वर्षा पर्यटनाच्या आशा पल्लवीत 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 जून 2019

आंबोली - जिल्ह्यात पाऊस सक्रिय झाला आहे. त्यामुळे आंबोलीतील लांबलेले वर्षा पर्यटन आता लवकरच गती घेईल, अशी स्थिती आहे. धबधब्यावर पर्यटकांची गर्दी जमू लागल्याचे चित्र आहे.

आंबोली - जिल्ह्यात पाऊस सक्रिय झाला आहे. त्यामुळे आंबोलीतील लांबलेले वर्षा पर्यटन आता लवकरच गती घेईल, अशी स्थिती आहे. धबधब्यावर पर्यटकांची गर्दी जमू लागल्याचे चित्र आहे. 

यावर्षी मॉन्सूनच्या लहरीपणामुळे पावसात सातत्य नव्हते. त्यामुळे थंड हवेसाठी प्रसिद्ध असलेल्या आंबोलीच्या वर्षा पर्यटनाचा यावर्षीचे वेळापत्रक कोलमडले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत पावसाच्या आगमनाला उशीर झाला; मात्र असे असले तरी बुधवारी सकाळपासून सावंतवाडी तालुक्‍यात पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे कोसळणाऱ्या पावसाने आंबोली पर्यटनाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. सद्यस्थितीत याठिकाणी पर्यटक दाखल होऊ लागले असून मुख्य धबधब्यावर पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. धबधबा सक्रिय नसला तरी तो पूर्ण सक्रिय होण्यास जुलैचा पंधरावडा उजाडणार आहे. 

हवामान खात्याच्या अंदाजानुसार कोसळणाऱ्या पावसात सातत्य राहणार असे सांगण्यात येत आहे. हवामान खात्याचे अंदाज खरे ठरल्यास आठ दिवसांत आंबोली वर्षा पर्यटन बहरेल, अशी आशा काही व्यावसायिकांनी व्यक्त केली. उंच कठड्यावरून कोसळणारे धबधबे, हिरवी गर्द वनराई व तेथील पर्यटनस्थळे आदी निरनिराळ्या कारणाने आंबोली वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. प्रती महाबळेश्वर म्हणूनही आंबोलीकडे पाहिले जाते; मात्र आंबोलीचे वर्षा पर्यटन अलीकडच्या दोन-तीन वर्षांत पावसाच्या लहरीपणामुळे बारगळत चालले आहे. सतत पाऊस असणाऱ्या आंबोलीत सध्या ऊन व पाऊस असे चित्र पाहायला मिळत होते. त्यामुळे जुलैच्या पंधरवड्यानंतर वर्षा पर्यटन सुरू होणार, असे भाकीत स्थानिक बोलत होते. 

आंबोलीतील वर्षा पर्यटनाचे गणित लक्षात घेता याठिकाणी आठवडाभर पाऊस पडल्यानंतर जमिनीत उमळ निर्माण झाल्यावर याठिकाणचे धबधबे पूर्ण क्षमतेने कोसळू लागतात. त्यानंतर पावसात एकवेळ सातत्य राहील नाही तरी यात फरक पडत नाही; मात्र यावर्षी उमळ निर्माण होण्यासारखा पाऊस न झाल्याचे वर्षा पर्यटन फसले आहे. 

गेल्यावर्षी जूनच्या पंधरा तारखेला मॉन्सून सक्रिय झाला होता. त्यानंतर जवळपास पंधरा दिवसांच्या फरकाने म्हणजेच जूनच्या शेवटी आंबोलीचे धबधबे प्रवाहित होऊन वर्षा पर्यटनाला सुरवात झाली होती. 

प्रशासन सतर्क 
यंदा जून महिना संपत आला तरी म्हणावा तसा मॉन्सून सक्रिय नाही. त्यामुळे जुलैच्या पंधरावड्यानंतरच वर्षा पर्यटनाचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे; मात्र बुधवारी कोसळलेल्या पावसामुळे पर्यटन लवकरच सुरू होईल, अशीही आशा व्यक्त होत आहे. दुसरीकडे प्रशासन मात्र वर्षा पर्यटनाच्या पार्श्‍वभूमीवर सज्ज असून वाहतूक कोंडी व मद्यधुंद पर्यटकांना आवर घालण्यासाठी पोलिसांकडून चोख नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी स्थानिकांची मदत घेण्यात आली आहे.   
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rains in Sindhudurg Amboli region