. तर रत्नागिरीत लोकप्रतिनिधींचे पुतळे जाळून करू आंदोलन : वाचा कोण दिला असा इशारा

मकरंद पटवर्धन
Monday, 20 July 2020

अपुरे मनुष्यबळ, कमी संख्येने असणारे डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय यामुळे यंत्रणा कोलमडली आहे

.रत्नागिरी ः रत्नागिरीतील आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. जिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत. मात्र अपुरे मनुष्यबळ, कमी संख्येने असणारे डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय यामुळे यंत्रणा कोलमडली आहे.तात्काळ आरोग्य यंत्रणा सुधारा अन्यथा वेळ आली तर लोकप्रतिनिधींचे पुतळे जाळून आंदोलन करू, , असा सज्जड इशारा भाजपचे द. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांनी दिला.

काही खासगी रुग्णालये सेवा देण्यात नकारात्मक भूमिका घेत आहेत. शासनाचा भोंगळ कारभार सुरू आहे. त्यामुळे जनता घाबरली आहे. स्वॅब टेस्टिंग लॅबचे श्रेय घ्यायला सर्वांनी मिरवले. मात्र ही लॅब पूर्ण क्षमतेने चालू आहे का? अहवाल मिळण्यासाठी तीन दिवसाचा कालावधी लागतो. ही दिरंगाई होण्यामागे कारण काय? त्रुटी सुधारणा कशी करावी? सत्ताधारी कशात मशगुल आहेत? असे प्रश्‍न अ‍ॅड. पटवर्धन यांनी उपस्थित केले. 

हेही वाचा :रत्नागिरीत कोरोनाचा कहरच : आणखी ४० जणांना कोरोनाची बाधा... -

मंत्री, लोकप्रतिनिधी शासनकर्ते ढिम्म आहेत. स्क्रिनिंग चालू करण्याबाबत निर्णय होत नाही. जिल्हा रुग्णालयावर अतिरिक्त ताण येत आहे. डॉक्टरांची संख्या अपुरी आहे. तरीही लोकप्रतिनिधी पाठपुरावा करून डॉक्टर उपलब्ध करू शकत नाहीत. पालकमंत्री, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, आमदार, खासदार कधी प्रयत्न करणार. यांना जाग कधी येणार? असे अनेक प्रश्‍न रत्नागिरीकरांच्या मनात आहेत.

हेही वाचा-सीमाभागात शासकीय  महाविद्यालय ; मंत्री उदय सामंत -

अनेक कुटुंब दडपणाखाली

आरोग्य यंत्रणा सुधारा अन्यथा या गलथान कारभाराविरुद्ध आंदोलन उभारावे लागेल. ही आंदोलनाची वेळ नाही याची जाणीव आहे. मात्र आरोग्य यंत्रणेबाबत सहनशक्तीचा अंत पाहिला जात आहे. नागरिकांच्या आरोग्याचा खेळ होत आहे. अनेक कुटुंब प्रचंड दडपणाखाली आहेत. अशा वेळी जनतेच्या प्रश्‍नांना वाचा फोडावी म्हणून आक्रमक व्हावे लागेल, असेही अ‍ॅड. पटवर्धन यांनी सांगितले.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ratnagiri bjp District President Adv. Deepak Patwardhan caveat administration