esakal | केसरकरांनी संपवण्याची भाषा करू नये; राजन तेलींचा पलटवार
sakal

बोलून बातमी शोधा

marathi news kokan ex mla rajan teli chandrakant patil

'केसरकरांनी संपवण्याची भाषा करू नये'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : नगराध्यक्ष संजू परब एकटे नाहीत. संपूर्ण भाजपची ताकद त्यांचा मागे आहे. त्यामुळे आमदार दीपक केसरकर यांनी कोणाला संपविण्याची भाषा करु नये. ते आम्ही सहन करणार नाही, असा इशारा देतानाच आमदार दीपक केसरकर यांचा हा छुपा दहशतवाद असून हीच का तुमची संस्कृती? असा पलटवार भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केला.

संजू परब यांचा वाढदिनी केंद्रीय मंत्र्यांसोबत त्यांना पायघड्या घालायला कोण आले होते, असा सवाल उपस्थित करत आज सत्ताधारी पक्षातील कोण कोण भाजपच्या संपर्कात आहेत, याची भांडेफोड आम्ही करावी का? असेही ते म्हणाले. तेली यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी नगराध्यक्ष संजू परब, आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, नगरसेवक आनंद नेवगी आदी उपस्थित होते.

. तेली म्हणाले, ``कोरोनाच्या काळात सेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे निधन झाले. ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. त्याचे राजकारण नाही; मात्र आपल्या पक्षातील आपल्या कुटुंबातील सदस्य म्हणून त्यांच्या कुटुंबियांची साधी चौकशी करणे हे तुमचे कर्तव्य असते. असे असताना कोरोनाच्या काळात तब्येतीचे कारण पुढे करून मुंबईत जाऊन लपून बसलेल्या आमदार केसरकर यांनी साधी कोणाची चौकशीही केली नाही.

आम्ही कार्यकत्यांना भेटायला गेल्यावर ही खंत त्यांनी आमच्याकडे व्यक्त केली. कार्यकर्त्याच्या सुखदुःखात सहभागी होणे त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी घेणे हे लोकप्रतिनिधी म्हणून आपले काम असते, तुमची ती संस्कृती नसेल; मात्र आमचे तसे नाही. आम्ही कुटुंब म्हणून राहतो आणि सर्वांच्या वेळा प्रसंगाला पडतो. भाजपा सर्वच कार्यकर्त्यांच्या सुख दुखःत नेहमी पाठीशी राहिली आहे. त्यामुळे नगराध्यक्ष संजू परबच काय सरपंच व भारतीय जनता पार्टीच्या एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशीही संपूर्ण पक्ष असून कोणाला धमकी देण्याचा प्रयत्न या पुढे करू नका.

हेही वाचा- समुद्रालाही उधाण; शिरोडा किनाऱ्यावरील झाडे, विद्युत खांब कोसळले

नारायण राणे यांना केंद्रात मंत्रीपद मिळाल्यानंतर त्यांचे अभिनंदन सोडा; मात्र त्यांच्यावर टीका करण्याचेच काम सेनेच्या लोकप्रतिनिधींनीनी केले. राणे यांच्या कामाची पध्दत यांना माहीत नसावी. त्यामुळेच मुक्ताफळ उधळण्याचा काम हे करत आहेत. मळगाव येथील मेळाव्यात सेनेच्या सर्वच लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांनी भाजपवर तोंडसुख घेतले. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेत्यांचे फोटो लावून तुम्ही निवडून आलात. आता गरज सरो वैद्य मरो या भूमिकेतून तुम्ही करीत असलेली टीका योग्य नसून हिम्मत असेल तर राजीनामे द्या, व पुन्हा स्वबळावर निवडून येऊन दाखवा.`

तेली म्हणाले, ``केंद्रीय मंत्री नारायण राणे हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. मुख्यमंत्री पदाच्या सहा महिन्यांच्या कार्यकाळात त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कामांचा धडाका लावला होता. त्यानंतर महसूल मंत्री व उद्योग मंत्री या नात्याने ही त्यांनी जिल्ह्यात अनेक प्रकल्प आणले होते. भविष्यातील लोकसभा व विधानसभेचे या जिल्ह्यातील तिन्ही आमदार हे भाजपचेच असतील.

राणे यांच्या मंत्रीपदाचा जिल्ह्यास फायदा

राजन तेली म्हणाले, ‘‘ केंद्रीय मंत्री म्हणून नारायण राणे यांच्या पदाचा फायदा हा जिल्ह्यालाच होणार आहे. उद्योग खात्याच्या माध्यमातून येथील बेरोजगार युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीका करण्यापेक्षा तुम्हालाही जर पद मिळून त्याचा उपयोग जिल्ह्याला होत असेल तर त्याचे स्वागतच आहे; मात्र केवळ राजकारण म्हणून तुम्ही करत असलेली टीका यापुढे सहन केली जाणार नाही.

loading image