'नाणार प्रश्नी मुख्यमंत्री आणि शरद पवार यांची भेट घेणार'

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 8 November 2020

प्रकल्पाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा विरोध नसल्याचे रिफायनरी समर्थकांना सांगितले. 

रत्नागिरी : नाणार रिफायनरी प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे सविस्तर मांडणी केली, तर प्रकल्पासाठी सकारात्मक निर्णय होऊ शकेल. त्यासाठी दोघांचीही भेट घालून देण्याची जबाबदारी मी घेतो, असे आश्‍वासन देतानाच जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी प्रकल्पाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा विरोध नसल्याचे रिफायनरी समर्थकांना सांगितले. 

हेही वाचा - जयंत पाटलांनी घेतली फिरकी ; तालुकाध्यक्षच झाले क्‍लीन बोल्ड -

कोकण जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंढरीनाथ आंबेरकर यांच्यासह अविनाश महाजन, विद्याधर राणे, जुनेद मुल्ला, सचिन आंबेरकर, निलेश पाटणकर, केशव भट, आनंद जोशी, प्रमोद खेडेकर, सचिन शिंदे यांनी रविवारी (7) रात्री राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री पाटील यांची भेट घेतली. याप्रसंगी क्रेडाईतर्फे दीपक साळवी व राजेश शेटये यांनीही रिफायनरी प्रकल्प मार्गी लावण्यासाठी निवेदन दिले. 

राजापूर तालुक्‍यातील प्रस्तावित रत्नागिरी ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला मोठया प्रमाणावर समर्थन वाढले आहे. त्यामुळे हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी शासनस्तरावरून प्रयत्न व्हावेत आणि या प्रकल्पाची अधिसूचना पुन्हा काढली जावी, अशी मागणी त्या निवेदनाद्वारे केली. रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन वाढत असून साडेआठ हजार एकर जमिन मालकांनी जागा देण्यासाठी संमतीपत्रे दिली आहेत. ती मंत्री पाटील यांच्यापुढे सादर केली.

या प्रकल्पामुळे जिल्ह्याचे अर्थकारण बदलणार असून तो लवकरात लवकर मार्गी लावावा. शासनातील अधिकृत नेत्यांनी जाहीर केलेली भूमिका "जिथे जमीन द्यायला तयार होतील, तिथे आम्ही प्रकल्प करायला तयार आहोत" अशी आहे. नाणारसाठी जमीन देणाऱ्यांच्या संमतीचाही विचार करावा. मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह खासदार शरद पवार यांची भेट घडवून द्यावी, अशी मागणी केली. यावर प्रदेशाध्यक्षांनी आश्‍वासन दिले. 

हेही वाचा - श्रीमंतांना फायदा, सामान्यांचा तोटा ; आंबा बागायतदार कोलमडला

"रिफायनरी प्रकल्प व्हावा, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आम्हाला भेट दिली आणि आमचे म्हणणे ऐकून घेत सकारात्मक प्रतिसाद दिला."

 - अविनाश महाजन, प्रकल्प समर्थक

जयंत पाटील म्हणाले

राष्ट्रवादी पक्षाबरोबरच शरद पवार यांनी कधीही प्रकल्प विरोध केलेला नाही. प्रकल्पाचा निर्णय मुख्यमंत्री घेणार, मुख्यमंत्र्यांना भेटण्याची वेळ घेणार, कुमार शेट्ये, अजित यशवंतराव यांच्यामार्फत निरोप देईन. 

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rashtrawadi congress not opposed from nanar project said jayant patil in ratnagiri