विधानसभेतही लोकसभेचीच पुनरावृत्ती - राजन तेली

सकाळ वृत्तसेवा
Monday, 3 June 2019

दोडामार्ग - विधानसभा निवडणुकीतही लोकसभेचीच पुनरावृत्ती होईल, असा विश्‍वास व्यक्त करून भाजपचे प्रदेश चिटणीस राजन तेली यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले. पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी घराघरांत कमळ निशाणी पोचवा, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले. 

दोडामार्ग - विधानसभा निवडणुकीतही लोकसभेचीच पुनरावृत्ती होईल, असा विश्‍वास व्यक्त करून भाजपचे प्रदेश चिटणीस राजन तेली यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले. पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी घराघरांत कमळ निशाणी पोचवा, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले. 

मोदी सरकारला दुसऱ्या टर्मला मिळालेल्या यशाचा विजयोत्सव साजरा करण्यासाठी काल (ता.2) तालुक्‍यात भाजपच्या वतीने मोटारसायकल रॅली काढण्यात आली व सायंकाळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन तसेच स्नेहभोजन असा कार्यक्रम झाला. त्यावेळी श्री. तेली बोलत होते.

तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, जिल्हा सरचिटणीस यशवंत आठलेकर, विजयकुमार मराठे, चंद्रशेखर देसाई, संदीप नाईक, रंगनाथ गवस आणि अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यकर्त्यांनी दुपारनंतर तालुक्‍यातील गावागावांत रेली काढली. रॅलीची सुरवात येथून झाली. रॅलीनंतर महाराजा सभागृहात श्री. तेली यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, आपली ताकद आणखी वाढण्यासाठी आपण गाव व बुथनिहाय संघटना मजबुतीसाठी झटायला हवे. सगळ्या सेलचे काम जोरात सुरु व्हायला हवे. भविष्याची मोर्चेबांधणी आतापासूनच करायला हवी. त्यामुळे सगळ्यांनी कामाला लागा. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रसरकार आणि राज्यातील सरकारने केलेली कामे पुन्हा पुन्हा लोकांपर्यंत पोचवा, असे आवाहन त्यांनी केले. 

ती संधी भाजपाला मिळावी... 
श्री. तेली म्हणाले, ""आपला पक्ष मजबूत असल्याचे या निवडणुकीत सिद्ध झाले आहे. स्वराज्य संस्थांची अनेक सत्तास्थाने भाजपकडे आहेत. शिवसेना व भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीमुळे युतीला मोठे यश मिळाले आहे. आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याची संधी भाजपाला मिळावी, अशी अपेक्षा सर्वच कार्यकर्ते करत आहेत. तो निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि अन्य वरिष्ठ घेणार आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rajan Teli comment