
70 पैकी 60 ग्रामपंचायतींवर भाजपचाच होणार विजय
सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : जिल्ह्यात भाजपची ताकद वाढल्याने ग्रामपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे आजी-माजी पालकमंत्री, खासदार, आमदारांना गल्लोगल्ली फिरावे लागत आहे; मात्र केंद्र सरकारच्या विविध योजना घराघरात पोहचल्याने मतदारांमध्ये असलेले समाधान लक्षात घेता 70 ग्रामपंचायत निवडणुकांपैकी काही गाव पॅनल वगळता 60 हून अधिक ग्रामपंचायतींवर भाजपचाच विजय होईल, असा विश्वास भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी व्यक्त केला. येथे आयोजित पत्रकार परिषदेत श्री. तेली बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष संजू परब, आरोग्य क्रिडा सभापती सुधीर आडीवरेकर, नगरसेवक आनंद नेवगी, मनोज नाईक, दिलीप भालेकर, बंटी पुरोहित, महिला शहर अध्यक्षा मोहीनी मडगावकर आदी उपस्थित होते.
तेली म्हणाले, "पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे, माजी राज्यमंत्री आमदार रविंद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, जिल्हा परिषद, पंचायत समिती या माध्यमातून गावागावांत विविध विकासकामे सुरू आहेत. पंतप्रधान मोदींच्या माध्यमातून ग्रामपंचायतींसाठी थेट 14व्या वित्त आयोगाचा निधी दिल्यामुळे गावातही थेट विकास होऊ लागला आहे.
केंद्राच्या माध्यमातून राबविलेल्या उज्वला गॅस योजना, जनधन योजना, कृषी सन्मान योजना, अपंग विधवा भगिनींना मदत, कोरोना काळात रेशनिंगच्या माध्यमातून दिलेले मोफत धान्य यामुळे गावागावात जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. दुसरीकडे राज्यातील सत्ताधारी शिवसेना कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे आघाडीतील पक्ष सपशेल अपयशी ठरले आहेत. मागील निवडणुकांवेळी शिवसेनेच्या उमेदवारांनी दिलेली कोणतीही आश्वासने पूर्ण केलेली नाहीत.
हेही वाचा- 'आहात त्या घरात सुखाने नांदा', असला पोरकटपणा करू नका
गावातील लोकांचे साधे साधे प्रश्नही सत्ताधाऱ्यांना सोडवता आले नाहीत. जिल्हा नियोजनचा कपात झालेला निधी, रखडलेली विकासकामे, रस्त्यांवरील खड्डे, वाढती बेरोजगारी, भात नुकसानीचे न आलेले पैसे, वाळूची न झालेली टेंडर, चांदा ते बांदा योजना बंद झाल्याने बेराजगार व शेतकऱ्यांची झालेली फसवणूक, सत्ताधारी व प्रशासनाचा नसलेला ताळमेळ यामुळे गावातील मतदारांमध्ये आघाडीतील पक्षाबद्दल प्रचंड चीड असून या निवडणुकीत मतदार मतदानातून व्यक्त करणार आहेत.''
केंद्राच्या योजना तळागाळापर्यंत
या निवडणुकीत भाजपच्या माध्यमातून पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिलेली जबाबदारी त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडली आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून राबविलेल्या विविध योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवल्या आहेत. त्यामुळे जनतेत व भाजपच्या कार्यकर्त्यांमध्येही उत्साह असून भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे व राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या नाकर्तेपणामुळे सर्व ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये भाजपचाच विजय निश्चित आहे.''
संपादन- अर्चना बनगे