esakal | राजाराम बंधारा पाचव्यांदा पाण्याखाली; घाट माथ्यावर अतिवृष्टीचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

rajaram Dam

जिल्हा प्रशासनाकडून दक्षतेचे आवाहन : जिल्ह्यात समाधानकारक पाऊस

राजाराम बंधारा पाचव्यांदा पाण्याखाली; घाटात अतिवृष्टीचा इशारा

sakal_logo
By
टीम ईसकाळ टीम

कोल्हापूर : गेल्या तीन दिवसापासून पावसाने कोकणासह , कोल्हापुरात जोर धरला आहे. मुसळधार पावसाने नद्यांची पाणीपातळी वाढली आहे. आज सकाळीच राजाराम बंधारा पाचव्यांदा पाण्याखाली गेला आहे.

पावसामुळे जिल्ह्यातील ऊस, भात, भुईमूगासह इतर कडधान्यांच्या पिकाला दिलासा मिळाला आहे. पंधरा दिवस पावसाने एकसारखी उघडीप दिल्यामुळे माळरानातील पिकांना पाणी देणे गरजेचे होते. उन्हाचा तडाख्यामुळे पिकांनी माना टाकल्या होत्या. अशा परिस्थिती दोन दिवसापासून पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फूलले आहे. राधानगरी, गगनबावडा, करवीर तालुक्‍यात जोरदार पाऊस झाला.

राज्यात पावसाने पुन्हा जोर धरला आहे. त्यातुलनेत कोल्हापूरमध्ये पावसाचे प्रमाण कमी आहे. उद्या मात्र घाट माथ्यावर अतिवृष्टी होईल असा इशारा दिला आहे. डोंगर माथ्याखाली असणाऱ्या लोकांनी आतापासूनच सावध राहिले पाहिजे. लोकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे अशाही सूचना प्रशासनाच्यावतीने दिल्या आहेत.

घाट माथ्यावर अतिवृष्टीचा इशारा

अतिवृष्टी, महापूरातुन सावरलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील घाट माथ्यावर पुन्हा उद्या (बुधवार) अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनीही याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, गेल्या आठ दिवसांच्या उघडीप दिल्यानंतर आज दिवसभर जिल्हात पावसाची संततधार सुरु राहिली. कसबा बावडा येथील राजाराम बंधारा अवघ्या काही तासाच पाण्याखाली गेला आहे.

‘तुळशी’तून वसर्ग सुरू

धामोड : येथील तुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये आज दुपारपासून पावसाचा जोर वाढला असून धरणाचा एक दरवाजा उघडला आहे. १२८ क्यूसेकने पाण्याचा विसर्ग तुळशी नदी पात्रात सुरू आहे. दरम्यान केळोशीतील लोंढा नाला प्रकल्पातून तुळशी धरणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोर वाढत आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्याने पाण्याची आवक वाढत आहे. यामुळे पाटबंधारे विभागाने एक दरवाजा उघडला आहे. धरणक्षेत्रात आजआखेर ३६१९ मि.मी. पाऊस झाला आहे. सध्या ६१६.७८ मी. धरणाची पातळी आहे.

दीर्घ प्रतिक्षेनंतर दमधार

पन्हाळा : पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना आज दिवसभर पडणाऱ्या कमी अधिक पावसाने दिलासा दिला. तालुक्यात दिवसभर सरी मागून सरी येत राहिल्या. सायंकाळी तर जोरदार पावसास सुरवात झाली. पावसामुळे पोसवणाऱ्या भात, संकरित ज्वारीला फायदा होणार असल्याने शेतकऱ्यांत समाधान पसरले आहे. पन्हाळ्यात तर पावसासह दाट धुके पसरल्याने पूर्णपणे पावसाळी वातावरण तयार झाले आहे.

बोरपाडळे परिसरात समाधान

बोपाडळे: गेले दोन दिवस पावसाची रिमझिम सुरू असून आसुसलेल्या पिकांना दिलासा मिळाला आहे. उसासह भात, भुईमुग, सोयाबीन, ज्वारी पिकाची अवस्था वाईट झाली होती. मिठारवाडी, शहापूर, माले, मोहरे, आंबवडे परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त होता. पावसाने थोडी संततधार धरल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

loading image
go to top