esakal | Ratnagiri : चौपदरीकरणाच्या कामांमुळे महामार्ग प्रवासासाठी धोकादायक
sakal

बोलून बातमी शोधा

khed

Ratnagiri : चौपदरीकरणाच्या कामांमुळे महामार्ग प्रवासासाठी धोकादायक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

खेड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात भोस्ते घाटात अनेक ठिकाणी वाहतुकीची धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. या घाटात नियंत्रित वेगाने धावणारी वाहनेदेखील रस्त्यालगत कठड्याला धडकत व उलटत असल्याने वाहतुकीस मार्ग धोकादायक बनला आहे. या महामार्गावरील अपघात स्थळांचा आढावा राष्ट्रीय महामार्ग विभागाने घेण्याची गरज असून, मार्ग सुरक्षित व वाहतुकीस योग्य ठेवावा, अशी मागणी वाहनचालक व प्रवाशांतून होत आहे.

कोकणातील गणेशोत्सव हा प्रमुख सण असून, मोठ्या संख्येने मुंबई-पुणे या ठिकाणाहून चाकरमानी कोकणातील आपल्या मूळगावी उत्सव साजरा करण्यासाठी येत असतात. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर गणेशोत्सवापूर्वी व नंतर चार ते पाच दिवस मोठ्या संख्येने खासगी चारचाकी वाहने ये-जा करीत असतात. मुंबई व पुणे या महानगरात रत्नागिरी व सिंधुदुर्ग व गोवा राज्यातील अनेक कुटुंबे नोकरी व्यवसायानिमित्त स्थायिक झाली आहेत. गणपती सण साजरा करण्यासाठी ही कुटुंबे मोठ्या प्रमाणात खासगी वाहने घेऊन आपल्या मूळ गावी येत असतात.

सध्या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असून कशेडी, परशुराम व भोस्ते या तीन घाटांमध्ये वाहतुकीस धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. खेडमधील भोस्ते घाट गेल्या काही दिवसांमध्ये लहान-मोठ्या अपघातामुळे सतत चर्चेत राहिला आहे. महामार्गावरील या घाटात सुमारे ८० टक्के चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाल्याचा दावा संबंधित कंपनीने केला असला तरी पावसाळ्याच्या कालावधीत अनेकदा रस्त्यावर दरडी कोसळल्याने चार पदरी रस्त्यापैकी दोन पदरी रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्याची नामुष्की ओढवली होती. घाटातील अनेक वळणे पूर्वीच्या रस्त्यापेक्षा ही धोकादायक बनली आहे.

हेही वाचा: 700 वर्षांची परंपरा जपणार 'कोकणातलं' गाव

गतिरोधकामुळे वाहनांचा अपघात

मुंबई-गोवा महामार्गावर लोटे औद्योगिक वसाहत या ठिकाणी गतिरोधक उभारले असून, लहान-मोठी वाहने या गतिरोधकावरून धावताना आपटत असल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे. गेल्या चार महिन्यांत सुरू असलेली अपघातांची मालिका थांबतच नाही. आगामी गणेशोत्सव कालावधीत कोकणात चाकरमानी दाखल झाले आहेत. त्यांचा आगमन व परतीचा प्रवास सुरक्षित होणेसाठी उपाय योजने आवश्‍यक आहे.

सुरक्षेसाठीच्या कठड्यालाच धडक

भोस्ते घाटातील सर्वात मोठे व अवघड वळण असलेल्या रस्त्याच्या लगत सुरक्षेसाठी दरीच्या बाजूला उंच कठडा उभारला आहे; मात्र या कठडयावरच अनेक अवजड वाहने धडकत असून, त्यामुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.

एक नजर

  1. कशेडी, परशुराम व भोस्ते घाट वाहतुकीस धोकादायक

  2. भोस्ते घाट लहान-मोठ्या अपघातामुळे सतत चर्चेत

  3. सुमारे ८० टक्के चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाल्याचा दावा

  4. पावसाळ्याच्या कालावधीत अनेकदा रस्त्यावर दरडी

  5. चार पदरी रस्त्यापैकी दोन पदरी बंद ठेवण्याची नामुष्की

  6. नियंत्रित वेगातील चालकांचेही नियंत्रण सुटून अपघात होतात.

loading image
go to top