जठारांचा राजीनामा जपून ठेवलाय

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 एप्रिल 2019

सावंतवाडी - भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांचा फाडलेला राजीनामा मुख्यमंत्र्यांनी माझ्या खिशात ठेवला होता. तो मी अजून जपून ठेवला आहे, असा चिमटा माजी आमदार राजन तेली यांनी येथे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांना काढला.

सावंतवाडी - भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांचा फाडलेला राजीनामा मुख्यमंत्र्यांनी माझ्या खिशात ठेवला होता. तो मी अजून जपून ठेवला आहे, असा चिमटा माजी आमदार राजन तेली यांनी येथे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांना काढला.

तत्पूर्वी ‘मी राजीनामा दिला; परंतु तो न वाचता मुख्यमंत्र्यांनी फाडून टाकला, याचा अर्थ माझ्यावर त्यांचा विश्‍वास आहे; त्यामुळे नाणार होणार, असा मला विश्‍वास दिला आहे,’ असे सांगत जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी त्या प्रसंगाची पुन्हा एकदा आठवण करून दिली.

नाणार प्रकल्प कोकणात यावा व तो रद्द करण्यात येऊ नये, यासाठी प्रमोद जठार यांनी आगपाखड केली. लोकसभा निवडणूक लढविण्याचा इशारा दिला होता, लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला मदत करणार नाही, अशी भूमिका घेतली होती. दरम्यानच्या काळात विमानतळाच्या उद्‌घाटनासाठी मुख्यमंत्री जिल्ह्यात आल्यानंतर त्यांच्याकडे आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता; परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो राजीनामा न वाचताच फाडून माजी आमदार राजन तेली यांच्या खिशात ठेवला होता.

या प्रसंगाची जोरदार चर्चा सुरु  होती. त्या विषयावरून काल येथे आयोजित पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा दोघांत चर्चा रंगलेली पहायला मिळाली; मात्र तोच नेमका धागा पकडून बाजूला बसलेल्या नगरसेवक मनोज नाईक यांनी राजीनाम्याचा अर्धा भाग राजन तेलींकडे तर दुसरा भाग संदेश पारकरांकडे आहे. त्यामुळे तो राजीनामा एकत्र येणार कसा, अशी कोटी केली. त्यामुळे या चर्चेला आणखीनच रंगत आली. 

येथे दाखल झालेल्या भाजपा पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद सुरू असताना नाणारचा मुद्दा आला. यावेळी गेले दोन महिने तुम्ही शिवसेनेला विरोध केला. मग आताच तुमचा विरोध कसा काय बदलला. एका दिवसांत तुमची भूमिका कशी काय बदलली, असा प्रश्‍न उपस्थित पत्रकारांनी जठार यांना केला. यावेळी मला मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला आहे. ७० टक्के ग्रामस्थ प्रकल्प हवा आहे, अशी मागणी करतील. त्याठिकाणी आपण नाणार प्रकल्प निश्‍चितच करू, असा विश्‍वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

त्यामुळे काही झाले तरी नाणार प्रकल्प होईल, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी मी दिलेला राजीनामा न बघता फाडला, याचा अर्थ त्यांनी माझ्यावर विश्‍वास टाकला आहे, असा होतो, असे जठार यांनी स्पष्ट केले. यावेळी बाजूला बसलेल्या तेलींनी जठार यांनी दिलेला राजीनामा माझ्या खिशात ठेवला; परंतु तो जोडून मी माझ्याकडे संग्रह ठेवला आहे, असे सांगितले. त्यांचा खिशाकडे हात जाताच बाजूला बसलेल्या मनोज नाईक यांनी राजीनाम्याचा एक तुकडा तेलींकडे व दुसरा तुकडा पारकरांकडे आहे, अशी कोटी केली. उपस्थित शिवसेना, भाजप  पदाधिकाऱ्यांत हास्याची लाट  उमटली.

रोजगारासाठी नाणार प्रकल्प कोकणात हवा
काही झाले तरी रोजगाराच्या दृष्टीने नाणार प्रकल्प कोकणात येणे गरजेचे आहे; अन्यथा भविष्यात रोजगार न मिळाल्यास पुढची पिढी माफ करणार नाही, असे जठार यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rajan Teli comment