Loksabha 2019 : रायगड लोकसभा निवडणूक अटीतटीची

अमित गवळे 
सोमवार, 1 एप्रिल 2019

पाली - रायगड लोकसभा मतदारसंघात आघाडीचे उमेदवार सुनिल तटकरे तसेच युतीचे उमेदवार अनंत गीते यांच्यात अटीतटीची लढाई आहे. हे दोघेही राजकारणातील मुरब्बी आणि मोठा जनाधार असलेले नेते आहेत. परिणामी एक-एक मत दोघांसाठीही निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे जनमताचा कोल आपल्या बाजूने वळविण्यासाठी दोन्ही उमेदवार तळागाळात प्रचारासाठी उतरले आहेत. यामुळे ही निवडणूक लोकसभेपेक्षा स्थानिक स्वराज्य संस्थांची असल्याप्रमाणे वाटत आहे. 

पाली - रायगड लोकसभा मतदारसंघात आघाडीचे उमेदवार सुनिल तटकरे तसेच युतीचे उमेदवार अनंत गीते यांच्यात अटीतटीची लढाई आहे. हे दोघेही राजकारणातील मुरब्बी आणि मोठा जनाधार असलेले नेते आहेत. परिणामी एक-एक मत दोघांसाठीही निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे जनमताचा कोल आपल्या बाजूने वळविण्यासाठी दोन्ही उमेदवार तळागाळात प्रचारासाठी उतरले आहेत. यामुळे ही निवडणूक लोकसभेपेक्षा स्थानिक स्वराज्य संस्थांची असल्याप्रमाणे वाटत आहे. 

सुनील तटकरे यांचे पुत्र आमदार अनिकेत तटकरे व जि.प सदस्या आदिती तटकरे यांनी मतदारसंघात घराघरात प्रचार सुरु केला आहे. घरोघरी पोहचून नागरीकांच्या गाठीभेटी घेवून त्यांच्याशी संवाद साधून प्रचार करण्यावर भर दिला जात आहे. जेष्ठांचे आशीर्वाद घेऊन घरातील महिला व लहानग्यांची आपुलकीने विचारपूस केली जात आहे. अशा मार्गाने मतदारांसोबत  जिव्हाळ्याचे नाते निर्माण करण्याचा प्रयत्न दोन्ही उमेदवारांकडून होत आहे. पालीत अनिकेत तटकरे यांचे शनिवारी (ता.30) घरोघरी स्वागत करण्यात आले.  अनिकेत तटकरे  कार्यकर्त्यांच्या मोटारसायकलवर बसूनही प्रचार करत आहेत. सुनील तटकरे व अनंत गीते देखील गृहभेटींबरोबरच गावसभा व बैठकांवर जोर देत आहेत. सोमवार (ता.1) सुधागड तालुक्यातील परळी व नांदगाव या दोन जिल्हा परिषद मतदारसंघात तसेच माणगाव येथील निजामपूर येथे तटकरेंच्या छोटया सभांचे आयोजन करण्यात आले होते. दोन्ही पक्षांचे इतर कार्यकर्ते व पदाधिकारी देखील गावे आणि वाड्यापाड्या पिंजून काढत आहेत. लग्न होऊन तसेच कामानिमित्त शहरात किंवा बाहेरगावी गेलेल्या मतदारांशी संपर्क करत आहेत. एक-एक मत आपल्या बाजूने कसे वळविता येईल यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांप्रमाणे व्यूहरचना आखली जात आहे. व तशी प्रलोभने देखील दिली जात आहेत. 

लढत अटीतटीची व प्रतिष्ठेची
2014 च्या लोकसभा निवडणुकीत सुनिल तटकरेंचा अवघ्या 2100 मतांनी निसटता पराभव झाला होता. अनंत गीते हे सलग सहा वेळा लोकसभा जिंकले आहेत. आणि सध्या त्यांच्याकडे केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालय आहे. तर तटकरे यांनी महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात जलसंपदा, अर्थ अशी विविध मंत्रीपदे भूषविली आहेत. तसेच ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देखील होते. त्यांचा मुलगा अनिकेत तटकरे विधान परिषदेत आमदार आहे. तर मुलगी अदिती रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा आहे. त्यामुळे  2019 ची लोकसभा निवडणुक विद्यमान केंद्रीय मंत्री अनंत गिते व राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस, माजी मंत्री सुनिल तटकरे यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची व अस्मितेची बनली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raigad Lok Sabha election are going to be competitive