मुंबई-गोवा महामार्गावर लावली दुर्मिळ 1000 झाडे

अजय सावंत
Sunday, 26 July 2020

वाईल्ड लाईफ इमर्जन्सी रेस्क्‍यू सर्व्हिस, सिंधुदुर्गच्यावतीने महामार्गावर दुर्मिळ व लोप पावत असलेली सुमारे 1000 पेक्षा जास्त झाडाची लागवड करण्यात आली. या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक होत आहे. 

कुडाळ : वाईल्ड लाईफ इमर्जन्सी रेस्क्‍यू सर्व्हिस, सिंधुदुर्गच्यावतीने महामार्गावर दुर्मिळ व लोप पावत असलेली सुमारे 1000 पेक्षा जास्त झाडाची लागवड करण्यात आली. या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक होत आहे. 

'झाडे लावा, झाडे जगवा' हे शासनाचे धोरण असून गेल्या काही वर्षापासून सुरू असलेल्या मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वृक्षतोड झाल्याने पर्यावरणाची हानी झालेली आहे. ती भरून काढण्यासाठी अनेक संस्था वृक्षारोपणासारखे कार्यक्रम राबवत आहेत. जैवविविधता व पर्यावरण रक्षणासाठी कटीबद्ध असलेल्या 'वाईल्ड लाईफ इमर्जन्सी रेस्क्‍यू संघटना, सिंधुदुर्गच्यावतीने मुंबई-गोवा महामार्गाच्या दुतर्फा सुमारे 1000 पेक्षा जास्त वृक्षांची लागवड केली. नष्ट होत चाललेली आणि दुर्मिळ झाडे लावण्याचा प्रयत्न संस्थेच्या वतीने केला. त्यामध्ये त्रिफळा, काझरा, जांभूळ, पंगारा, आंबा, कडूनिंब, भेंडी, फणस, बाओबा, ओऊळ, रुंबड, वड, पिंपळ, विरई आदी वृक्षांची लागवड करण्यात आली. 

वृक्षारोपण कार्यक्रमाचे उद्घाटन जेष्ठ शिवसैनिक व माजी शिवसेना जिल्हाप्रमुख भाई गोवेकर आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विकास कुडाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भरत परब, संस्थेचे अध्यक्ष अनिल गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी भविष्यात मुंबई ते गोव्यापर्यंत महामार्गाच्या दुतर्फा अशा प्रकारची झाडे लावून ती जगवण्याचा संस्थेचा मानस आहे, असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष अनिल गावडे यांनी केले. या उपक्रमाला उपाध्यक्ष आनंद बांबार्डेकर, सचिव वैभव अमृस्कर, खजिनदार महेश राऊळ, संजयकुमार कुपकर, कमलेश चव्हाण, सिद्धेश ठाकूर, दिवाकर बांबार्डेकर, डॉ. प्रसाद धूमक, गौतम कदम, बंड्या राऊळ, निलेश राऊळ, संदिप परब यांनी वृक्षारोपण करून हातभार लावला. शिल्पा पेडणेकर, प्रकाश रुद्रे, उपेंद्र सारंग, येथील पुष्पा हॉटेलचे मालक राणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. 
 

संपादन : प्रफुल्ल सुतार

सिंधुदुर्ग 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rare 1000 trees planted on Mumbai-Goa highway