Ratnagiri : सामाजिक अभिसरणाचा सृजनोत्सव

निर्गुण निराकारातून सगुण साकारतेमध्ये कोणत्याही रूपात प्रगट होणारी आराध्य देवता, म्हणजे श्री गणेश
KOKAN
KOKAN SAKAL

आपले सण, त्यांचा उगम, त्यांची परंपरा व ते साजरे करण्याच्या प्रथा यांची निसर्गाशी उत्तम सांगड घातलेली आहे. आहार-विहार आणि नैसर्गिक वातावरण, पर्यावरण यांच्यात एक अंतर्यामी दुवा जाणवतो. माणसाला आनंद व्यक्त करायचा असेल, निसर्गपूजन करायचे असेल, कृतज्ञता व्यक्त करावयाची असेल, निसर्गाला शरण जायचे असेल तर मनातील भाव व्यक्त करण्यासाठी मानवीरूपाचे आरोपण करून देव ही प्रतिमा निर्माण केली जाते. आधी उल्लेखलेल्या भावभावनांना वाट मोकळी करून दिली जाते. यामध्ये सर्वांत विलोभनीय असते भूमातेची आणि पशूंची पूजा.

श्री गणपती हा तर चराचर व्यापून राहिलेला. त्यामुळे श्री गजाननाचे पूजन म्हणजे भक्तांसाठी आनंदसोहळाच. हाच सोहळा कोकणात घरोघरी अनुभवता येतो. प्रचंड ऊर्जेने अवघा समाज भारलेला असतो. धार्मिक संकल्पनेपलीकडे गणपतीमध्ये साजऱ्या होणाऱ्या या सणाला कौटुंबिक, सामाजिक, सांस्कृतिक, कलात्मक अंगही आहेत. सामाजिक अभिसरण घडविणारा हा सृजनोत्सवच असतो.

- शिरीष दामले, रत्नागिरी

महाराष्ट्रभर, त्यातही रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यांत साजरा होणारा गणेशोत्सव म्हणजे भक्तीचे आणि काही वेळा भक्तांचेही अत्यंत उत्कट असे दर्शन असते. पंढरपूरच्या वारीमध्ये जसे वारकरी एकरूप होतात तसेच गणेशाच्या भक्तीमध्ये हा आविष्कार दिसून येतो. या दोन जिल्ह्यांतील घरोघरी, मंदिरात वा सार्वजनिक ठिकाणी साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाची महती वेगळीच. निर्गुण निराकारातून सगुण साकारतेमध्ये कोणत्याही रूपात प्रगट होणारी आराध्य देवता, हे या गणेशाचे सर्वांत भावणारे वैशिष्ट्य. तो सगुण आणि निर्गुण अशा कोणत्याही रूपात, चराचरात भरलेला आहे, याच भावनेचा परिपोष गणेशोत्सवात झालेला दिसतो. यामुळे कोणत्याही एका ठिकाणी नाही, तर घरोघरी भक्तीचे मळे फुललेले आढळतात.

गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा

मुळारंभ आरंभ तो निगुर्णांचा

असाही श्रीगणेश असल्याने सगुण साकाररूपात पूजा करण्याची आस लागलेल्या भक्तांना गणेशमूर्ती आणण्याची तीव्र इच्छा असते. पार्थिव पूजेपासून ते दहा दिवसांपर्यंत ही मूर्ती घरात प्रतिष्ठापित केली जाते. हा गणांचा प्रमुख मुख्य घरात आणला जातो. एकत्र कुटुंबात पूर्वी सर्व एकत्र नांदत असताना गणेशमूर्ती आणली जाई. त्याच घरात म्हणजेच मूळ घरात गणेशमूर्ती आणली जाते.

आपली मुळे कुठे यांची पक्की जाणीव यामुळे होत राहते. विभक्त कुटुंबपद्धत सुरू झाली. चुली वेगवेगळ्या झाल्या तरी गणपती मूळ घरीच असतो. हौसेखातर तो इतरत्र आणला तरी मूळ गणपतीचे माहात्म्य वेगळेच. एकत्र कुटुंबपद्धतीत विनासायास विभक्त झालेलेही एका घरात येऊन सुखेनैव नांदण्याची आणि नांदवण्याची ही किमया फक्त गणेशोत्सवातच. कोकणात शिमगाही मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. तेव्हाही देव घरी यायचे ही अत्यंत भक्तिपूर्ण भावना असतेच; परंतु तिथे मानमरातब, मानकरी, पहिला मान कोणाचा, असा प्रकार असतो. गणपतीमध्ये फक्त गणपती. त्यामुळे गणेशोत्सवात कधीही शांतताभंग होत नाही. आनंदाचे ताटवे फुलून येत असतात. माझ्या व आमच्या घरी आमचा गणपती बघायला ये, अशी साद घातली जाते.

KOKAN
Devgad : गणरायाच्या स्वागतासाठी धावपळ

तसे पाहिले तर घरोघरचा गणपती एकच. तरीही ती या हृदयाची त्या हृदयाला घातलेली साद असते. नात्यांचा किंवा खरं तर बिननात्यांचा असा जिव्हाळा गणपतीत प्रकर्षाने पाहायला मिळतो. ना खाण्यापिण्याची रेलचेल ना पंगती उठतात ना इतर आकर्षणे वा प्रलोभने, तरीही बाप्पाच्या दर्शनासाठी लोक एकमेकांच्या घरी जातच असतात. या मागे भक्तीसोबतच नातेसंबंधांची घट्ट वीण अगदी अनौपचारिकपणे जपलेली आढळते.

म्हटल्या तर त्याच आरत्या, तेच किंवा थोडे वेगळे ताल, पारंपरिक तीच भजने. कधी ठेका वेगळा; पण ती आळवण्यासाठी पुन्हा घराघरातून वाढत्या उत्साहाने लोक जात असतात. कुटुंबातून दूरवर गेलेला चाकरमानी काहीही करून गणपतीला घरी येतोच. गावात वा आसपास वेगवेगळे राहणारे लोक गणपतीमध्ये एकाच छताखाली येतात.

माहेरवाशिणींची गौर

गणपतीत येणारी गौर म्हणजे खास माहेरवाशिणींचा सण. त्या वेळी माहेरी आलेल्या लेकीचे कोण कौतुक! काही वेळा या लेकीला नातही झालेली असते; मात्र माहेरास ती लेकच असते. या निमित्ताने गावोगावी असलेल्या प्रथा आणि परंपरा यांचा सहज धांडोळा घेतला तर माहेरवाशिणींच्या घरातील स्थानाची ही उजळणीच असते. माहेर आणि वात्सल्यभावनेचा इतका मनोहारी आणि हृद्य आविष्कार माहेरी आलेल्या गौराईच्या पूजनातच आढळतो. पुन्हा यांत आदिशक्तीचे रूप पाहिले जातेच. गौरीचा औसा लग्न होऊन गेलेली नव्या नव्हाळीची लेक आणि जावई यांचा खास सण असतो. म्हणजे पुन्हा नात्यांची वीण घट्ट करण्याचा भागच.

समाज बांधून ठेवणारा सण

एखादी गोष्ट सतत सुरू असली की, त्यातील आनंद, भाव कमी होत जातो हा अर्थशास्त्राचा सिद्धांत गणेशोत्सव पूर्णपणे खोटा ठरवतो. गणेशाच्या प्रतिष्ठापनेपासून उत्तरोत्तर भक्तीचे रंग अगदी गडद होत जातात. त्याच्या आनंदात भर पडत जाते. हा आनंद व्यक्तिगत आणि सामुदायिक रूपातही लुटायला शिकता येते. तो साजरा करताना उन्माद नको, याची विवेकी जाणीव मात्र आता देणे आवश्यक वाटते. गणरायाला निरोप देताना तोही गात, नाचत, भक्तिपूर्ण आणि हर्षभराने द्यायचा, ही संस्कृती खास गणेशोत्सवातीलच. या सणात ना कसले अवडंबर ना भक्तश्रेष्ठतेला थारा.

या उत्सवाचे सांस्कृतिक अंगही माणसामाणसाला अधिक जवळ आणते. सर्जनशीलतेला आवाहन ही देवताच करते. त्यामुळे कलांचाही अधिपती असलेल्या गणरायासमोर कला सादर होतात. गायन, वादन, नर्तन, नाट्य, लेखन, काव्य यांचे मनोहारी आविष्कार उत्सवात मोठ्या ऊर्जेने बाहेर पडतात. त्यामुळे अशा ऊर्जेने वातावरण भारले जाते. इतर कोणत्याही सणात हा अनुभव येत नाही. माणसामाणसांतील नातेसंबंध, त्यांतील सर्जनशीलता, नात्यांतील परस्पर संवाद आणि त्यातून निर्माण होणारी सामुदायिक ऊर्जा आणि त्याला असलेले आध्यात्मिक वलय हे गणेशोत्सवाचे सहजपणे गृहीत धरलेले; पण अत्यंत महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. समाज परस्परातील नात्याने बांधून ठेवण्याची ताकद यामध्ये आहे.

प्रबोधनाची साधलेली संधी

उत्सव म्हटला की, शेकडो लोक एकत्र येतात; मात्र त्यामुळे निर्माण होणारा उन्माद कोकणातील खेडोपाड्यांत गणेशोत्सवात कधीच दिसत नाही. एकत्र आलेल्या समाजाला दिशा देण्यासाठी, त्यांचे प्रबोधन करण्यासाठी गणेशोत्सव ही उत्तम संधी साक्षात बाळ गंगाधर टिळक यांना जाणवली. त्यांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक रूप दिले. पुढचा सारा भाग ज्ञातच आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रत्नागिरीमध्ये १९२१ ते १९२९ या कालावधीत सामाजिक सुधारणांची चळवळ गणेशोत्सवातून रेटण्याचा प्रयत्न केला. आजही असे प्रयत्न सुरू आहेत.

मूर्त वा अमूर्त, कोणत्याही पद्धतीने गणपतीची आराधना, उत्सव करता येतो. त्यामुळे ओंकार असेल किंवा जास्वंदीचे फूल, त्यातही गणेश प्रतिमा दिसते. घरोघरी आणलेला बाप्पा माझा असतो, आमचा असतो, त्यांचा असतो, तुमचा असतो, तरीही त्याला बघायला कोकणी माणूस एकमेकांकडे जातो. बाप्पापासून कोणी विभक्त नाही त्यामुळे तो साऱ्यांचाच असतो. यापेक्षा आणखी मोठी शिकवण देणारा दुसरा उत्सव नाही.

नात्यांची वीण होते घट्ट

लोकांमधील नातेसंबंध दुरावत आहेत. लोकांना एकमेकांसाठी वेळ नाही. कुटुंबात ताणतणाव वाढतात. कौटुंबिक नाती विरत आहेत, असे चित्र काही प्रमाणात दिसत असताना या साऱ्यांपेक्षा वेगळे चित्र गणेशोत्सवात पाहायला मिळते. गणपती विसर्जनानंतर चाकरमानी परत जातो तो पुढच्या वर्षी काय करायचे, हेच ठरवत असतो. ही या सणाची आगळी महती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com