esakal | रिपोर्ट पॉझिटिव्ह येताच नवरा बायकोने ठोकली धूम; आरोग्य यंत्रणेची तारांबळ

बोलून बातमी शोधा

रिपोर्ट पॉझिटिव्ह येताच नवरा बायकोने ठोकली धूम; आरोग्य यंत्रणेची तारांबळ
रिपोर्ट पॉझिटिव्ह येताच नवरा बायकोने ठोकली धूम; आरोग्य यंत्रणेची तारांबळ
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कणकवली : अँटिजेन रॅपिड टेस्टमध्ये कोरोना तपासणी अहवाल बाधित आल्याचे समजताच एका दाम्पत्याने आपल्या मुलीसह चिकित्सास्थळाहून धूम ठोकली. येथील पटवर्धन चौकात हा प्रकार घडला. सुदैवाने त्यांचे नाव, गाव नोंद असल्याने त्यांचा ठावठिकाणा लागला. त्यांना तत्काळ गृहविलगीकरणाचे आदेश दिल्याचे आरोग्य पथकाने सांगितले.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर तालुक्‍यात आरोग्य यंत्रणा सतर्क आहे. येणाऱ्या-जाणाऱ्यांचे स्वॅब घेतले जात आहेत. येथील पटवर्धन चौकात एक दाम्पत्य आणि त्यांची मुलगी बाधित असल्याचे अँटिजेन रॅपिड टेस्टमध्ये आढळले; मात्र ही तापसणी आम्हाला मान्य नसल्याचे सांगत त्या तिघांनीही वाहनातून तेथून धूम ठोकली. सुदैवाने त्यांचा पत्ता नोंद असल्याने आरोग्य विभागाला त्यांचा पत्ता लागला आणि संस्थात्मक किंवा गृहविलगीकरणाचे निर्देश देण्यात आले. अनेकजण अशाप्रकारे पळपुटेपणा करत असल्याने कोरोनाचा प्रसार अधिक वेगाने होत असल्याचे आजच्या या घटनेवरून दिसून येते.

दरम्यान, तालुक्‍यात आज ५५ नवे रुग्ण आढळले. तालुक्‍यात सध्या ५८४ एवढे सक्रिय रुग्ण आहेत, तर आतापर्यंत २९५६ एवढी बाधितांची संख्या झाली आहे. यात ६५ जणांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले. आज आढळलेल्या बाधितांमध्ये कणकवली शहरातील १२ जणांचा समावेश आहे. याखेरीज तरंदळे ३, साकेडी २, कलमठ ५, वागदे २, हरकुळ बुद्रूक ३, फोंडा ३, नांदगाव ३, नाटळ ३, ओझरम्‌ २, तळेरे ४, कळसुली ३, हुबरट १, जाणवली १, हरकुळ खुर्द १, ओटव १, शिवडाव १, भरणी १, सावडाव १, सांगवे १, करंजे १, हळवल १, असे गावनिहाय आजचे रूग्ण आहेत.

चौकात ५ पॉझिटिव्ह

शहरात येणाऱ्या नागरिकांची पटवर्धन चौकात अँटिजेन रॅपिड टेस्ट केली जाते. यात आज ५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात शिवडाव आणि कणकवली शहरातील प्रत्येकी एक तर तरंदळे गावातील एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश आहे.