Ratnagiri Dam Mishap : आमदार चव्हाण यांच्यावर कारवाई करा - निलेश राणे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 जुलै 2019

चिपळूण - तिवरे धरण दुर्घटनेप्रकरणी अधिकार्‍यांसह आमदार सदानंद चव्हाण यांच्यावर 302 खाली गुन्हा दाखल करा, अशी मागणी माजी खासदार निलेश राणे यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

चिपळूण - तिवरे धरण दुर्घटनेप्रकरणी अधिकार्‍यांसह आमदार सदानंद चव्हाण यांच्यावर 302 खाली गुन्हा दाखल करा, अशी मागणी माजी खासदार निलेश राणे यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

सिंधुदुर्गात आमदार नितेश राणे यांच्यावर कारवाई होते तर मग 23 बळी घेणारे आमदार चव्हाण यांच्यावर कारवाई का नाही ? असा सवाल त्यांनी केला. ते म्हणाले, तिवरेमध्ये आपदग्रस्तांना शासनाकडून तातडीची मदत केली. ही मदत आपदग्रस्तांसाठी नाही तर ते आक्रमक होऊन प्रकरण चिघळू नये यासाठी आहे. आमदार चव्हाण यांना वाचवण्यासाठी हा खटाटोप सुरू आहे.

दुर्घटना घडून चार दिवस झाले. तिवरे धरण दुर्घटनेची एसआयटीमार्फत चौकशी केली जाईल, असे आश्‍वासन देण्यात आले. मात्र अद्यापपर्यंत ना अधिकाऱ्यावर कारवाई झाली ना आमदारांवर खटला दाखल झाला. याबाबत मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून हे प्रकरण त्यांच्या निदर्शनास आणणार आहे. आमदार चव्हाण यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी मी करणार आहे. तिवरे धरणाचे आयुष्य 100 वर्षांचे असताना 14 वर्षांतच धरण फुटले कसे ? 4 कोटींचे काम 14 कोटींवर गेले कसे ?  हे कामच पूर्ण बोगस झाल्याचा आरोप त्यांनी केला. 

तिवरे धरण खेकड्यांमुळे फुटल्याचे विधान जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांनी केले. त्यांच्या विधानाचा राणेंनी समाचार घेतला. खेकड्यांनी धरण फोडले असे विधान करणार्‍यांना मंत्र्यांना चपलांचा हार घालावासा वाटतो. खेकड्यांमुळे धरण फुटले असे जगातले एक तरी उदाहरण दाखवा ? हा सर्व जनतेच्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याचे त्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ratnagiri Dam Mishap Nilesh Rane comment