esakal | रत्नागिरी- सत्यशोधक प्रिंटिंग प्रेसमध्ये गणपती
sakal

बोलून बातमी शोधा

ratnagiri

रत्नागिरी- सत्यशोधक प्रिंटिंग प्रेसमध्ये गणपती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी: शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरा करणाऱ्या साप्ताहिक सत्यशोधकच्या प्रिटिंग प्रेसमध्ये यंदा १५० व्या वर्षी आकर्षक गणेशमूर्ती स्थानापन्न झाली आहे. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. टिळकांच्या स्मारकासमोरच असणाऱ्या सत्यशोधक प्रिटिंग प्रेसमध्ये हा गणेशोत्सव गेली १५० वर्षे साजरा केला जात आहे. सत्यशोधककार लिमयेंची पुढची पिढी हा उत्सव अत्यंत जल्लोषात साजरा करत आहे. ढोल-ताशांच्या गजरात या गणेशाचे आगमन झाले.

हेही वाचा: मुंबई विद्यापीठाच्या सिंधुदुर्ग उपकेंद्राचे उद्या उद्घाटन

साप्ताहिक सत्यशोधक यंदा शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरा करत आहे. महाराष्ट्रात एवढ्या जुन्या प्रिंटिंग प्रेस अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच आहेत. परंतु प्रिटिंग प्रेसमध्ये एवढी वर्षे गणेशोत्सव साजरा करणारे सा. सत्यशोधक हे एकमेव म्हणावे लागेल. यंदाची मूर्ती काळबादेवी येथील प्रसिद्ध मूर्तीकार मयेकर बंधू यांनी साकारली आहे.

गेली ६० हून अधिक वर्षे त्यांच्याकडे ही मूर्ती साकारली जात आहे. सत्यशोधक प्रिटिंग प्रेसमधील कामगार वर्ग, लिमये कुटुंबियांचे हितचिंतक, स्नेही या उत्सवात सहभागी होतात. यंदा कोरोना महामारीमुळे साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्यात येणार आहे.

मूर्ती दोन दिवस आधीच पूर्ण

काळबादेवी येथील प्रसिद्ध मूर्तीकार मयेकर बंधू (कोकाटे बंधू) यांच्या रेखणीतून ही मूर्ती साकारली जात आहे. संजय मयेकर, राजेश मयेकर यांनी त्यांचे आजोबा, वडील यांची परंपरा कायम ठेवून नावलौकिक मिळवला आहे. त्यांचे सर्व मूर्ती बनवण्याचे काम गणेशचतुर्थीच्या दोन दिवस आधी पूर्ण होते, हेसुद्धा विशेष.

सत्यशोधकचे दमदार प्रयत्न

(कै.) हरी नारायम लिमये यांनी सन १८७१ मध्ये सत्यशोधक साप्ताहिकाचा पाया घातला. शिक्षण, विकास आदी प्रश्‍न सोडवायला चालना दिली. पहिल्या ५० वर्षांत खुष्कीचे मार्ग, रहदारीचे मार्ग, वाहतूक सुरू करण्यासाठी सत्यशोधकने दमदार प्रयत्न केले. पहिल्या अंकाचा आकार २६ बाय ३६ सें.मी. होता.

पारतंत्र्याच्या काळात अतिजहाल स्वरूप होते. वीर सावरकर रत्नागिरीमध्ये स्थानबद्धतेत होते. त्या वेळी त्यांनी हिंदू समाजातील जातीभेद नष्ट करणे, व्यायाम, स्वदेशी, साक्षरता प्रचार या क्षेत्रात त्यांनी कार्य केले. त्यामध्ये सत्यशोधकनेही सहभाग घेतला होता.

loading image
go to top