
रायगड : जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागात डॉक्टर व कर्मचाऱ्यांची वानवा
पाली : रायगड जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागा अंतर्गत पशुधन विकास अधिकारी (गट-अ) या संवर्गाच्या 54 पदांपैकी तब्बल 30 पदे रिक्त आहेत. तर पशुधन पर्यवेक्षकांची 79 पैकी 42 पदे रिक्त आहेत. तर तांत्रिक अधिकारी यांचे असणारे एकमेव पद देखील रिक्त आहे. परिणामी पशुसंवर्धन विभागाच्या सर्वच कामांवर अतिरिक्तभार येत आहे. अनेक कामे देखील खोळंबत आहेत. शिवाय पशुधनाचे आरोग्य धोक्यात येत आहे. (Raigad District News)
या रिक्त पदांमुळे रायगड जिल्ह्यातील पशुपालकांच्या पशुधनास लसीकरण करणे, कृत्रिम रेतन, उपचार करणे, खच्चीकरण व ई सेवा प्रदान करतांना प्रचंड अडचणी येत आहेत. उपलब्ध डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर 3-4 ठिकाणचा अतिरिक्त कार्यभार पडत आहे. यामुळे संबंधित डॉक्टर व कर्मचाऱ्यांना प्रचंड अडचणींना सामोरे जाऊन ताण सहन करावा लागत आहे. अपुऱ्या तांत्रिक मनुष्यबळाचा प्रत्यक्ष परिणाम हा जिल्ह्यातील पशुसंवर्धन विषयक व्यवसाय करणाऱ्या पशुपालकांवर होत आहे.
हेही वाचा: लोकशाही ही 'वैयक्तिक' नियमानुसार नाही तर...: राज्यपालांनी ममतांना खडसावले
त्यांना या सर्व सेवा वेळेवर मिळत नाहीत. तसेच विविध शासकीय योजना जिल्ह्यातील ग्रामीण भागातील तळागाळातील पशुपालक, शेतकरी व गरजू नागरिकांना पोहोचवण्यात प्रचंड अडचणी व समस्या उद्भवत आहेत. यामुळे हकनाक पशुसंवर्धन विभागास जिल्ह्यातील लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
रिक्त पदांमुळे डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. सर्वच ठिकाणी सेवा पुरवितांना अडचणी उद्भवतात. ही रिक्तपदे भरण्यात यावी यासाठी खात्याचे मा.सचिव, आयुक्त, मंत्री यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे.
-डॉ. शामराव कदम, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, अलिबाग-रायगड
पशुधन विकास अधिकारी (गट-अ) या संवर्गाची पदे भरण्यात यावी यासाठी खात्याचे मा. मंत्री/राज्यमंत्री, मा.पालकमंत्री रायगड जिल्हा यांच्याकडे संघटनेने पत्रव्यवहार केला आहे. लवकरात लवकर ही रिक्त पदे भरण्यात यावीत जेणेकरून जिल्ह्यातील पशुपालकांना वेळेवर व उत्तम सेवा देता येईल.
-डॉ. अजय कांबळे, विभागीय सचिव, मुंबई विभाग महाराष्ट्र राजपत्रित पशुवैद्यक संघटना
रिक्त पदांमुळे पशुधनावर उपचार व लसीकरण करण्यासाठी डॉक्टर व कर्मचारी वेळेवर उपलब्ध होत नाहीत. तसेच या विभागाच्या विविध योजना देखील लोकांपर्यंत पोहचत नाहीत.
-शरद गोळे, शेतकरी, शिळोशी, सुधागड
हेही वाचा: २०१६ पासून देशात 60 हजार नवे स्टार्टअप; 6 लाख रोजगार-राष्ट्रपती कोविंद
रिक्त जागा
1) पशुधन विकास अधिकारी (गट-अ) या संवर्गाच्या 54 पदांपैकी 24 पदे भरलेली आहेत. तर तब्बल 30 पदे रिक्त आहेत.
2) पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी 2 येथील पशुधन पर्यवेक्षकांची 79 पैकी केवळ 37 पदे भरलेली असून तब्बल 42 पदे रिक्त आहेत.
3) जिल्हा परिषदेच्या जिल्हा पशुधन विकास अधिकारी यांच्या कार्यलयातील तांत्रिक अधिकारी हे पद दोन वर्षांपासून रिक्त आहे.
जिल्ह्यातील सर्व पशुधन दवाखान्यातून आलेल्या अहवाल एकत्रित करणे, विविध योजना राबवणे, योजनेची तयारी करून घेणे, आर्थिक व्यवहार, औषधे यांचा लेखाजोखा ठेवणे आदी कामे या अधिकाऱ्यांची आहेत. ही कामे अतिरिक्त अधिकाऱ्याला करावी लागत आहेत.
मानधनावर पशुधन पर्यवेक्षक (पदविका धारक) घेणे
राज्य शासनाचे पशुवैदयकीय दवाखाने श्रेणी २ आहेत. त्यांना मानधनावर पशुधन पर्यवेक्षक (पदविका धारक) घेण्यास परवानगी आहे. फक्त जिल्हा परिषद स्तरावरील पशुैद्यकीय श्रेणी २ दवाखान्यांना मानधनावर पशुधन पर्यवेक्षक (पदविका धारक) घेण्यास परवानगी नाही. ती परवानगी दिल्यास काही प्रमाणात हा प्रश्न सुटू शकतो.
Web Title: Raigad District Animal Husbandary Department
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..