Ratnagiri Dam Mishap : राष्ट्रवादीकडून २४ लाखांची मदत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 जुलै 2019

चिपळूण - तिवरे धरण दुर्घटनेतील आपद्‌ग्रस्तांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून २४ लाखांची मदत देण्यात आली. राज्य व केंद्र सरकारकडून भरीव मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीन, असे आश्‍वासन पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले. 

चिपळूण - तिवरे धरण दुर्घटनेतील आपद्‌ग्रस्तांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून २४ लाखांची मदत देण्यात आली. राज्य व केंद्र सरकारकडून भरीव मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीन, असे आश्‍वासन पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले. 

श्री. पवार यांनी तिवरे धरण दुर्घटनेतील वाचलेल्यांची भेट घेतली. त्यांच्या हस्ते २४ आपद्‌ग्रस्तांना प्रत्येकी एक लाखाचे धनादेश देण्यात आले. तिवरे ग्रामदेवतेच्या मंदिरात आपद्‌ग्रस्तांशी संवाद साधला. या वेळी आमदार भास्कर जाधव, संजय कदम, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस शेखर निकम, जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव आदी उपस्थित होते.

या वेळी आमदार जाधव म्हणाले, ‘‘तिवरे धरणग्रस्तांचे झालेले नुकसान न भरून येण्यासारखे आहे; मात्र तातडीची मदत म्हणून प्रत्येकाला चार लाख रुपये देण्यात आले आहेत. ही मदत पुरेशी नाही. एखादा माणूस नदीतून वाहून गेला तरीही नैसर्गिक आपत्तीच्या निधीतून अशी मदत केली जाते. तिवरे धरण दुर्घटनेची व्याप्ती मोठी आहे. त्यामुळे मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि पंतप्रधान यांच्या निधीतून मदत मिळणे अपेक्षित आहे. आघाडी सरकारच्या काळात अशी मदत देण्यात आली होती.’’

दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला रोजगार मिळाला पाहिजे. येथील ग्रामस्थांचे स्थलांतर करताना कोयना प्रकल्पाच्या अलोरे येथील शासकीय जागेत स्थलांतर व्हावे, अशी मागणी आमदार जाधव यांनी केली. 

मुख्यमंत्र्यांची झाली भेट
यावेळी पवार म्हणाले, ‘‘सरकारकडून मदत मिळवून देण्यासाठी मी शंभर टक्के प्रयत्न करीन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कालच भेट झाली. या घटनेबाबत त्यांच्याशी चर्चा केली. तिवरेतील आपद्‌ग्रस्तांना सर्व प्रकारची मदत करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. आपद्‌ग्रस्तांना नोकरी, कसण्यासाठी शेतजमीन आणि त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी मी प्रयत्न करीन.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ratnagiri Dam Mishap NCP help 24 lakh Tivare