
रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील शाळांसाठी पोषण आहारात बचत गटाकडून दरदिवशी शुद्ध, ताजे, गरम व उत्कृष्ट पद्धतीचे भोजन पुरवले जात होते; मात्र केंद्रीय स्वयंपाकगृहामधून ते करणे शक्य नाही. त्याचा मुलांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या प्रक्रियेला विरोध आहे, असे निवेदन रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह सतीश शेवडे यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिले आहे. तसेच निविदा प्रक्रियेमुळे स्थानिक बचत गटांवरही अन्याय झाला असून त्यांचा रोजगार हिरावला गेला आहे. त्यामुळे शहरात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
नागरी भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिजविलेल्या आहाराचा पुरवठा करण्यासाठी केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणाली करिता ठेका देण्याबाबत रत्नागिरी पालिकेकडून नुकताच निर्णय घेण्यात आला आहे. हा ठेका देण्यासंदर्भात जे निकष ठेवण्यात आलेले आहेत, त्यात स्थानिक महिला बचत गट बसत नसल्यामुळे निविदा भरण्याच्या प्रक्रियेतून स्थानिक महिला बचतगट पूर्णतः बाहेर फेकले गेले. आजवर रत्नागिरी शहर भागातील शाळांसाठी सेवा देताना कोणताही अनुचित प्रकार न उद्भवता विद्यार्थीगट लक्षात घेऊन पुरविण्यात आलेली निर्विवाद सुविधा याकडे आपणांस दुर्लक्ष करता येणार नाही.
नगरपालिकेच्या या निर्णयाचा विरोध आहे. हे ठेके देण्यासंदर्भात घेतलेला निर्णय त्वरित रद्द करून शाळांना पोषण आहार अंतर्गत मध्यान्ह भोजन सुविधा पुरविण्यासाठी स्थानिक महिला बचत गटांना निविदा देऊन त्यांचा रोजगार अबाधित ठेवण्याबाबत निर्णय घ्यावा, असे निवेदनाद्वारे सांगण्यात आले आहे.