अचानक पाऊस, कोकणाला सतर्कतेचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 जून 2020

वैभववाडी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी या तालुक्‍यांमध्ये जोरदार पाऊस कोसळला. दुपारी साडेतीन ते सायंकाळी उशिरापर्यंत पाऊस सुरू होता. पावसामुळे रस्त्यावरून पाणी वाहत होते.

वैभववाडी (सिंधुदुर्ग) - सिंधुदुर्गात मॉन्सूनपूर्व पावसाने आज दमदार हजेरी लावली. विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांसह जिल्ह्यातील बहुतांशी भागात पाऊस झाला. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून, पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. अचानक कोसळलेल्या पावसामुळे सर्वांची तारांबळ झाली. दरम्यान, प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला असून, मच्छीमार बांधवांना समुद्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

जिल्ह्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण होते. वातावरणात प्रचंड उष्मा निर्माण झाला होता. अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. दरम्यान, सायंकाळी तीन वाजल्यापासुन जोरदार वाऱ्याला सुरुवात झाली. त्यापाठोपाठ विजांच्या कडकडाटांसह पावसाला सुरुवात झाली. जिल्ह्यातील सह्याद्री पट्ट्यातून पावसाला सुरुवात झाली. वैभववाडी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी या तालुक्‍यांमध्ये जोरदार पाऊस कोसळला. दुपारी साडेतीन ते सायंकाळी उशिरापर्यंत पाऊस सुरू होता. पावसामुळे रस्त्यावरून पाणी वाहत होते. मळ्यांमध्ये देखील पावसाचे पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले. पहिल्याच मॉन्सूनपूर्व पावसात जिकडे तिकडे पाणीच पाणी असल्याचे चित्र दिसत होते. सह्याद्री पट्टयात पावसाचा जोर अधिक होता. 

अचानक पाऊस सुरू झाल्यामुळे जिल्ह्यातील सर्वांचीच तारांबळ उडाली. वाऱ्यांमुळे काही रस्त्यावर झाडे कोसळण्याचे प्रकार घडले. परंतु, त्याचा वाहतुकीवर परिणाम झाला नाही. प्रवासात असलेल्या दुचाकीस्वारांना रस्त्यातच गाडी उभी करून आडोशाला राहावे लागले. लॉकडाउनमुळे लांबलेल्या बांधकामांना पावसामुळे ब्रेक लागला. मुसळधार पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे दिवसभर उष्म्याने कंटाळलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पावसामुळे शेतकरी वर्गाची धांदल सुरू झाली आहे. पेरणीच्या दृष्टीने शेतकरी पूर्वतयारीला लागला आहे. 

जिल्ह्यावर चक्रीवादळाचे सावट 

ओरोस - जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात 31 मे ते 4 जून या कालावधीत सतर्कतेचा इशारा दिला आहे. या कालावधीत अरबी समुद्रात जोरदार वारे वाहणार आहेत, तर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्‍यता वर्तविली आहे. त्यामुळे मच्छीमार बांधवांना समुद्रात न जाण्याचे आवाहन केले आहे. 
अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे चक्रीवादळात रूपांतर होणार असल्याचे प्रादेशिक हवामान विभागाने कळविले आहे. त्यामुळे समुद्र खवळलेला राहणार असून, मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये. तसेच समुद्रात गेलेल्या मच्छिमारांनी परत यावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने केले आहे. 

वादळाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी सावधानता बाळगावी. विशेषत: किनारी भागातील तलाठी, ग्रामसेवक, पोलिसपाटील यांनी सतर्क रहावे. तसेच संबंधित सर्व यंत्रणांनी शोध व बचाव साहित्य सुस्थितीत असल्याची खात्री करावी. शोध व बचाव गट कार्यरत ठेवावेत. जिल्हा नियंत्रण कक्षाच्या संपर्कात राहून कोणतीही दुर्घटना घडल्यास नियंत्रण कक्षाला तत्काळ माहिती द्यावी. विभागप्रमुखांनी पुढील सूचना मिळेपर्यंत मुख्यालय सोडू नये, अशा सूचनाही जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केल्या आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rain in konkan sindhudurg