esakal | Ratnagiri: चार एंट्रीपॉइंटवर कोरोना चाचणी
sakal

बोलून बातमी शोधा

corona

Ratnagiri: चार एंट्रीपॉइंटवर कोरोना चाचणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी: गणेशोत्सवात येणाऱ्या चाकरमान्यांमुळे कोरोनाचा विस्फोट होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. गावात येणाऱ्या चाकरमान्यांवर ग्राम कृतीदल आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची नजर राहील. जिल्ह्यातील चार इंट्रीपॉइंटवर कोरोना तपासणीची व्यवस्था आरोग्य विभागाकडून करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून जिल्हा परिषद आरोग्य विभागाला देण्यात आल्या आहेत.

कोकणात रेल्वे, एसटी व खासगी गाड्यांमधून मोठ्याप्रमाणात चाकरमानी गावी येणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर कोरोना तपासणीसंदर्भात दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी यांनी जिल्हा परिषद आरोग्य विभागाची बैठक घेतली होती. त्यामध्ये महत्त्वाच्या सूचनाही दिल्या.

हेही वाचा: गारवा देणारा रत्नागिरीतील 'हा' परिसर पर्यटकांना साद घालतोय; पाहा व्हिडिओ

जिल्ह्यात प्रत्येक चेकपोस्टवर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंडप बांधण्यात येणार आहेत. त्यात सर्व विभागाच्या कर्मचाऱ्यांची पथके उपस्थित राहतील. महत्त्‍वाची बसस्थानके आणि रेल्वेस्थानकांवर आरोग्य विभागाची पथके कार्यरत राहतील. परजिल्ह्यातून गावात, वाडीत येणाऱ्यांची कोरोना चाचणी करून घेण्यास प्रवृत्त करण्याची जबाबदारी ग्राम कृतीदलाकडे दिली आहे.

बाधित आल्यास संबंधिताला संस्थात्मक विलगीकरणात ठेवले जाईल. चाकरमान्यांची यादी तयार करून लक्षणे असलेल्या व्यक्तीची माहिती तत्काळ आरोग्य विभागाला कळवण्याच्या सूचना दिल्या आहेत. सार्वजनिक कार्यक्रम, घरगुती-सांस्कृतिक कार्यक्रमाला गर्दी होणार नाही, याची दक्षता ग्रामकृती दलाकडे देण्यात येणार आहे.

जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी कशेडी, मुर्शी, कुंभार्ली, खारेपाटण ही प्रामुख्याने चार ठिकाणे आहेत. तेथे आरोग्य पथकाने प्रथमोपचार कीट ठेवावे. कोरोना तपासणीच्या अनुषंगाने अद्ययावत सोयीसुविधांसह उपस्थित राहावे. विलगीकरण कक्ष गावातच तयार केले जाणार आहेत, त्यासाठी तहसीलदार व गटविकास अधिकारी मार्गदर्शन करतील. ऐच्छिक प्रवाशांसाठी पेड तपासणी सुविधा ठेवण्यात येणार आहे. तपासणी पथकाच्या ठिकाणी रुग्णवाहिका उपलब्ध ठेवण्यात येणार आहे.

हेही वाचा: 'अनिल परबांचे बांधकाम वाचवून दाखवाच!'; पाहा व्हिडिओ

गणेशोत्सवानिमित्त जिल्ह्यातील प्रवेशद्वारनिहाय दरदिवशी सायंकाळी पाचपर्यंत प्रवाशांची माहिती एकत्रित केली जाईल. त्यात खासगी प्रवासी बस, एसटीमधून प्रवास करणाऱ्यांच्या नोंदी असतील. नाव, संपर्क क्रमांक, प्रवासाचे ठिकाण, नातेवाईकांचा संपर्क क्रमांक, डोस घेतले किंवा नाही, ७२ तास आधी चाचणी केली किंवा नाही याचा समावेश असेल.

एसटी विभागाकडून ती माहिती तालुका आरोग्य अधिकारी, गटविकास अधिकारी यांना व्हॉटसअ‍ॅपद्वारे दर तीन तासांनी पाठवण्यात येईल. तालुकास्तरावरुन ती ग्रामकृती दलांकडे जाईल. त्याद्वारे ग्रामकृती दल गावात आलेल्या प्रवाशांची तपासणी किंवा चाचणी करण्यास प्रवृत्त करतील.

अपघात क्षेत्रात २४ तास रुग्णवाहिका

अपघातप्रवण क्षेत्रात मदतीसाठी आरोग्य विभागामार्फत रुग्णवाहिका ठेवाव्यात. पथकाच्या ठिकाणी संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रांनी औषधसाठा उपलब्धतेबाबत नागरिकांना माहिती होण्यासाठी रुग्णवाहिका क्रमांक, वाहनचालकाचे नाव व संपर्क क्रमांक, पर्यायी नंबर, संबधित अधिकाऱ्यांचे नाव व नंबर प्रसिद्ध केले जाणार आहेत.

loading image
go to top