रत्नागिरी : खरेदीस गर्दी; वाहतूक कोंडीची वर्दी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ratnagiri Chiplun market shopping Traffic rush

रत्नागिरी : खरेदीस गर्दी; वाहतूक कोंडीची वर्दी

चिपळूण : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर येथील बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी झाली आहे. दुचाकींसह चारचाकी वाहनांची संख्या वाढली आहे. अरुंद रस्ते, अतिक्रमणे आणि त्यातच रस्त्यालगतच राजरोसपणे वेडीवाकडी वाहने उभी केली जात असल्याने शहरात पुन्हा वाहतूक कोंडीचे तीनतेरा वाजले आहेत.

आज चक्क वाहनचालकाने भर रस्त्यावरच आपली चारचाकी पार्क करून शॉपिंगला निघून गेल्याची घटना घडली. त्याच दरम्यान तेथे दाखल झालेल्या पोलिसांनी संबंधित वाहनचालकाला चांगलेच सुनावत तेथील वाहतूक सुरळीत केली. चिपळूणसाठी वाहतूक कोंडीची समस्या नवीन नाही. सण, उत्सवकाळात ही समस्या व्यापक बनते. रस्त्यावर अनेकवेळा वेड्यावाकड्या दुचाकी उभ्या केल्या जात आहेत. नगरपालिका प्रशासनाने शहरात तीन ठिकाणी वाहनतळ सुरू केले आहेत; मात्र तेथे पैसे देऊन वाहने पार्क करावी लागत असल्याने अनेकजण त्याकडे दुर्लक्ष करणेच पसंत करत आहेत.

चाकरमान्यांची वाहने पार्क

सध्या सर्वत्र गणेशोत्सवाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू आहे. सजावटीसाठी वस्तू व साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत गर्दी होऊ लागली आहे. चाकरमानीही मोठ्या संख्येने गावाकडे येत आहेत. त्यामुळे त्यांच्याही खासगी वाहनांची संख्या वाढली आहे. पार्किंगच्या जागा माहिती नसल्याने आणि गाडीपासून जवळच्या अंतरावरच खरेदी करावी, या विचाराने मिळेल, त्या ठिकाणी हे चाकरमानी आपले वाहन पार्क करून ठेवत आहेत.

वाहनांच्या रांगा

बाजारपेठेसह शहर परिसरात रस्त्यालगत अतिक्रमणे वाढली आहेत. ठिकठिकाणी हातगाडीवाले उभे असतात. त्यातच एखादा मोठा ट्रक किंवा एसटी या रस्त्यावर येतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. या वाहतूक कोंडीचा नाहक त्रास स्थानिक नागरिकांसह व्यापाऱ्यांना होऊ लागला आहे. वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या रांगा लागू लागल्याने ती वाहतूक सुरळीत करताना पोलिसांच्या वाहतूक शाखेला नाकीनऊ येत आहे. बाजारपेठेतील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवरही वाहतूक कोंडी होऊ लागली आहे.

Web Title: Ratnagiri Chiplun Market Shopping Traffic Rush Police

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..