esakal | कार्डधारकांना या महिन्यात धान्य वेळेवर मिळणार नाही ; काय आहे कारण ?
sakal

बोलून बातमी शोधा

ration card holders do not get grain in that month in ratnagiri

सर्व्हर बंद पडला तर मशीन बंद पडते. त्यामुळे ग्राहकांना रांगेत ताटकळत उभे राहावे लागते. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग नियम पाळणे कठीण होते.

कार्डधारकांना या महिन्यात धान्य वेळेवर मिळणार नाही ; काय आहे कारण ?

sakal_logo
By
राजेश शेळके

रत्नागिरी : कोरोनाच्या संसर्गामुळे पॉस मशीनवर कार्डधारकांचा ठसा घेण्याऐवजी एजन्सीधारकांचे ठसे घेऊन धान्य वितरित करण्यात यावे, या मागणीवर जिल्हा प्रशासनाकडून ठोस आश्‍वासन न मिळाल्याने जिल्ह्यातील रास्त दर धान्य दुकान चालक-मालक संघटनेच्या दुकानदारांनी 1 सप्टेंबरपासून धान्य वितरण बंद केले. यामुळे वितरण व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला. हजारो टन धान्य त्यामुळे पडून राहणार आहे. अनेक लाभार्थ्यांना या महिन्यात धान्य वेळेवर मिळणार नाही. 

हेही वाचा - लाखो रूपये खर्चून बांधाल्या शाळा, पण शिकण्यासाठी नाहीत विद्यार्थीच ; वाचा विद्यार्थी नसलेल्या शाळांची कथा...

जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण कमी प्रमाणात होते. तेव्हा रेशन कार्डधारकाचे ठसे घेऊन सप्टेंबरपर्यंत धान्य वितरण करण्याचे आदेश शासनाने दिले होते. त्यानुसार जिल्ह्यात वाटप सुरू आहे. मात्र अशा प्रकारे धान्य वितरित करताना अनेक अडचणी येत आहेत. सर्व्हर बंद पडला तर मशीन बंद पडते. त्यामुळे ग्राहकांना रांगेत ताटकळत उभे राहावे लागते. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग नियम पाळणे कठीण होते. प्रत्येक ग्राहकाचा पॉस मशीनवर ठसा घेण्यात येत असल्याने कोरोना संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे एजन्सीधारकांचे ठसे घेऊन धान्यवाटप करण्याची परवानगी हवी आहे.

रास्त दर दुकानदार आणि मदतनीस यांना शासनामार्फत विमा संरक्षण मिळावे, मागील चार महिन्याचे धान्य वाटपाचे कमिशन मिळावे, कोरोनामुळे राज्यात आतापर्यंत 20 ते 25 दुकानदारांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खबरदारीच्या उपाययोजना म्हणून कोरोना संपेपर्यंत सोशल डिस्टन्सिंगनुसार दुकानदारांचे आधार प्रमाणित करून पॉस मशिनद्वारे धान्य वितरण करण्याची मुभा द्यावी,अशीही मागणी आहे. या मागण्यांची तत्काळ पूर्तता करावी अन्यथा 1 सप्टेंबरपासून धान्य वितरण बंद केले जाईल, असा इशाराही संघटनेने दिला होता. याबाबत ठोस आश्‍वासन न मिळाल्याने रास्त धान्य दुकानदारांनी एक तारखेपासून धान्य वितरण व्यवस्था बंद केली आहे.

हेही वाचा -  आता मच्छी विक्री होणार टू व्हीलर, थ्री व्हीलर आणि फोर व्हीलरने सुद्धा

"कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे प्रत्येक कार्डधारकाचा पॉस मशीनवर ठसा घेण्याऐवजी एजन्सीधारकांचे ठसे घेऊन धान्य वितरित करण्याची मागणी आम्ही केली, मात्र अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही. याबाबत जबाबदारी घेण्यास प्रशासन तयार नसल्याने जोवर निर्णय होत नाही, तोवर धान्य वितरण बंद ठेवण्यात येईल."

- अशोक कदम, अध्यक्ष, जिल्हा रास्त दर धान्य दुकान चालक-मालक संघटना

संपादन - स्नेहल कदम 

loading image