esakal | रत्नागिरीत पावसाचा दणका! दरडी कोसळल्या, गणपतीपुळेत घरात घुसले पाणी
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरीत पावसाचा दणका! गणपतीपुळेत घरात  घुसले पाणी

रत्नागिरीत पावसाचा दणका! गणपतीपुळेत घरात घुसले पाणी

sakal_logo
By
राजेश कळंबटे

रत्नागिरी : अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या दोन दिवसांत रविवारी दुसऱ्या दिवशीही पावसाने हुलकावणी दिली. पाऊस जोरदारही पडला नाही, सायंकाळआधी ऊन पावसाचा खेळ सुरू होता. हवामान विभागाने पुढील दोन दिवस रेड अलर्ट (Red Alert)दिला आहे; मात्र जिल्ह्यात अजूनही धोकादायक असा पाऊस कोसळला नाही. शनिवारी रत्नागिरीला झोडपणाऱ्या पावसाने रविवारी दिवसभर विश्रांती घेतली. पावसामुळे रत्नागिरी तालुक्यात तीन ठिकाणी दरड (Landslide)कोसळली. वरवडे, गणपतीपुळेमध्ये(Varavade, Ganpatipule) घरात पाणी भरण्याचे प्रकार घडले. ratnagiri-andslide-in-rain-update-kokan-marathi-news

सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी ५४.४४ मिमी पावसाची नोंद झाली. त्यात मंडणगड ४५.३0, दापोली १६.४0, खेड ५९.४0, गुहागर ५२.३0, चिपळूण ३२.३0, संगमेश्वर ५७.१0, रत्नागिरी १०४.६0, राजापूर ६१.00, लांजा ६१.६0 मिमी पाऊस झाला. शनिवारी रत्नागिरी तालुक्याला पावसाने झोडपले; मात्र रविवारी कडकडीत उन पडले होते. सायंकाळनंतर पुन्हा संततधार सुरू झाली. जिल्ह्यात सर्वत्र सरींचा पाऊस सुरू होता. जिल्ह्यातील मोठ्या नद्या वाशिष्टी, जगबुडी, बावनदीची पाणी पातळी स्थिर होती.

शनिवारी रात्री पडलेल्या पावसामुळे गणपतीपुळे निवेंडी, भगवतीनगर येथे ठिकठिकाणी पाणी साचले. रस्त्यावर गुढगाभर पाणी होते. गणपतीपुळेतील नीलेश नारायण माने यांच्या घरात पाणी शिरले. त्यांचे प्रापंचिक साहित्य वाहून गेले. यामध्ये हजारोंचे नुकसान झाले. अरुण रामचंद्र काळोखे यांच्या शेतातील बंधारा कोसळल्याने बागेत पाणी घुसले होते. मालगुंड येथील खारभूमीतील पाणी आणि चिखल रस्त्यावर आला. गणपतीपुळे समुद्र किनाऱ्‍यावरील संरक्षक भिंतीचे दगड लाटांच्या तडाख्यात वाहून गेले. वरवडेतील प्रकाश खेडेकर आणि रवींद्र खेडेकर यांच्या घरामागे दरड कोसळली. मातीबरोबर मोठे दगड खाली आले होते. उक्षीतील वाघजाई मंदिराजवळ संरक्षक भिंत कोसळली. नाखरेतील गजानन वाळीबेंच्या बागेचा संरक्षक बांध कोसळल्याने माती रस्त्यावर आली.

सुनील गराटेंच्या घराजवळील संरक्षक भिंत कोसळल्याने नुकसान झाले. वरवडेत खाडीचे पाणी किनाऱ्यावरील दोन घरांमध्ये शिरले होते. काजळी नदीची पाणी पातळी वाढत असल्यामुळे किनारी भागातील लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. रत्नागिरी शहरातील खालची आळी परिसरात पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. मुंबई-गोवा महामार्गावरील चौपदरीकरणातील माती निवळी येथील एका घरात शिरल्यामुळे नुकसान झाले आहे. याबाबत ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, चौपदरीकरणाची कामे व्यवस्थित करण्याची मागणी केली आहे.

दोणारी-वडवलीत (मंडणगड) रस्त्यावर कोसळलेली दरड हटवण्यात आली. दापोलीत मिलिंद खोपटकरांच्या घराचे अंशत: ५ हजार ३९५ रुपयांचे, दाभोळमध्ये विजय बोरघरांच्या घराचा बांध ढासळून शेजारील रामचंद्र बोरघरे यांच्या घराचे नुकसान झाले. चिपळूण माउकीत संतोष घाणेकर यांच्या घरावर वीज पडून नुकसान झाले. राजापूर दोनिवडेत बाळू पवारांच्या घराचे अंशत: १ लाख १५ हजारांचे, तर चुनाकोळवणमध्ये लक्ष्मण मटकरांच्या पडवीचे ४५ हजारांचे नुकसान झाले.

हेही वाचा- रत्नागिरीत मुसळधार पाऊस; काजळी नदीला पुराची शक्यता

१४, १५ जूनला रेड अलर्ट

हवामान विभागाकडून आलेल्या संदेशानुसार १४ आणि १५ जून या कालावधीत रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात अति मुसळधार पावसाची शक्यता असून, रेड अलर्ट जाहीर केला आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

loading image