कोकणात मुसळधार पावसाची शक्‍यता

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 जुलै 2017

पुणे - राज्यात विश्रांती घेतलेल्या नैर्ऋत्य मोसमी पावसाने (मॉन्सून) पुण्यात गुरुवारी संध्याकाळी दमदार हजेरी लावली. शहरातील पेठांसह उपनगरांमध्ये पावसाचा जोर दुपारनंतर वाढत गेला. पुण्यात पुढील तीन दिवस पावसाच्या काही सरी पडण्याची शक्‍यता हवामान खात्याने व्यक्त केली, तर शुक्रवारी (ता. 14) कोकणात मुसळधार पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशाराही दिला आहे.

पावसाने जूनमध्ये हजेरी लावली होती. मात्र, जुलैमध्ये अद्यापपर्यंत दमदार पावसाची प्रतीक्षा होती. मॉन्सूनमध्ये खंड पडल्याचे हवामान खात्यातर्फे सांगण्यात येत होते; पण त्याच वेळी पुढील काही दिवसांमध्ये मॉन्सून पुन्हा सक्रिय होईल, असे संकेतही दिले जात होते. त्यानुसार पुण्यासह कोकणात मॉन्सून सक्रिय झाल्याची माहिती हवामान खात्यातील शास्त्रज्ञांनी दिली.

शहरात दुपारनंतर पावसाच्या सरींना सुरवात झाली. संध्याकाळी पावसाचा जोर वाढला. साडेपाच वाजेपर्यंत सात मिलिमीटर पावसाची नोंद शहरात झाली होती.

राज्यात पावसाच्या सरी
पुण्याबरोबरच रायगड, सिंधुदुर्ग, मुंबई, अलिबाग, रत्नागिरी अशा कोकण भागात, महाबळेश्वर, कोयना, नाशिकच्या परिसरात पावसाने हजेरी लावली. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत मुसळधार पाऊस पडला, तर कोकणातील बहुतांशी ठिकाणी आणि मराठवाडा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर, राधानगरी येथेही पाऊस झाला. मराठवाड्यातील जालना, विदर्भातील वर्धा, नागपूर, अकोला, यवतमाळच्या काही भागांत हलका पाऊस झाला.

पावसाचा अंदाज
कोकणात बहुतांशी ठिकाणी जोरदार पावसाची शक्‍यता आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. उत्तर कोकणात काही ठिकाणी मुसळधार, तर तुरळक ठिकाणी शुक्रवारी जोरदार पावसाची शक्‍यता आहे. उत्तर मध्य कोकण, गोव्यातही तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्‍यता आहे. सध्या कोकणचा दक्षिण किनारा ते केरळच्या उत्तर किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने पुढील चार दिवसांत पावसाचा जोर वाढणार आहे. पुढील दोन दिवसांत कोकणात काही ठिकाणी मुसळधार, उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये जोरदार तसेच दक्षिण कोकणात मुसळधार पाऊस पडेल, अशी शक्‍यता हवामान खात्यातर्फे व्यक्त करण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune news heavy rain chances in konkan