धक्कादायक ! "रांगणागड' निवासस्थान पाच वर्षांपासून वापराविना

नंदकुमार आयरे
Thursday, 10 September 2020

जिल्हा मुख्यालयाच्या निर्मितीवेळी जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांची निवासाची सोय व्हावी, यासाठी मुख्यालयाच्या ठिकाणी मोक्‍याच्या जागी एकसारखे दिसणारी सहा प्रशस्त निवासस्थाने बांधण्यात आली. या निवासस्थानाला जिल्ह्यातील ऐतिहासिक गड व किल्ले यांची नावे दिली आहेत.

सिंधुदुर्गनगरी - जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी जिल्ह्याच्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या निवासाच्या सोयीसाठी लाखो रुपये खर्च करून प्रशस्त अशी निवासस्थाने बांधण्यात आली. यापैकी एक असलेले अतिरिक्त जिल्हाधिकारी यांचे "रांगणागड' या निवासस्थानाची देखभाल दुरुस्ती अभावी दुरवस्था झाली आहे. शासकीय वास्तूंचे जतन करण्याची जबाबदारी असलेल्या नवनगर प्राधिकरणचे मात्र याकडे दुर्लक्ष झाले आहे. 

जिल्हा मुख्यालयाच्या निर्मितीवेळी जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांची निवासाची सोय व्हावी, यासाठी मुख्यालयाच्या ठिकाणी मोक्‍याच्या जागी एकसारखे दिसणारी सहा प्रशस्त निवासस्थाने बांधण्यात आली. या निवासस्थानाला जिल्ह्यातील ऐतिहासिक गड व किल्ले यांची नावे दिली आहेत. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा न्यायाधीश, जिल्हा शल्य चिकित्सक व अप्पर जिल्हाधिकारी हे अधिकारी या निवासस्थानाचा लाभ घेत आहेत. यापैकी एक असलेले रांगणागड हे निवासस्थान अप्पर जिल्हाधिकारी यांच्यासाठी आरक्षित आहे. तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी रवींद्र सावळकर यांच्या बदलीनंतर या निवासस्थानाचा वापर झालेला नाही. त्यामुळे सद्यस्थितीत हे निवासस्थान वापराविना ओस पडले आहे. 

गेली पाच वर्षे या निवासस्थानाचा वापर होत नसल्याने आणि निवासस्थानाची देखभाल दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असल्याने सद्यस्थितीत या निवासस्थानाची दुरावस्था झाली आहे. निवासस्थानाचा परिसर जंगलमय झाला आहे. निवासस्थानाची इमारत ढासळत चालली आहे. जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी एकसारखी दिसणारी प्रमुख अधिकाऱ्यांची निवासस्थाने ही सिंधुदुर्गनगरीच्या वैभवात भर घालणारी आहेत; मात्र दुरावस्थेत अखेरच्या घटका मोजत आहे.

शासकीय निवासस्थाने इमारती यांची देखभाल करणे, ती सुस्थितीत ठेवणे ही जबाबदारी जिल्हा प्राधिकरणाची आहे; मात्र या निवासस्थानाच्या डागडुजीसाठी गेल्या पाच वर्षांत प्रयत्न झालेले दिसत नाही. सिंधुदुर्गनगरीच्या वैभवात भर घालणाऱ्या या सर्व शासकीय निवासस्थानाचा वापर व्हावा, या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने प्रयत्न करावेत. ही निवासस्थाने बांधण्यासाठी खर्च करण्यात आलेला शासनाचा लाखो रूपये निधी वाया जाणार नाही, याची दक्षता घ्यावी ही अपेक्षा आहे.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rangana Gad Collector Residence Vacant Last Five Years