
राजापूर पालिकेच्या निवडणुकीची तयारी
राजापूर : कोरोना महामारीमुळे लांबणीवर पडलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने शहरातील प्रभाग रचना निश्चित झाली आहे. असताना प्रशासनाकडून प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये ८ हजार १०५ मतदारांचा समावेश आहे. या मतदार यांद्यावर २७ जूनपर्यंत हरकती दाखल करायच्या आहेत.
नगरपालिकेची मुदत संपली असून, कोरोना महामारीमुळे या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. सद्यस्थितीमध्ये कोरोनाचा ज्वर कमी झालेला असल्याने येत्या काही महिन्यांमध्ये निवडणुका होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्या अनुषंगाने प्रशासनाकडून तयारी सुरू आहे. प्रभाग रचना निश्चित झाली असून, प्रभागनिहाय आरक्षण सोडतही झाली आहे. त्यामुळे लवकरच निवडणुका होण्याचे संकेत मिळत असताना आता प्रशासनाकडून प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली आहे.
या प्रारूप मतदार यादीवर २७ पर्यंत हरकती दाखल करायच्या आहेत. हरकतींवर प्रशासकीय सुनावणी होऊन त्या निकालात काढून मतदार यादीला अंतिम मान्यता दिली जाणार आहे. प्रारूप मतदार यादी जाहीर होताच ती पाहण्यासाठी इच्छुक उमेदवारांची पावले नगरपालिकेकडे वळली आहेत.
पाच वर्षांपूर्वी राजापूर नगरपालिकेच्या झालेल्या निवडणुकीमध्ये ७ हजार ५११ मतदारसंख्या होती. त्यामध्ये ३ हजार ६९१ पुरुष, तर ३ हजार ८२० एवढी महिला मतदारांची संख्या होती. पाच वर्षांनंतर या मतदारसंख्येमध्ये ५९४ मतदारांची वाढ झाली आहे.
काय आहे आरक्षण
येथील पालिकेची आगामी निवडणूक दहा प्रभागांतील वीस जागांसाठी होणार आहे. त्याची आरक्षण सोडत झाली असून, त्यामध्ये वीसपैकी दहा जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. उर्वरित जागा सर्वसाधारणसाठी आरक्षित असल्याने त्या ठिकाणी पुरुष वा महिला यापैकी कोणालाही निवडणूक लढविता येणार आहे. वीसपैकी केवळ एक जागा अनुसूचित जाती महिला यासाठी आरक्षित आहे. उर्वरित एकोणीस जागा सर्वसाधारणसाठी आरक्षित आहेत.
Web Title: Rajapur Municipality Election Preparations
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..