दागिन्याच्या लोभाने रामदास सावंत यांचा खून

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

चिपळूण - येथील पालिकेचे निवृत्त प्रशासकीय अधिकारी रामदास सावंत यांच्या खून प्रकरणी खेर्डीतील आकाश कुमार नायर (वय २४) याला पोलिसांनी तब्बल चार महिन्यानंतर अटक केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. नायर आणि सावंत यांच्यात चार वर्षांपासून समलैंगिक संबंध होते, अशी धक्कादायक माहिती पोलिस तपासात उघड झाली. 

चिपळूण - येथील पालिकेचे निवृत्त प्रशासकीय अधिकारी रामदास सावंत यांच्या खून प्रकरणी खेर्डीतील आकाश कुमार नायर (वय २४) याला पोलिसांनी तब्बल चार महिन्यानंतर अटक केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. नायर आणि सावंत यांच्यात चार वर्षांपासून समलैंगिक संबंध होते, अशी धक्कादायक माहिती पोलिस तपासात उघड झाली. 

जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी याबाबतची माहिती आज पत्रकार परिषदेत दिली. सावंत आणि नायर यांची चार वर्षापूर्वी पालिकेत ओळख झाली. त्याने नायर याला जन्म दाखला काढून दिला. पालिकेत नोकरी लावतो, असे आश्‍वासन देत त्याच्याकडून पैसेही घेतले होते. दोघांमध्ये गेली चार वर्ष समलैंगिक संबंध होते. अलीकडे नायर कर्जबाजारी झाला होता. सावंत यांच्या अंगावर सोन्याचे दागिने असल्याचे त्याला माहित होते. 

१ जानेवारीला रात्री ९ वाजता नायर त्याची दुचाकी घेऊन मध्यवर्ती बसस्थानकावर आला. तेथून सावंत यांच्या दुचाकीवर बसून दोघे बावशेवाडी येथील विहिरीजवळ गेले. सावंत यांनी मद्यपान केले होते. त्याचा गैरफायदा घेत नायर याने पाठीमागून त्यांच्या डोक्‍यावर सिमेंटची फरशी घातली व त्यांना ठार करून त्यांच्या शरीरावरील दागिने घेऊन तेथून तो पायी चालत परत बसस्थानक परिसरात आला. तेथून आपल्या दुचाकीने तो घरी निघून गेला. 

बस स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर सावंत यांच्या पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीचा पोलिसांनी शोध घेण्यास सुरवात केली. त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. पोलिस निरीक्षक देवेंद्र पोळ, शिरीष सासने यांचे पथक चार महिने वेगवेगळ्या मार्गाने तपास करत होते. उपविभागीय पोलिस अधिकारी सूरज गुरव चिपळुणात रुजू झाल्यानंतर या गुन्ह्याचा तपास त्यांच्याकडे देण्यात आला. त्यांनी पंधरा दिवसांत या गुन्ह्याचा शोध लावला. आरोपीकडून ९० हजारांचे दागिनेही जप्त केले. 

पकडण्याचे मोठे आव्हान पेलले
सीसीटीव्ही फुटेजमधील संशयित आरोपीचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. त्यामुळे त्याला पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. त्याचा टी शर्ट, हातातील किचन, त्याची चालण्याची स्टाईल आदी गोष्टींवर पोलिसांनी लक्ष केंद्रित करून त्याचा शोध घेतला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ramdas Sawamt murder follow up