esakal | Ratnagir Rain Update:कोळकेवाडीत वीजनिर्मिती बंद ; संगमेश्वरात पूर! चिपळूण, राजापूर भयग्रस्त
sakal

बोलून बातमी शोधा

Ratnagir

Ratnagir Rain Update: कोळकेवाडीत वीजनिर्मिती बंद; संगमेश्वरात पूर

sakal_logo
By
टीम ईसकाळ टीम

रत्नागिरी : जिल्ह्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने पुन्हा पूरस्थिती निर्माण झाली. त्यामुळे चिपळूण, दापोली, गुहागर, संगमेश्वर, सोमेश्वरवासीयांच्या (रत्नागिरी) मनात धडकी भरली. दापोलीत ढगफुटीसदृश पाऊस झाला. पावसाचा जोर कायम असल्याने चिपळूणमध्ये एनडीआरएफचे पथक दाखल झाले आहे. कोळकेवाडीतील वीजनिर्मित प्रकल्प बंद ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी दिल्या आहेत. चिपळूण तालुक्यातील वेलदूर-नवानगर-धोपावे रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली.

जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी १५६ मिमी, तर एकूण १४०४.९० मिमी पावसाची नोंद झाली आहे. पावसाचा जोर कायम असल्याने चिपळूण येथील वाशिष्ठी नदीचे पाणी भरून पुन्हा ओसरले आहे. संगमेश्वर तालुक्यात मात्र पाणी भरले आहे. तेथील सहा घरांना धोका निर्माण झाला आहे. रत्नागिरी तालुक्यात पावसाची रिपरिप सुरू आहे; मात्र कुठे पाणी भरल्याची घटना नाही. समुद्राला प्रचंड उधाण होते. त्यामुळे किनारी भागातील नागरिकांना सतर्कच्या सूचना दिल्या आहेत. पावसामुळे गणेशोत्सवाच्या खरेदीवर मात्र काहीसा परिणाम झाला. संध्याकाळी पाऊस कमी झाल्यानंतर नागरिक खरेदीसाठी बाहेर पडले.

दापोली तालुक्यातील जालगाव येथे ढगफुटीसदृश पाऊस झाला. त्यामुळे जालगाव समर्थनगर, लष्करवाडी, चैतन्यनगर, भाटकर हॉस्पिटल व ब्राह्मणवाडी गणपती मंदिर परिसरात पाणी शिरले आहे. यामुळे त्या भागातील नागरिकांची पाचावर धारण बसली. काळकाई येथे प्रकाश साळवी यांच्या घरासमोर पाणी शिरले होते. रूपनगर मनीष जगदीश कदम यांच्या घरासमोर पाणी शिरले. जीवितहानी नाही.

हेही वाचा: राजाराम बंधारा पाचव्यांदा पाण्याखाली; घाटात अतिवृष्टीचा इशारा

गेल्या २४ तासांतील पावसाची नोंद

मंडणगड १३२ मिमी, दापोली ३१५.४०, खेड १५१.५०, गुहागर १५८.८०, चिपळूण २०९, संगमेश्वर १६२.७०, रत्नागिरी १०४.९०, राजापूर ६२.६०, लांजा १०८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

loading image
go to top