दिनकरसारखी कोकणातली माणसं, मुंगी होऊन साखर खाणारी अन् त्या साखरेचा गोडवा इतरांना वाटणारी!

दिनकरला राजकारणाचे मात्र वावडे. २५ वर्षे संघाची शाखा चालवली. कोणाच्या प्रसंगाला दिनकर सगळ्यात पुढे असायचा.
Konkan News
Konkan Newsesakal

-राजा बर्वे, चिपळूण

दिनकरच्या दुकानात उधारी नाही; पण कोणी नेहमी येणारं गिऱ्हाईक असेल तर दिनकर थोडी उधारी ठेवी; पण हे करतानासुद्धा ‘हे बघ, उधारी देतोय; पण त्याचा गैरफायदा घेऊ नको, ' सुखी सोनाराकडे आणि दुःखी भट ज्योतिषाकडे' असं नकोना?’ आंब्याच्या सिझनमध्ये (Mango Season) दिनकर आंबे घाऊक खरेदी करून किरकोळीने विकत असे. घेताना दरात घासाघीस करून घेई. दर जास्त वाटला तर विचारी, ‘भावड्या, तुझा दर आंब्याची बाठ आणि सालीसकट आहेना रे, मग एक काम कर, नुसता रस पिळून देतोस का?तर तुझी किंमत देतो. दिनकरसारखी माणसे अशा गोष्टींमधून जे मला शिकवत गेली ते कुठल्याच शाळेत शिकवले जात नाही.’

‘‘कणाकणात कोकण’’ ही चिपळूणजवळ (Chiplun) अलीकडेच सुरू झालेल्या वाशिष्ठी डेअरीची टॅगलाईन, मी जेव्हा जेव्हा वाचतो तेव्हा खरंच खूप गोष्टी मनात तरळून जातात. कोकणात (Konkan) एक वेगळाच आनंद आहे, स्वास्थ्य आहे, निसर्ग आहे, एकीकडे पूर्वेकडे विशाल सह्याद्रीचे कडे तर पश्चिमेकडे भूमातेच्या चरणतलाला नित्य अभिषेक करणारा सागर आहे. नारळी, पोफळीच्या आणि आंबा काजूच्या बागा आहेत, इथला दिवस सह्य कड्यावरून जसा उशिरा उगवतो तसा तो रेंगाळत अरबी समुद्रात बुडून जातो. या मधल्या दिवसाच्या काळात फार जलदगतीने काही करावे, अशी घाई इथे कोणालाच नसते तशी ती बंदरावर दहा बाय दहा इतक्या छोट्याशा दुकानात बसलेल्या आमच्या दिनकरलासुद्धा नसते.

Konkan News
Konkan News : दौलतदादाच्या आयुष्याचं चीज झाल्यासारखं वाटलं आणि नकळत डोळे पाणावले!

भरती-ओहोटीच्या पाण्याची हद्द जिथे संपते तिथं बंदरावर काही खोके, दुकाने, पानपट्ट्या, एक कपडे आणि एक भांड्यांचे दुकान या दाटीवाटीत घुसून बसलेले दिनकरचे दुकान. दिनकरचे दुकान हा त्याचा मुख्य व्यवसाय आहे की, फावला वेळ काढायचे साधन आहे असे वाटावे असेच तुम्हाला दुकान पाहिल्यावर वाटेल. ''जनता वस्तूभांडार'' अशी दामू पेंटरकडून लाकडी फ्रेमवर ठोकलेली दुकानाची पाटी. जेव्हा कधी दुकान सुरू झाले तेव्हा लावलेली. नंतर कधी त्यावर हात फिरला नाही. दिनकरला तशी गरज वाटली नाही. कारण, ''जनता''पेक्षा लोक दिनकरचे दुकान म्हणून जास्त ओळखत.

मध्ये चौरंग, आजूबाजूला दहा-बारा बरण्या, दहा-बारा अॅल्युमिनियमचे डबे, समोर पाच-सात टोपल्या, वेलची केळ्यांचे टांगलेले घड, टोपल्यांमध्ये नारळ, सुपाऱ्या, केरसुण्या, पाने, तंबाखू, केळीची पाने. इतक्या भांडवलावर दिनकरने बायको आणि तीन मुलांचा संसार अगदी झकास केलाय. चैत्रात प्रतिपदेपासून रामनवमीपर्यंत कोळीवस्तीत सत्यनारायण घरोघरी होतात. त्या पूजेला लागणारे यच्चयावत साहित्य दिनकर विकत असे. दिनकरचा दिनक्रम म्हणजे तो ११ वाजता दुकानात येतो. येताना समोरच्याच मारवाड्याच्या दुकानातून डाळी, साखर, चहाबुक्की, गूळ, मीठ, गरम मसाला, कांदे, बटाटे, लसूण असे रोज लागणारे जिन्नस प्रत्येकी १०-१५ किलो घेऊन येतो. आदल्या रात्री उंदीर आणि घुशींनी घातलेला धुडगूस आवरतो.

चौरंगामागच्या भिंतीवर सुमारे तीस वर्षांपासून आलेली एक गणपतीची, एक लक्ष्मीची आणि एक कोळेश्वराची तसबीर पुसतो. एक जुना लामणदिवा वात आणि कोळी चुरडून लावतो. डोक्यावरची संघाची तपकिरी टोपी आणि अंगातला कायम निळाच कपाची बटणे असलेला शर्ट काढून खुंटीवर लावतो. मारवाड्याकडून आणलेला जिन्नस डबे, बरण्यांमधून भरतो आणि मग दिनकरचे दुकान सुरू होते ते रात्री आठपर्यंत. दिनकरचे खरे गिऱ्हाईक सुरू होते ते दुपारी चार ते आठ याच वेळेत. बंदरी गावातली ती बाजारपेठ अलीकडे ओस पडत चालली असली तरी दिनकरला त्या काळात मात्र मंदी माहीत नव्हती.

Konkan News
एखादी हटके सहल करायची असेल, फ्लॉवर व्हॅलीमध्ये रमायचं असेल तर 'या' ठिकाणी जरूर भेट द्या..

त्याच्या दुकानात किलोच्या मापाने कोणीच काही घ्यायला येत नाही. बंदरपलीकडे असलेल्या कोळीवाड्यांतून सकाळी टोपलीतून वेगवेगळ्या गावांमधून मासे, सुकी मच्छी विकायला गेलेल्या कोळणी संध्याकाळी रिकाम्या झालेल्या टोपल्या डोक्यावर घेऊन येतात आणि परत दिनकरच्या दुकानातून रोज लागणारे वाण सामान टोपल्या भरून घेऊन जातात. दिनकरच्या दुकानात वजनकाटा नावापुरता टांगलेला होता. दिनकरच्या मुठी, बचक्या चिमट्या हेच त्याचे माप. चार-आठ आण्यांपासून दोन रुपयांपर्यंत तो कोणतीही वस्तू विकत असे. मग यात तांदूळ, कणी, डाळी, साखर, चहाबुक्की, कांदे, बटाटे लसूण हे सगळं येतं. दुसऱ्या दिवशी परत तेच गिऱ्हाईक परत नव्या दिवसासाठी येणारं असतं. दिनकरच्या काही रोज लागणाऱ्या पुड्या तयार असतात. चोवीस तासातल्या या चार तासात दिनकरचा हात विजेच्या वेगाने फिरत असतो.

हा काळ सुमारे वीसेक वर्षांआधीचा. माझी रोज संध्याकाळी एखादी फेरी तरी बंदरावर होत असे. मला पाहिले की, दिनकर हटकून हाक मारायचा, ‘साहेब, बंदरावर वारा रोज वाहतोय हो, जातोय कुठे तो?जरा दोन मिनिटे तरी या हो! ओली सुपारी आवडते ना तुम्हाला. या देतो.’.. खरंतर तेव्हा दिनकरच्या धंद्याचा प्राईमटाईम असायचा. मग मी तिथे एका कोपऱ्यात बसून शांतपणे दिनकर आणि कोळी बायका यांचे होणारे मजेशीर संवाद ऐकत बसे. कोणी कोळीण फारच घाई करायला लागली की, ‘बाय, जायाचंय, जायाचंय करू नको, एक दिवस सगळ्यांनाच या पृथ्वीतलावरून जायचंय, भटाकडे आलीयंस ना आता थांब जरा.. अग, ''भट सांगेल ती दिशा आणि न्हावी ठेवेल त्या मिशा'' अशी उगाच का म्हण केलीय’.

Konkan News
Infertility Symptoms : जोडप्यांमधील सगळ्यात मोठी समस्या म्हणजे वंध्यत्व; कोणती आहेत कारणे?

दिनकरला राजकारणाचे मात्र वावडे. २५ वर्षे संघाची शाखा चालवली. कोणाच्या प्रसंगाला दिनकर सगळ्यात पुढे असायचा. दुकानात कोणी येऊन फार गप्पा मारायला किंवा राजकारणावर आपले तारे तोडायला लागला की, मात्र दिनकर त्याला शांतपणे थांबवायचा. ‘ए बाबा, तुझी पालखी उचल आणि तिकडे गावच्या सहाणेवर ने, तिथे काय तुला चवरी वारवायची आहे ती मनगट मोडेपर्यंत वारव. ही जागा लक्ष्मीची आहे तिथे तुझी सरस्वती नको जिभेवर नाचवू.

दिनकर हे वेगळेच रसायन होते. त्या दहा बाय दहाच्या दुकानात तीस-चाळीस वर्षे धंदा करून त्याने रग्गड पैसा मिळवला. ‘साहेब, आम्ही लक्ष्मीचे फक्त उपासक हो, तिचा उपभोग घेणे जमत नाही हो..धीरच होत नाही. गरज असेल तर खर्च करावा माणसाने आणि म्हणाल तर आम्हाला गरजाच नाहीत’.. आणि खरंच दिनकरला गरजा अशा नव्हत्याच.. संघाची खाकी चड्डी, निळा सदरा, बाह्यांचे गंजीफ्राक या पलीकडे दिनकरला चैन करताना कोणी कधी पाहिले नाही.

Konkan News
Ganpatipule Tourism : गणपतीपुळेतील पर्यटकांत निवडणुकींमुळे मोठी घट; दिवसभरात 10 हजार पर्यटकांची नोंद

दिनकरच्या घरी एकदाच गेलो. मुलीचे लग्न पुण्यात केले. त्याचा सत्यनारायण घरी केला. आग्रहाचे आमंत्रण. घर साधेच; पण चांगले प्रशस्त होते. घरची मंडळी अगत्यशील वाटली. तीर्थप्रसाद घेऊन मुलीच्या हातात पाकीट दिले. निरोप घ्यावा म्हणून दिनकरकडे वळलो. ‘साहेब, एक मिनिट, तुमच्या आशीर्वादाने लग्न छान झाले. आलात, आनंद झाला. उद्या बँकेत येऊन जातो. डॉक्टर आणि बँकेचा साहेब, खोटे बोलून चालत नाही हो. खोटे कशाला बोलू?थोडे जमलेत आहेराचे, एक मुदत ठेवीची पावती करू बारीकशी.’..दिनकर आणि दिनकरसारखी कोकणातली अशी माणसे, मुंगी होऊन साखर खाणारी आणि त्या साखरेचा गोडवा इतरांना वाटणारी.

(लेखक कोकणवर मनस्वी प्रेम करणारा व कोकण टिपणारा आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com