम राखायचे आहे; मात्र अशी साधने संयमाने हाताळले जात नसल्याने यातील ताळमेळ चुकून त्याचे गंभीर परिणाम या पिढीला भोगावे लागत आहेत. वाढत्या वयात हार्मोन्स व शारीरिक बदलांमुळे अती धाडस करण्याचा प्रयत्न केला जातो. याला संयमाची वेसण घातली पाहिजे. दुचाकी अपघातात एखाद्याचा जीव केला तर त्याच्या आई-वडिलांचा आक्रोश पहावला जात नाही, कारण त्यावेळी त्या मुलाचं आई-वडिलांची असलेल्या भावनिक नातं किती खोल आहे याचे चित्र उभे राहते. मग आता तुम्ही ठरवा तुम्हाला नेमकं काय करायचं आहे. अशी परिस्थिती कोणावरही येऊ शकते. तुम्ही संयमाने जगलात तर तुमचा तो सुवर्णकाळ असेल आणि संयमातूनच तुमची प्रगती होईल. पेट्रोलच्या दुचाकी पेक्षा इलेक्ट्रॉनिकवर चालणारी दुचाकी घ्या. त्याचा वेगही ठरलेला असतो आणि इंधनाची बचत होते.''
या वेळी श्री. देसाई यांनी सकाळच्या विविध उपक्रमांची माहिती देत "सकाळ'ने जिल्ह्यात जपलेली सामाजिक बांधिलकीची भूमिका मांडली. मुख्याध्यापक पाटील यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन मिलिंद कासार यांनी केले. या वेळी "सकाळ'च्या जाहिरात विभागाचे वरिष्ठ प्रतिनिधी हेमंत खानोलकर, वितरणचे वरिष्ठ प्रतिनिधी गुरुनाथ कदम, बातमीदार व यिन प्रतिनिधी भूषण आरोसकर, कर्मचारी सुभाष तोरसकर तसेच आरपीडी हायस्कूल शिक्षक व प्राध्यापक उपस्थित होते.
वाचा - ब्लू व्हेल मासा का मरण पावतो....
अपघाताने संपवले अख्खे कुटुंब
या वेळी श्री. नाईक यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनामागची भूमिका मांडताना धूम स्टाईलमुळे एक कुटुंब कसे उद्ध्वस्त झाले याची सत्यकथा मांडली. मूळ सिंधुदुर्गातील व गोव्यात स्थायिक आईवडील व एक मुलगी अशा तिघांच्या कुटुंबाभोवती ही घटना फिरते. धूमस्टाईल मोटारसायकलच्या धडकेत यातील वडिलांचे मुलीच्या देखत निधन झाले. याच्या धक्क्याने प्रथम त्या मुलीने व पाठोपाठ आईने आत्महत्या केली. एका अपघाताने एक कुटुंब कायमचे संपवले. नाईक यांनी सांगितलेली मूळ सिंधुदुर्गातील या कुटुंबाची करुण कहाणी उपस्थितांचे मन हेलावणारी ठरली.