
मुंबईशी संपर्क असल्यामुळे कोकणाला कोरोनापासून मोठा धोका होता;
रत्नागिरी - हाहाकार उडवून देणार्या कोरोना विषाणुवरील व्हॅक्सीनचे 16 हजार 330 डोस रत्नागिरी जिल्ह्याला मिळाले आहेत. कोल्हापूर येथून वातानुकूलीत व्हॅनद्वारे बुधवारी (ता. 13) सायंकाळी हे डोस उशिरा दाखल होतील. 16 जानेवारीला लस देण्यासाठी जिल्ह्यातील सहा केंद्रे निश्चित केली आहेत. प्रत्येक केंद्रावर 100 जणांना लस दिली जाईल असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
मुंबईशी संपर्क असल्यामुळे कोकणाला कोरोनापासून मोठा धोका होता; मात्र योग्य नियोजनामुळे गेल्या काही दिवसात रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या घटलेली आहे. कोरोनापासून बचावासाठी देशपातळीवरुन नागरिकांना लस दिली जाणार आहे. त्याचा आरंभ होत असून रत्नागिरी जिल्ह्यात डोस देण्यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. पहिल्या टप्प्यात डॉक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचारी यांना डोस दिले जाणार असून त्यानंतर आशा, अंगणवाडी वर्कस्चा समावेश केला आहे. पहिल्या टप्प्यासाठी 14 हजार लोकांची निवड करण्यात आली आहे. कोरोना व्हॅक्सीन पुणे येथून कोल्हापूरला आणली गेली. कोल्हापूर येथून विशेष व्हॅनद्वारे कोरोना लसीचे डोस रत्नागिरीत आणले जात आहेत. साडेपाच वाजता ही व्हॅन 16 हजार 660 डोस घेऊन रत्नागिरीकडे रवाना झाली होती. सायंकाळी उशिरा नऊ वाजेपर्यंत व्हॅन पोचेल अशी माहिती आरोग्य विभागाकडून सांगण्यात आली.
कोरोना लसीचे डोस प्रत्यक्षात नागरिकांना देण्याची सुरवात 16 ला होणार आहे. त्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय, दापोली उपजिल्हा रुग्णालय, गुहागर ग्रामीण रुग्णालय, चिपळूण कामथे उपजिल्हा रुग्णालय, संगमेश्वर ग्रामीण रुग्णालय, राजापूर ग्रामीण रुग्णालय ही केंद्रे निश्चित केली आहेत. एका केंद्रावर 100 जणांना लस दिली जाईल. या केंद्रावर आरोग्यचे पाच प्रशिक्षित अधिकारी, कर्मचारी नियुक्त केले जातील. सकाळी 9 ते सायंकाळी 5 या कालावधीत लस देण्यात येणार आहे. केंद्रांवर प्रतिक्षा कक्ष केला जाणार आहे. लस दिल्यानंतर संबंधितांना प्रतिक्षा कक्षात 30 मिनिटे ठेवले जाईल.
पहिल्या टप्प्यात लस देणार्यांची यादी 15 जानेवारीला जाहीर केली जाईल. संबंधितांच्या मोबाईलवर संदेश पाठविण्यात येणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी सायंकाळी आरोग्य विभागाच्या अधिकार्यांची बैठक घेऊन कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
कोरोना लसीचे डोस देण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. डोस घेऊन येणारी व्हॅन बुधवारी सायंकाळी उशिरा दाखल झाली. लस दिल्यानंतर नागरिकांची माहिती कोविन अॅपद्वारे घेतली जाणार आहे.
- डॉ. बबिता कमलापूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी
संपादन - धनाजी सुर्वे