esakal | 700 वर्षांची परंपरा जपणार 'कोकणातलं' गाव; 65 कुटुंबांचा गणेशोत्सव एकत्रित
sakal

बोलून बातमी शोधा

700 वर्षांची परंपरा जपणार 'कोकणातलं' गाव

गणेशोत्सवाची क्रेझ सिंधुदुर्गवासीयांच्या मनाच्या गाभाऱ्यात समृद्ध धार्मिकतेने आणि भावपूर्ण श्रद्धेने जोपासली आहे.

700 वर्षांची परंपरा जपणार 'कोकणातलं' गाव

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी : मळगाव माळीचे घर येथे तब्बल ७०० वर्षांची परंपरा असलेला गणेशोत्सव साजरा होतोय. ६५ कुटुंबांचा हा एकत्रित उत्सव एक आगळीवेगळी परंपरा जपणारा ठरत आहे. गणेशोत्सवाची क्रेझ सिंधुदुर्गवासीयांच्या मनाच्या गाभाऱ्यात समृद्ध धार्मिकतेने आणि भावपूर्ण श्रद्धेने जोपासली आहे. मळगाव येथील माळीचे घर येथील उत्सव गणेशोत्सवाची परंपरा या संस्कृतीचीच प्रचिती देणारा आहे.

सुमारे सातशे वर्षांहूनही अधिक काळ माळीच्या घरात गणेशोत्सव साजरा होत आहे. आज ६५ कुटुंबं मिळून हा उत्सव साजरा करतात. एकत्र कुटुंबपद्धतीचे हे आदर्श उदाहरण म्हणता येईल. मळगावात दहा वाड्यांचा समावेश असून लोकसंख्या सुमारे सहा हजारांच्या आसपास आहे. गावाच्या उत्तर दिशेला राऊळ कुटुंबाचे माळीचे घर आहे. या परिसरात राऊळ कुटुंबांची जवळपास सहाशे लोकवस्ती आहे. या कुटुंबांमधील प्रत्येक घरातील किमान निम्मे तरी कामानिमित्त पुणे-मुंबई येथे स्थायिक आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी कामानिमित्त विभागलेली ही भावंडे होळीपौर्णिमा, नागपंचमी, अष्टमी आणि गणेशोत्सव अशा चार उत्सवांना एकत्र येतात.

हेही वाचा: विघ्नहर्त्या, कोरोनाचे सावट दूर कर!

या उत्सवांमध्ये महत्त्वाच्या असणाऱ्या गणेशोत्सवाची पूर्वतयारी या तिन्ही उत्सवातील भेटीमध्ये राऊळ बांधवांकडून होत असते. त्यामुळे गणेशाची तयारी नियोजनबद्धरीत्या केली जाते. गणेशोत्सव सण राऊळ कुटुंबातील ज्येष्ठ असणाऱ्या मोतीराम राऊळ यांच्या मार्गदर्शनाखाली पारंपरिक पद्धतीने केला जातो.

गणेशोत्सवाच्या अगोदर येणाऱ्या पौर्णिमेला मूर्ती तयार करण्यासाठी शाडूची माती आणली जाते आणि चतुर्थीपूर्वीच्या आठवड्यात मूर्ती साकारण्यास सुरुवात केली जाते. ही मूर्ती राऊळ बांधवांतील ज्येष्ठ मंडळी आजही आपल्या हाताने तयार करतात. मूर्ती बनविताना या कुटुंबातील तरुण मंडळीही हातभार लावतात. तयार झालेल्या गणेशमूर्तीला चतुर्थीच्या आदल्या दिवशी रंगविले जाते तर मूर्तीची नजर चतुर्थीच्या पहाटेला पारंपरिक कारागिरांकडून उघडली जाते. हे या गणपतीचे एक खास वैशिष्ट्य आहे.

आवडीचा नैवेद्य अन् सामूहिक भोजन

माळीच्या घरातील गणेशोत्सव हा पारंपरिक सात दिवसांचा असतो. या घराच्या गाभाऱ्यातही श्री गणेशाचीच मूर्ती आहे. या घरात सर्वजण एकत्र येऊन रोज सायंआरती करतात. मूर्ती प्रतिष्ठापनेच्या दिवशी गणेशाचे विधिवत पूजन झाल्यावर गणेशाला या कुटुंबीयांकडून वेगवेगळ्या सात प्रकारचा नैवेद्य दाखविला जातो. त्यानंतरच सामूहिक भोजनाचा आनंद घेतला जातो. शिवाय ६५ कुटुंबीयांकडून गणेशाला आपल्या आवडीचाही नैवेद्य दाखविला जातो.

हेही वाचा: राज्य सरकारला फडणवीसांचं म्हणणं उशिरा कळलं - गोपीचंद पडळकर

सात दिवस कार्यक्रमांची रेलचेल

उत्सवाच्या सात दिवसांमध्ये रोज विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, रेकॉर्ड डान्स स्पर्धा, आरती पठण आदी स्पर्धा होतात. घरातील सर्व कुटुंबांतील महिला एकत्र येत रोज गणपतीसमोर विविध प्रकारच्या फुगड्या घालतात. याशिवाय रोज सायंकाळी आरतीनंतर भजन व शेवटच्या दिवशी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामुळे सातही दिवस संपूर्ण घरात भक्तिमय वातावरण असते.

loading image
go to top