Ratnagiri Dam Mishap : पुजारी दांपत्याची रात्र घराच्या छतावर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 जुलै 2019

चिपळूण - तिवरे धरणाच्या नदीवर पुण्यातील पुजारी दांपत्याने जागा विकत घेऊन दुमजली घर बांधले होते. मंगळवारी रात्री तिवरे धरण फुटल्यानंतर पुजारी यांच्या पहिल्या मजल्यावरील घरात पाणी शिरले. घराचा निम्मा भाग वाहून गेला. घराच्या दुसऱ्या मजल्यावर पाणी येईल, या भीतीने पुजारी दांपत्याने घराच्या छतावर रात्र काढली. 

चिपळूण - तिवरे धरणाच्या नदीवर पुण्यातील पुजारी दांपत्याने जागा विकत घेऊन दुमजली घर बांधले होते. मंगळवारी रात्री तिवरे धरण फुटल्यानंतर पुजारी यांच्या पहिल्या मजल्यावरील घरात पाणी शिरले. घराचा निम्मा भाग वाहून गेला. घराच्या दुसऱ्या मजल्यावर पाणी येईल, या भीतीने पुजारी दांपत्याने घराच्या छतावर रात्र काढली. 

घराच्या पायथ्याशी रवींद्र तुकाराम चव्हाण यांचे घर होते. धरण फुटल्यानंतर त्यांनी आरडा-ओरडा केला, मात्र चव्हाण यांनी मद्यपान केले होते, त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे कुणी लक्ष दिले नाही, मात्र परिस्थितीची माहिती असल्यामुळे त्यांनी ७५ वर्षाच्या आजी लक्ष्मी शिवराम चव्हाण यांना घरातून बाहेर काढले.

धरणाच्या माथ्यावरील सुरक्षित ठिकाणी सोडून ते पुन्हा घराकडे आले. तेव्हा चव्हाण यांचे घर पाण्यात वाहून गेले होते. चव्हाण यांच्या घरात एकूण ९ जण होते. त्यापैकी ७ जण वाहून गेले. वाडीतील ७० वर्षाच्या राधिका चव्हाण ह्या आपल्या नातेवाइकांसह खेर्डी येथे गेल्या होत्या. चव्हाण यांचे नातेवाईक पुन्हा भेंदवाडीत आल्या मात्र राधिका चव्हाण खेर्डीत राहिल्या. त्यामुळे त्या वाचल्या. त्यांच्या कुटूंबातील इतर सर्वजण वाहून गेले. धरण फुटल्यानंतर तिवरे नदीवर असलेल्या पुलावरून धरणाचे पाणी वाहत होते. या पाण्यातून दोघांनी दुचाकीवरून जाण्याचा प्रयत्न केला. ते दोघेही पाण्यातून वाहून गेले. त्यांची माहिती उशिरापर्यंत मिळाली नाही, मात्र सांयकाळी आकले परिसरात त्यांची दुचाकी सापडली. 

स्थानिक संतप्त
तिवरे धरण फुटून भेंदवाडीतील ग्रामस्थ वाहून गेल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी शासकीय अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधींवर आपला राग व्यक्त केला. सकाळी आमदार सदानंद चव्हाण, माजी आमदार रमेश कदम व जलसंपदा विभागाने अधिकारी घटनास्थळी गेले होते. त्यांना स्थानिकांच्या रोषाला तोंड द्यावे लागले. त्यामुळे ते तत्काळ माघारी परतले. 

उशिरा अंत्यसंस्कार 
तिवरे धरण दुर्घटनेत चंद्रभागा कृष्णा चव्हाण, आत्माराम धोंडू चव्हाण, महादेव चव्हाण, पाडुरंग धोंडू चव्हाण, संदेश धाडवे, शारदा बळीराम चव्हाण, दशरथ रवींद्र चव्हाण, अनंत चव्हाण, लक्ष्मी आत्माराम चव्हाण, रवींद्र तुकाराम चव्हाण, राकेश दत्ताराम घाणेकर, शुंभागी चव्हाण, रेश्‍मा रवींद्र चव्हाण यांचे मृतदेह सापडले. चिपळुणात रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ratnagiri Dam Mishap Tivare special story