रत्नागिरीत कॉंग्रेस आक्रमक, टायर जाळून निषेध 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 2 October 2020

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ मुख्य रस्त्यावर टायर जाळून रस्ता अडवण्यात आला.

रत्नागिरी : केंद्र सरकारने कृषी विधेयक काढून देशातील शेतक-यांवर अन्याय केला आहे. हे विधेयक तात्काळ रद्द करावे यासाठी रत्नागिरी जिल्हा कॉंग्रेस कमिटीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडले. यावेळी जिल्हाधिकारी कायालयासमोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच हाथरस येथील मुलीवर झालेल्या अत्याचारानंतर त्या पिडित मुलीच्या कुटुंबियांना सांत्वन करण्यासाठी गेलेले खासदार राहूल गांधी यांना धक्काबुक्की करुन त्यांना अटक करण्यात आली. या घटनेचा देखील जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने निषेध व्यक्त केला. 

यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ मुख्य रस्त्यावर टायर जाळून रस्ता अडवण्यात आला. यावेळी देखील भाजप सरकारच्या कारभारावर जोरदार टीका तसेच घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी सुरुवातीला पोलिस आणि कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये थोडी झटापट देखील झाली. कॉंग्रेस प्रभारी मनोज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आले.

हे पण वाचारत्नागिरीत खाजगी रुग्णालयातील बिलांवर ऑडीटरची नजर  

यावेळी जिल्हाध्यक्ष अॅड.विजय भोसले, माजी विधान परिषद आमदार हुस्नबानू खलिफे, नवी मुंबई महानगर पालिकेचे माजी उपमहापौर तथा नवरसेवक अविनाश लाड, जिल्हा उपाध्यक्ष अशोक जाधव, प्रदेश महिला कॉंग्रेसच्या श्रीमती रुपालीताई सावंत, जिल्हा महिला कॉंग्रेसच्या श्रीमती अश्विनी आगाशे, अल्पसंख्यांक विभाग जिल्हाध्यक्ष हारिस शेकासन, खेडचे तालुकाध्यक्ष गौस खतीब, जिल्हा कॉंग्रेस अनुसूचित जाती-जमाती विभागाचे जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, कपिल नागवेकर, दिपक राऊत, अल्पेश राऊत, लियाकत शहा आदि उपस्थित होते.

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ratnagiri congress protest on collector office