रत्नागिरी : काजू प्रक्रिया उद्योगच आजारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kokan

रत्नागिरी : काजू प्रक्रिया उद्योगच आजारी

रत्नागिरी : कोरोनातील परिस्थितीमुळे कोकणातील काजू उद्योग आजारी पडला असून त्यांना वेळीच साथ दिली नाही तर हजारो लोकांचा रोजगार बुडणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सव्वातीनशेहून अधिक काजू प्रक्रिया उद्योजकांवर बँकांकडून कारवाईची टांगती तलवार आहे. चाळीस कोटींच्या कर्जांचे पुनर्गंठन करावे; अन्यथा प्रक्रिया उद्योजक अडचणीत येईल, अशी मागणी काजू प्रकिया व्यावसायिकांनी माजी खासदार, भाजपचे नेते नीलेश राणे यांच्याकडे केली. त्यांनीही व्यावसायिकांच्या अडचणी सोडवण्याचे आश्‍वासन दिले.

रत्नागिरी एमआयडीसी येथील काजू प्रक्रिया उद्योजक संदेश दळवी यांच्या दळवी कॅशू प्रकल्पाला गुरुवारी (ता. २९) भाजप नेते नीलेश राणेंनी भेट दिली. यावेळी दळवी यांच्यासह काजू प्रक्रिया संघटनेचे विवेक बारगिर, ऋषिकेश परांजपे, प्रताप पवार, संदेश पेडणेकर, दिनेश पवार, तौफिक खतीब आदी उपस्थित होते.

राणे यांनी संपूर्ण प्रकल्पाची पाहणी करताना त्यातील वेगवेगळ्या युनिट्सची सविस्तर माहिती घेतली. त्यांच्या समस्याही जाणून घेतल्या. दळवी यांनी सांगितले की, काजू प्रक्रिया उद्योग कष्टाने उभारला आहे. वीस हजार रुपयांच्या गुंतवणुकीतून सुरू केलेल्या या युनिटची उलाढाल कोटीच्या घरात गेली आहे. कोरोनामुळे दोन वर्षे उलाढाल थांबल्यामुळे उद्योजक अडचणीत आलेले आहेत. त्यासाठी शासनाने धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे, अशी मागणी काजू प्रक्रिया उद्योजकांनी राणेंकडे केली.

काजू प्रक्रिया व्यवसायिकांना येणाऱ्या अडचणी नीलेश राणे यांनी जाणून घेतल्या. थकीत कर्जामुळे उद्योजकांना नव्याने कर्ज देण्यास बँका तयार नाहीत. थकीत हप्ते वसूल करण्यासाठी बँकांकडून व्यावसायिकांकडे तगादा लावण्यास सुरुवात झाली असून, मालमत्तेवर टाच येण्याची टांगती तलवार त्यांच्यावर उभी आहे. नोटिसा येऊ लागल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे सव्वातीनशे काजू प्रक्रिया उद्योजक असून त्यांनी अंदाजित चाळीस कोटींच्यादरम्यान कर्ज उचलले आहे.

मालाची विक्री न झाल्यामुळे या उद्योजकांना मोठा फटका बसला आहे. तर काहींचा माल कमी किमतीमध्ये विकला गेला. त्या दोन वर्षांच्या परिस्थितीमधून सावरणे काजू व्यावसायिकांना अशक्य असल्याने ते हवालदिल झाले आहेत. यामधून त्यांना सोडविण्यासाठी कर्जाचे दहा वर्षांसाठी पुनर्गंठन करून बँकांकडून थकीत कर्जाच्या २५ टक्के रक्कम कर्ज स्वरुपात उद्योग पुन्हा उभारण्यासाठी दिले तरच यामधून सुटका होऊ शकेल; अन्यथा व्यवसाय बंद होईल आणि याचा फटका काजू शेतकरी, प्रक्रिया उद्योगात काम करणाऱ्या ७० टक्के महिलावर्गावर होणार आहे. या मागण्या ऐकून घेतल्यानंतर नीलेश राणे यांनी कोकणातील काजू व्यावसायिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आश्‍वासन दिले. याप्रसंगी काजू प्रक्रिया उद्योग संघटनेकडून नीलेश राणे यांचा सत्कार करण्यात आला.

बँकांचे कर्ज आम्हाला फेडायचे आहे; पण सध्याच उद्योग आजारी आहेत. त्यामधून सुटका करण्यासाठी शासनाने धोरण निश्‍चित करायला हवे. आम्हाला कर्जमाफीपेक्षा पुनर्गंठण मिळावे.

- प्रताप पवार, काजू व्यावसायिक