राजापुरात साडेपाच महिन्यांत पुन्हा अवतरली गंगा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 एप्रिल 2019

राजापूर - राज्यासह राज्याबाहेरील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गंगामाईचे गुरुवारी (ता.२५) सकाळी सातच्या सुमारास तब्बल साडेपाच महिन्यांनी शहरानजीकच्या उन्हाळे तीर्थक्षेत्री आगमन झाले. उन्हाळे तीर्थक्षेत्री असलेल्या चौदा कुंडांसह काशीकुंड आणि मूळ गंगा या ठिकाणी गंगामाई जोरदारपणे प्रवाहित आहे. गंगास्नासाठी भाविकांची गर्दी वाढत आहे. 

राज्याच्या कानाकोपऱ्यातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या गंगामाईचे ७ जुलै २०१८ मध्ये आगमन झाले होते. त्यानंतर तब्बल शंभर दिवसांहून अधिक दिवस वास्तव्य केल्यानंतर १६ नोव्हेंबर २०१८ रोजी गंगामाईचे निर्गमन झाले होते. त्यानंतर आज गंगामाईचे तीर्थक्षेत्री आगमन झाले आहे. गंगा देवस्थानचे राहुल काळे आज सकाळी नेहमीप्रमाणे गंगातीर्थक्षेत्री गेले असता त्यांना गंगा आल्याचे दिसले. त्यामुळे भाविकांची गर्दी झाली आहे.

गेल्या काही वर्षापासून गंगामाईचे आगमन लहरी ठरले आहे. त्यामुळे गंगेचे आगमन झाल्याचे समजताच सुरवातीला अनेकांना ती अफवा असल्याचे वाटले. त्यामुळे अनेकांनी तीर्थक्षेत्री धाव घेतली. त्यावेळी गंगा आल्याचे समजले. गंगा चांगली प्रवाहित असून, सर्व कुंडांमध्ये पाण्याचे प्रमाण चांगले आहे. गायमुखही सध्या प्रवाहित आहे.  
 
गंगेचे आगमन आणि निर्गमनाबाबतचे कोडे अद्यापही उलघडलेले नाही. गेल्या काही वर्षामध्ये गंगामाईचे सातत्याने आगमन झाले आहे. नेमके असे कसे घडते, याचे अंदाज बांधणे सद्य:स्थितीमध्ये अशक्‍यप्राय गोष्ट आहे. केवळ निसर्गाची किमया आणि गंगामाईचा चमत्कारच म्हणावा लागेल.
- मंदार सप्रे, 

अध्यक्ष, गंगा देवस्थान

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rajapur Ganga become incarnate once again