esakal | कोकणात रब्बी पिकांना मोठा फटका ; गारांसह अवकाळीने जिल्ह्याला झोडपले, आंबा बागायतदार चिंतेत!

बोलून बातमी शोधा

rain in konkan damage mango and all crops in konkan ratnagiri}

पावसामुळे आंबा बागायतदार धास्तावले असून रब्बी हंगामातील पिकालाही फटका बसला आहे.

कोकणात रब्बी पिकांना मोठा फटका ; गारांसह अवकाळीने जिल्ह्याला झोडपले, आंबा बागायतदार चिंतेत!
sakal_logo
By
राजेश कळंबटे

रत्नागिरी : ऐन थंडीत अचानक पडलेल्या अवकाळी पावसाने जिल्हावासीयांना तडाखा बसला आहे. संगमेश्‍वर, गुहागरसह रत्नागिरी व लांजा तालुक्यातील काही गावांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. लांजात पालू येथे गारा पडल्या आहेत. पावसामुळे आंबा बागायतदार धास्तावले असून रब्बी हंगामातील पिकालाही फटका बसला आहे.

गेले दोन दिवस जिल्ह्यात थंडी होती. गुरुवारी (ता. 18) पहाटेला अचानक ढगांच्या गडगडाटासह विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरवात झाली. दीड तास पाऊस सुरू होता. संगमेश्‍वर तालुक्यात 3 मिलीमीटर, गुहागरला 5 मिमीची नोंद झाली. रत्नागिरी तालुक्यात बसणी, नेवरे, गणपतीपुळेसह आजूबाजूच्या पट्ट्यात पाऊस झाला. लांजा तालुक्यात वेरळ, शिपोशी, कोचरी, सालपे, पालू, केळवली, माचाळ, हुंबरवणे, चिंचुरटी या भागात ढगांच्या गडगडाटीसह गारांचा जोरदार पाऊस पडला. पालू येथे तुरळक गारा पडल्या. यापूर्वीही गारा पडल्याच्या नोंदी याच तालुक्यात झाल्या आहेत. 

हेही वाचा -  मंत्रालयाच्या राष्ट्रीय बोर्डवर कोकणकन्येची निवड -

संगमेश्‍वर तालुक्यात साखरपा गाव आणि परिसरात पहाटे गडगडाटासह पाऊस पडला. या परिसरात दोन दिवस मळभी वातावरण होते. माखजन-कोंडीवरे, फणसवणेतही पावसाने हजेरी लावली. संगमेश्वरच्या उत्तरेकडील आरवली, कडवई, सावर्डे व असुर्डेतही पहाटेला पाऊस झाला. रस्ते ओलेचिंब झालेले होते. सखल भागात पाणी साचलेले होते. गेले दोन ते तीन दिवस दाट धुके अन् थंडी होती. गुरुवारी ऊन आणि दुपारनंतर ढगाळ वातावरण होते; मात्र पावसाची चिन्हे नव्हती. रात्रीही थंडी होती. मध्यरात्री अचानक पावसाला सुरवात झाली. सुकवण्यासाठी ठेवलेला भूईमुग भिजला. टॉमेटो, वांगीची फुले गळून गेली. रोपेही भुईसपाट झाली. उघड्यावर ठेवलेल्या गुरांचे खाद्य भिजून गेले. शेतात कापून ठेवलेले गवत, शेत भाजावळ करण्यासाठी ठेवण्यात आलेले कवळ, पातेरा भिजून गेला. पावसामुळे निसरड्या झालेल्या रस्त्यावर, महामार्गावर वाहतूक धिम्या गतीने सुरू होती.

यंदा लांबलेल्या पावसामुळे हंगामावर परिणाम झाला. मोहोर उशिरा आल्यामुळे फळधारणा झालेली नाही. सध्या कैरी लागण्याची स्थिती असतानाच पावसाने मोहोरावर रोग पसरण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - भरधाव डंपरने दुचाकीला दिली धडक ; अपघातात एकजण जागीच ठार -

"या पावसामुळे आंबा मोहोरावर बुरशी रोगाचा प्रादुर्भाव वाढेल. पाणी कैरीवर पडल्यामुळे काळे डाग पडून दर्जावर परिणाम होऊ शकतो. मोहोर, कणी गळून जाण्याची भीती आहे."

- प्रसन्न पेठे, आंबा बागायतदार

संपादन - स्नेहल कदम