देवरुखात सापडले दुर्मिळ जातीचे फुलपाखरू 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 July 2020

याला शास्त्रीय भाषेत मिमिक्री अस्त म्हणतात. मुख्यतः भक्ष्यकांच्या नजरेस पडू नये आणि केमॉफ्लाज मिळवता यावा यासाठी अशा प्रकारचे बदल सजीव आपल्या शरीरात घडवून आणतात असे सांगितले. 

देवरूख - येथील निसर्गप्रेमी आणि पक्षी तज्ञ प्रतिक मोरे यांना देवरूख-वरची आळी येथील त्यांच्या बागेत फिरताना सह्याद्री ब्लू ऑकलिफ नावाचे दुर्मिळ फुलपाखरू सापडले. 

प्रतीक हे माडाच्या झाडाशेजारी काम करत होते. एका पानाच्या हालचालीने त्यांचे लक्ष वेधले. माडाच्या बुंध्याला असं वेगळं पान कसं काय असेल या कुतुहलाने त्यांनी जवळ जाऊन पाहिलं असता त्यांना हे अचंबित करणारे हे फुलपाखरू दिसून आले. 
पंख मिटलेले असताना एखाद्या वाळलेल्या पानासारखे ते दिसत होते. वारा आल्यानंतर त्याच वार्‍याबरोबर होणारी हालचालसुद्धा पानासारखीच होती. इतकी हुबेहूब की एखाद्या भक्षकाला ते पानच वाटल पाहिजे. 

याबाबत बोलताना मोरे म्हणाले, निंफलिड म्हणजेच ब्रश फुटेड या कुळात मोडणारे हे फुलपाखरू मुंबईपासून दक्षिण दिशेच्या पश्‍चिम घाटात प्रामुख्याने आढळून येते. याचे पावसाळी आणि उन्हाळी असे दोन प्रकारचे फॉर्म्स दिसून येतात. म्हणजेच जसा आजूबाजूचा परिसर आपलं रुपड बदलतो तसे हे फुलपाखरूही आपली रंगसंगती  निसर्गाशी मिळतीजुळती होईल अशा पद्धतीने बदलते. याला शास्त्रीय भाषेत मिमिक्री अस्त म्हणतात. मुख्यतः भक्ष्यकांच्या नजरेस पडू नये आणि केमॉफ्लाज मिळवता यावा यासाठी अशा प्रकारचे बदल सजीव आपल्या शरीरात घडवून आणतात असे सांगितले. 

हे पण वाचा - देश कुठल्या संकटात अन् यांच्या मुलाखती! पहा निलेश राणेंचे खळबळजनक ट्विट

 

या फुलपाखराची मादी कारवी जातीच्या झाडांवर अंडी देते आणि म्हणूनच घाट, सह्याद्रीचे डोंगर, कडे, दाट झाडीची जंगले अशा ठिकाणी ही वनस्पती पर्यायाने हे फुलपाखरूसुद्धा प्रामुख्याने दिसून येतं. सह्याद्रीच्या जंगलात अशी वैविध्यपूर्ण प्रजाती अजूनही सापडते हे याचे ढळढळीत उदाहरण असल्याचे मोरे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A rare butterfly named Sahyadri Blue Oakleaf was found in devrukh