रायगड : एसटीचा संप विद्यार्थ्यांच्या मुळावर; अनेक किमीची खडतर पायपीट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रायगड : एसटीचा संप विद्यार्थ्यांच्या मुळावर; अनेक किमीची खडतर पायपीट

रायगड : एसटीचा संप विद्यार्थ्यांच्या मुळावर; अनेक किमीची खडतर पायपीट

रायगड (पाली) : कोव्हिडं 19 चा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर ऑक्टोबर महिन्यापासून इयत्ता 5 वी पासून पुढील इयत्तांच्या शाळा नियमित सुरू झाल्या खऱ्या मात्र एसटी संपाने विद्यार्थ्यांच्या अध्यनाला ब्रेक लागला आहे. जिल्ह्यातील दूर गावावरून आदिवासी वाड्यापाड्यावरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी व घरी जाण्यासाठी कित्येक किमीची खडतर पायपीट करावी लागत आहे. यामुळे श्रम व वेळ वाया जात आहे. त्यामुळे लवकर योग्य तोडगा निघून लाल व निळी परी पूर्वव्रत सुरू करावी अशी मागणी अनेक शिक्षक, विद्यार्थी व पालक करत आहेत.

डोंगर दऱ्यांनी वेढलेल्या रायगड जिल्ह्यात अनेक गावे वाड्या व वस्त्या दुर्गम भागात आहेत. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी एसटीचाच आधार आहे. मात्र सध्या संपामुळे विद्यार्थ्यांना शाळेत वेळेत पोहचता येत नाही आहे. शिवाय रानावनातील व खडतर रस्त्यावर चालत शाळेत जाणे व तेथून पुन्हा घरी येणे धोकादायक व जिकरीचे देखील आहे. तसेच काही मुले चालण्याचा कंटाळा करतात दमतात देखील. त्यामुळे शाळेत येत नाहीत. परिणामी विद्यार्थ्यांची अनुपस्थित वाढत आहे. आणि त्यांचा अभ्यास देखील बुडतो. असे माणगाव तालुक्यातील कुंडलिका विद्यालयातील शिक्षक राम मुंढे यांनी सकाळला सांगितले. बस नसल्याने कित्येक किमीची पायपीट, शिवाय खाजगी वाहनाने जाणे खर्चिक असल्याने विद्यार्थी मेटाकुटीला आले आहेत. एसटी बस नसल्याने मुलांना पायी शाळेत जावे लागते त्यामुळे त्यांना खूप त्रास होतो. काही मुलांची शाळा बुडत आहे. त्यामुळे मुलांची चिंता वाटत आहे. म्हणून परिवहन मंडळाचा संप लवकर मिटणे गरजेचे आहे. असे पालक गणपत वाघमारे यांनी सांगितले.

"अनेक विद्यार्थ्यांना शाळेत व घरी पोहचण्यासाठी 3-4 किलोमीटर पेक्षा अधिक पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना खूपच त्रास सहन करावा लागतोय संप चालू असल्याने गावात सकाळी व संध्याकाळी येणाऱ्या बसही बंद आहेत. त्यामुळे प्राथमिक, माध्यमिक व कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे खूपच हाल होत आहेत. लवकर संप मिटला पाहिजे."

- अनिल राणे, सचिव, प्राथमिक शिक्षक समन्वय समिती, सुधागड

"एसटी बसच्या संपामुळे दूरच्या गावावरून येणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रचंड परवड व गैरसोय होत आहे. याबरोबरच वेळ व श्रम देखील खूप लागत आहेत. याचा मुलांच्या अध्ययनावर प्रतिकूल परिणाम होत आहे. दैनंदिन उपस्थिती अत्यल्प आहे. एस टी बस लवकर सुरू व्हावी ही अपेक्षा."

- दिपक माळी, मुख्याध्यापक, माध्यमिक विद्यालय, पाच्छापूर

"रोज किमान 8 किमी चालावे लागत आहे. शिवाय रस्ते खूप खराब व चढणीचे आहेत. खूप दमायला होते. घरी देखील वेळेत पोहचत नाही. अभ्यासाला वेळ पुरत नाही. त्यामुळे लवकर संप मिटवा ही इच्छा आहे."

- रेश्मा कोकरे, विद्यार्थीनी

loading image
go to top