
रत्नागिरी : गणपतीपुळे, वेळणेश्वर ठरले ‘बेस्ट रिव्ह्यू ऑफ दि इयर’
रत्नागिरी : धार्मिक पर्यटन स्थळाबरोबरच पर्यटकांची सर्वाधिक पसंती असलेल्या गणपतीपुळेला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) ‘बेस्ट रिसोर्ट ऑफ दि इयर’ आणि ‘बेस्ट रिव्ह्यू ऑफ दि इयर’ पुरस्कारांनी गौरव केला आहे. गुहागर तालुक्यातील वेळणेश्वरलाही ‘बेस्ट रिव्ह्यू ऑफ दि इयर’चा पुरस्कार मिळाला आहे.
मुंबईत शुक्रवारी (ता. १३) झालेल्या पर्यटन महामंडळाच्या आढावा बैठकीत हे जाहीर करण्यात आल्याची माहिती कोकण विभागाचे प्रादेशिक अधिकारी दीपक माने यांनी दिली. देश आणि विदेशातील पर्यटकांची गणपतीपुळेला पहिली पसंती असते. पर्यटकांचा ओघ लक्षात घेऊन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने गणपतीपुळे येथे विविध सुविधा निर्माण केल्या आहेत. त्याचप्रमाणे बोट क्लबसारख्या जलक्रीडा सुरू केल्या आहेत. ‘वेडिंग– बर्थ डे डेस्टिनेशन’ म्हणूनही गणपतीपुळेत नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी एमटीडीसी प्रयत्नशील आहे.
कोरोना कमी होताच डिसेंबर महिन्यात शासनाने नोव्हेंबर महिन्यात निर्बंध उठविले. पर्यटनात धार्मिक पर्यटनाचा महत्त्वाचा भाग असल्याने मंदिरे खुली करण्यास परवानगी मिळताच भाविकांनी गणपतीपुळे येथे गर्दी करण्यास सुरुवात केली. धार्मिकतेबरोबरच पर्यटनस्थळ म्हणूनही गणपतीपुळेला पर्यटकांनी अधिक पसंती दिली. त्यामुळे गेल्या आर्थिक वर्षात पर्यटकांची सर्वाधिक पसंती असलेले महाराष्ट्रातील गणपतीपुळे आणि गुहागरमधील वेळणेश्वरला ‘एमटीडीसी’ने ‘बेस्ट रिव्ह्यू ऑफ दि इयर’ने गौरविले आहे. त्याचबरोबर २०२१-२२ या आर्थिक वर्षात एमटीडीसीला १ कोटी २० लाखांचा निव्वळ नफा मिळवून देणाऱ्या गणपतीपुळे रिसॉर्टला ‘रिसॉर्ट ऑफ दि इयर’चा गौरव मिळाला आहे. ‘सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारे रिसॉर्ट’ तसेच इंटरनेटद्वारे उत्तम सुविधा उपलब्ध करून देणारे येथील व्यवस्थापक वैभव पाटील यांचाही सन्मान होणार आहे.
स्वप्निल पवार, सुभाष चव्हाण, सिद्धार्थ चव्हाणांचा गौरव
वेळणेश्वर, रायगड तालुक्यातील हरिहरेश्वर यांनाही बेस्ट ‘रिव्ह्यू ऑफ दि इयर’चा सन्मान मिळाला असून या रिसॉर्टचे व्यवस्थापक अनुक्रमे स्वप्निल पवार आणि सुभाष चव्हाण यांचाही सन्मान करण्यात आला आहे. कुणकेश्वर रिसॉर्टचे सिद्धेश चव्हाण यांना पदार्पणातच उत्तम काम केल्याबद्दल त्यांचाही सन्मान होणार आहे. महाराष्ट्रात कोकण पर्यटन विकास महामंडळ अव्वल ठरले असून, ही प्रशस्तिपत्रके काही दिवसांतच त्यांना प्रदान करण्यात येणार आहेत.
Web Title: Ratnagiri Ganpatipule Velneshwar Named
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..